पोलिसांची वॅन आली अन् ‘झुंड’ची पळापळ, शासकीय मैदानावर राडा

विद्यार्थ्यांचे दोन गट आपसात भिडले, तरुणांईचे पावलं चुकीच्या वळणावर

जितेंद्र कोठारी, वणी: मंगळवारी रात्री 10 वाजताची वेळ, वणीतील पाण्याच्या टाकीजवळील शासकीय मैदानावर 70 ते 80 नुकतेच तारुण्यात पदार्पण केलेले विद्यार्थी आले. विषय कुठल्यातरी वादाचा होता. वाद वाढत गेला व दोन गट आपसात भिडले. दरम्यान याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसाची वॅन आली. पोलीस दंडे घेऊन येताना दिसताच भाईगीरी करणारा ‘झुंड’ मिळेत त्या दिशेने पळत सुटला. वेळेत पोलीस पोहोचल्याने प्रकरण थोडक्यात निपटले. या घटनेच्या एक दिवस आधी सोमवारी दुपारी 11 वाजताच्या सुमारास यवतमाळ रोडवरील एका कॉलेजसमोर दोन गटात हाणामारी झाली. यात एक विद्यार्थ्याला जबर मारहाण झाल्याची माहिती आहे. एक घटना भर दिवसा तर दुसरी घटना रात्री उशिरा घडली. गेल्या काही महिन्यांपासून वणी शहरात मोठ्या प्रमााणात कॉलेज कुमारांच्या दोन गटात वाद झाल्याच्या घटना सातत्याने समोर येत आहे. नुकतेच तारुण्यात पदार्पण केलेली तरुणाई दादागिरीच्या दिशेने जात असल्याने ही एक चिंताजनक बाब ठरत आहे.

प्राप्त माहितीनुसार, सोमवारी दिनांक 7 मार्च रोजी दुपारी 11 वाजता यवतमाळ रोडजवळील एका कॉलेजसमोर दोन गटात वर्चस्वावरून बाचाबाची झाली. त्यावरून दोन्ही गटाच्या तरुणांनी आपल्या साथीदारांना कॉलेजसमोर बोलावले. तिथे भर दुपारी राडा झाला. यात एका तरुणाला चांगलीच मारहाण झाली असून यात त्याच्या तोंडाला जबर मार लागल्याची माहिती आहे. विशेष म्हणजे भर दुपारी मुख्य रस्त्यावरच ही घटना घडली व राडा करणारे विद्यार्थी हे कॉलेजचे विद्यार्थी असल्याची माहिती आहे. 

दुस-या घटनेत मंगळवारी दिनांक 8 मार्च रोजी शिवी देण्यावरून दोन गटात वाद झाला. एकाने दुस-यावर शिवी दिल्याचा आरोप केला. यावरून वाद वाढत गेला. या वादात इतरांनीही उडी घेतली. पुढे दोन्ही गटाने या वादाचा फैसला पाण्याच्या टाकीजवळील शासकीय मैदानावर करण्याचे ठरले. रात्री 10 वाजताच्या सुमारास दोन्ही गटाचे सुमारे 70 ते 80 मुलं तिथे पोहोचले. तिथे वाद सुरू होता. दरम्यान मैदानावर असलेल्या काही सुज्ञ व्यक्तींनी याची माहिती पोलीस स्टेशनला दिली. लगचे पोलिसांची वॅन घटनास्थळी दाखल झाली. पोलीस वॅनमधून दंडे घेऊन येताना दिसताच दादागिरी करणा-या सर्व भाईंची हवा गुल झाली व त्यांनी मिळेल त्या दिशेने पळायला सुरूवात झाली. वेळीच पोलीस पोहोचल्याने या ठिकाणी हाणामारी झाली नाही. 

शालेय विद्यार्थीही राडा करण्यात मागे नाही
दोन महिन्याआधी एका नामांकित शाळेतील नववी आणि दहाव्या वर्गातील विद्यार्थ्यानी शाळा सुटल्यावर नांदेपेरा रोडवर तुफान राडा केला. दोन गटातील विद्यार्थ्यांनी एकमेकांना मारहाण केली. हे प्रकरण मीडियातून समोर आल्यानंतर प्रकरण पोलीस ठाण्यापर्यंत पोहचले. मात्र पोलिसांनी संयम दाखवत पालकांना पोलीस स्टेशनमध्ये बोलवले व विद्यार्थ्यांना समज देण्यात आली होती.

गेल्या काही दिवसांमध्ये शहरात सातत्याने भाईगिरीच्या नादातून असे प्रकार वाढत चालले आहे. यातील काही तरुण हे स्वत:ला भाई समजतात. त्यांच्या नादाला लागून इतर मुलेही अभ्यास सोडून भाईगिरीच्या नादी लागले आहे. शहरात सध्या असे अनेक गट असल्याने यात कधी वर्चस्वावरून, कधी शिवी दिल्यावरून तर कधी शुल्लक कारणांवरून वाद होत असल्याचे दिसून येत आहे. बरेचदा वाद झाल्यावर कॉलेजबाहेरील साथींनाही बोलवण्यात येते. यातील अनेक तरुण हे गुन्हेगारी प्रवृत्तीचे आहेत. आपला पाल्य कॉलेजमध्ये जाऊन शिकण्याऐवजी भाईगिरीकडे तर वळत नाही, याकडे पालकांनीही लक्ष देण्याची गरज आहे. कधी भर दिवसा मुख्य रस्त्यावर तर कधी फक्त राडा करण्यासाठी मैदान गाठणा-या ‘झुंडी’वर आवर घालण्याची अपेक्षा वणीकर व्यक्त करीत आहे. 

हे देखील वाचा:

वणीचे ठाणेदार शाम सोनटक्के यांची यवतमाळ येथे बदली

वणीकरांचा मनसेला कौल… पण सर्व विरोधकांची एकी: वारे नगरपालिकेचे भाग 9

चिंताजनक: शहरात अल्पवयीनांच्या गुन्ह्यात वाढ

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

Comments are closed.