आता दिवसाधवळ्या वणी शहरात घरफोडी, लाखोंचा ऐवज लंपास

रविवारी इलेक्शन ड्युटीला गेलेल्या शिक्षकाच्या घरी भर दुपारी चोरी.... शहरात घरफोडीचे सत्र सुरूच, पोलीस विभाग सुस्तावले ?

जितेंद्र कोठारी, वणी: शहरात घरफोडीचे सत्र सुरूच असून रविवारी भर दुपारी भोंगळे ले आऊटमध्ये एका शिक्षकाच्या घरी चोरट्यांनी डल्ला मारला. या घरफोडीत चोरट्यांनी 40 हजार रोख व सोन्याचे दागिने असा एकूण अंदाजे एक लाखांचा ऐवज लंपास केला. आधीच शहरात रात्री घरफोडीच्या घटना सुरू असताना आता भर दिवसा घर फोडण्यापर्यंत चोरट्यांची मजल गेली आहे. त्यामुळे शहरात कायदा सुव्यवस्था आहे की नाही?  असा प्रश्न उपस्थित होत आहे.

सविस्तर वृत्त असे की ईश्वर वडस्कर हे साने गुरूजी नगर येथील भोंगळे ले आऊटमध्ये त्यांच्या पत्नीसह राहतात. ते जिल्हा परिषद शाळेत शिक्षक आहे. रविवारी दिनांक 18 सप्टेंबर रोजी ग्रामपंचायतची निवडणूक असल्याने ते ‘इलेक्शन ड्युटी’साठी मारेगाव तालुक्यातील सराटी येथे गेले होते. तर सकाळी 10.30 वाजताच्या सुमारास त्यांच्या पत्नी ललिता या त्यांच्या मुळ गावी मारेगाव तालुक्यातील मछिंद्रा येथे मतदान करण्यासाठी गेल्या. जाताना त्यांनी घराच्या दरवाज्याला व मेन गेटला कुलूप लावले होते.

ललिता या मतदान करून 4.30 वाजताच्या सुमारास घरी परत आल्या. तेव्हा त्यांना घराच्या दरवाज्याची कडी तोडलेली आढळली. त्यांनी आत जाऊन बघितले असता त्यांना घरातील बेडमधले सामान अस्त व्यस्त फेकलेले आढळले. तसेच लाकडी व लोखंडी कपाटातील साहित्य फेकलेले आढळले. त्यांनी कपाट शोधले असता त्यातील सोन्याचे दागिने, पैसे व ब्लँकेट आढळले नाही.

या घरफोडीत चोरट्यांनी कानातील 1 जोडी छोटे टॉप, 2 अंगठी, मंगळसूत्र (एकूण सोने 10 ग्रॅम) व 40 हजार रुपये रोख रक्कम लंपास केली. त्यांनी लगेच 112 या टोल फ्री क्रमांकावर कॉल करून याबाबत पोलिसांना माहिती दिली. पोलीस घटनास्थळी दाखल झाले व त्यांनी प्राथमिक चौकशी केली. याबाबत ईश्वर वडस्कर यांनी पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली आहे.

घरफोडीचे सत्र कधी थांबणार?
वणी शहरात गेल्या 15 दिवसांपासून घरफोडीचे सत्र सुरू आहे. रात्रीच्या वेळी घर बंद असले की दुस-या दिवशी तिथे घरफोडी झाली, असे सध्या समीकरण झाले आहे. या चोरट्यांचे कोणतेही धागेदोरे गवसले नसताना दुसरीकडे आता भर दुपारी घरफोडी करण्यापर्यंत चोरट्यांची मजल गेली आहे. मात्र पोलिसांकडून अद्यापही चोरट्यांचा बंदोबस्त होताना दिसत नाही. सीसीटीव्ही, तांत्रिक तपास कुठे गेला? असा सवाल या निमित्ताने उपस्थित होत आहे. तर पोलिसांच्या अपयशामुळे सर्वसामान्य नागरिकांमध्ये घरफोडीची दहशत पसरली आहे.

हे देखील वाचा: 

सावधान…! वणीत घरफोडीचे सत्र सुरू…. चोरट्यांची आणखी घरफोडी

सर्वात कमी किमतीत खरेदी करा सोलर झटका मशिन

स्पर्श क्लिनिक येथे त्वचारोगांविषयी अत्याधुनिक उपचार सुविधा उपलब्ध

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

Comments are closed.