सावधान…! वणीत घरफोडीचे सत्र सुरू…. चोरट्यांची आणखी घरफोडी

गणेशोत्सवासाठी गावी गेलेल्या कुटुंबाकडे घरफोडी, रोख रक्कम, मोबाईल, दागिने लंपास

विवेक तोटेवार, वणी: गणेशोत्सवानिमित्त गावी गेलेल्या कुटुंबाकडे घरफोडी झाली आहे. विशेष म्हणजे मध्यवस्तीत असलेल्या टागोर चौकात शुक्रवारी रात्री ही घटना घडली. या घरफोडीत चोरट्यांनी 50 हजार रोख, मोबाईल व दागिने लंपास केले आहे. चार दिवसांआधी रविनगर येथे चोरट्यांनी घरफोडी करून 60 हजारांच्या दागिन्यांवर डल्ला मारला होता. त्यानंतर लगेच ही घटना घडली आहे. आधीच दुचाकी चोरीने त्रस्त असलेल्या वणीकरांची घरफोडीने आणखी चिंता वाढवली आहे. 

सविस्तर वृत्त असे की अशोक नानाजी ठावरी रा. टागोर चौक वणी येथे राहतात. त्यांची तालुक्यातील वेळाबाई येथे शेती आहे. शेतीतील मजुरांना मजुरी देण्यासाठी त्यांनी बँकेतून 50 हजार रुपये काढले व घरी कपाटात आणून ठेवले होते. शुक्रवारी वेळाबाई येथे गणेसोत्सवानिमित्त महाप्रसाद असल्याने संध्याकाळी ते घराला कुलूप लावून गावाकडे गेले.

शनिवारी सकाळी घरा शेजा-यांना ठावरी यांच्या घराचे दार उघडे दिसले. त्यामुळे शेजा-यांना घरफोडीचा संशय आला. त्यांनी याबाबत ठावरी यांना संपर्क साधला. चोरीची माहिती मिळताच ते तातडीने वणीला आले. त्यांनी कपाट तपासले असता त्यातील 50 हजार रुपये व देवघरात ठेवलेली 2 ग्रॅम सोन्याची जिवती, मोबाईल, घळ्याड असा एकूण 55 हजारांचा मुद्देमाल चोरट्यांनी चोरल्याचे त्यांच्या लक्षात आले.

त्यांनी त्वरीत पोलीस स्टेशन गाठून याबाबत तक्रार दिली. पोलिसांनी तक्रारीवरून वणी पोलिसात अज्ञात चोरट्यांविरुद्ध भादंविच्या कलम 457, 380 नुसार गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास वणी पोलीस करीत आहे.

वणीत घरफोडीचे सत्र सुरू
दुचाकी चोरीच्या घटना सातत्याने सुरू असतानाच आता चोरट्यांनी आपला मोर्चा घरफोडीकडे वळवला आहे. रविनगर येथे रविवारी मध्यरात्री चोरट्यांनी घरफोडी करून 60 हजारांच्या दागिन्यांवर डल्ला मारला होता. त्यानंतर शुक्रवारी मध्यरात्री पून्हा घरफोडी झाली आहे. सध्या सण उत्सवाचा काळ असल्याने अनेक लोक बाहेरगावी जातात याचाच फायदा घेऊन सध्या चोरट्यांकडून घरफोडी सुरू आहे. घर बंद असले की मध्यरात्री घरफोडी झालीच अशी सध्या अवस्था आहे. त्यामुळे वणीकरांची चिंता वाढली आहे. पोलिसांनी चोरट्यांचा तात्काळ बंदोबस्त करावा अशी अपेक्षा सध्या व्यक्त केली जात आहे.

हे देखील वाचा: 

रविवारी सुप्रसिद्ध सर्जन डॉ. आशुतोष जाधव (MBBS, MS) यांची वणीत व्हिझिट

ब्रह्मास्त्र शुक्रवारपासून वणीतील सुजाता थिएटरमध्ये प्रेक्षकांच्या भेटीला

रवीनगर येथे घरफोडी, 60 हजाराचे सोन्याचे दागिने लांबविले

 

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

Comments are closed.