जितेंद्र कोठारी, वणी: शहरात राजरोजपणे सुरु असलेल्या मटका अड्यावर पोलिसांनी धाड टाकली. या धाडीत एका आरोपीला अटक करण्यात आली. त्याच्याकडून रोख रक्कम व मटका लावण्याचे साहित्य जप्त करण्यात आले. सदर कारवाई डीबी पथकाने केली.
दिनांक 29 जून रोजी शहरातील एकता नगर येथील नगर परिषदेच्या गाळ्यामध्ये मटका सुरू असल्याची माहिती डीबी पथकाला मिळाली. त्यावरून दुपारी 2.30 ते 3 वाजताच्या दरम्यान डीबी पथकाने सदर ठिकाणी धाड टाकली. धाड टाकताच तिथे एकच खळबळ उडाली. मटका लावणा-यांनी मिळेल त्या दिशेने पळ काढायला सुरूवात केली. दरम्यान या कारवाईत मटका पट्टी फडणारा एक इसम पोलिसांच्या हाती लागला.
अब्दुल रज्जाक शेख मुख्तार (36) रा. मुकुटबन असे आरोपीचे नाव असून त्याच्याकडून 1080 रुपयांची रोख रक्कम व मटका लावण्याचे साहित्य जप्त करण्यात आले. आरोपीवर महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायद्याच्या कलम 12 (अ) नुसार गुन्हा दाखल केला आहे.
सदर कार्यवाही एसडीपीओ संजय पुज्जलवार यांच्या मार्गदर्शनात ठाणेदार वैभव जाधव, डीबी पथक प्रमुख गोपाल जाधव, डीबी पथकाचे सुदर्शन वानोळे, सुधीर पांडे, सुनील खंडागळे, दीपक वान्ड्रूसवार, पंकज उंबरकर, हरिन्द्रकुमार भारती यांनी केली.
हे देखील वाचा: