जितेंद्र कोठारी, वणी: यवतमाळ LCB (स्थानिक गुन्हे शाखा) चे कर्मचारी असल्याची बतावणी करून राजूर येथे एका व्यक्तीला 20 हजारांची खंडणी मागणा-या दोन तोतया कर्मचा-यांना अटक करण्यात आली. संजय मारोतराव शिंगारे (51) रा. तारापूर यवतमाळ व मनोज नारायण पंडीत (49) रा. राधाकृष्ण नगरी यवतमाळ असे तोतया पोलीस कर्मचा-यांची नावे आहेत. या दोन ठगांनी परिसरात आणखी लोकांकडून खंडणी गोळा केल्याची शक्यता नाकारता येत नाही.
सध्या वणी व परिसरात यवतमाळ येथील एलसीबीने धाडसत्र सुरू केले आहे. मटका, बेटिंग अशा विविध अवैध धंद्यांवर या शाखेने धाड टाकली आहे. त्यामुळे सध्या परिसरातील अवैध व्यावसायिकांनी याचा चांगलाच धसका घेतला आहे. याच गोष्टीचा फायदा दोघांनी घेत तोतया एलसीबी कर्मचारी असल्याची बतावणी करून खंडणी मागताना त्यांचे बिंग फुटले आहे.
सविस्तर वृत्त असे की किसन परचाके हे राजूर कॉलरी येथील रहिवासी आहे. ते मंगळवारी दिनांक 15 नोव्हेंबर रोजी दुपारी 4 वाजताच्या सुमारास गावातील आठवडी बाजारात होते. दरम्यान तिथे दोन इसम आले. त्यांनी किसन यांना गावात मटका कुठे चालतो याची विचारणा केली. त्यावर किसन यांनी पूर्वी जगदिश पाटील हे मटका घेत होते. मात्र आता त्यांनी बंद केला असे सांगितले. त्यावर त्या दोन इसमांनी आम्ही एलसीबी यवतमाळचे कर्मचारी आहो असे सांगून त्यांनी किसनला जगदिश पाटीलचे घर दाखवण्यासाठी जबरदस्ती केली. त्यावरून किसन त्या दोघांना पाटील यांच्या घरी घेऊन गेला.
तिघेही घरी जाताच जगदिश पाटील यांच्या घरी त्यांच्या पत्नी होत्या. पाटील यांच्या पत्नीला त्या दोघांनी 20 हजार रुपयांची मागणी केली. जर पैसे न दिल्यास तात्काळ केस करतो अशी धमकी ही त्यांनी दिली. पाटील यांच्या पत्नीने पैसे देण्यास टाळाटाळ केली असता त्या दोन इसमांनी जगदिश पाटील यांचा मोबाईल नंबर घेऊन त्यांना घरी बोलावले. जगदिश घरी येताच त्या दोन इसमांनी त्यांना पैशाची मागणी केली. त्यावर जगदिश त्यांनी मटका पट्टी घेणे बंद केल्याचे सांगितले. त्यामुळे ते दोन इसम पोलीस ठाण्यात घेऊन जातो अशी धमकी पाटील यांना दिली व ते दोघे पाटील यांना सोबत घेऊन निघाले.
दरम्यान किसन व जगदिशला ते दोघेही पोलीस कर्मचारी तोतये असल्याचा संशय आला. किसनने तात्काळ याची माहिती गावातील काही लोकांना दिली. त्यामुळे गावातील लोक जमा झाले. गावातील लोक जमा झाल्याने त्या दोघांनीही पळून जाण्याचा प्रयत्न केला. गावातील लोकांनी दोघांना ताब्यात घेऊन नाव विचारले असता त्यांनी संजय मारोतराव शिंगारे (51) रा. तारापूर यवतमाळ तर मनोज नारायण पंडीत (49) रा. राधाकृष्ण नगरी यवतमाळ असे सांगितले. त्या दोघांना वणी पोलीस ठाण्यात आणण्यात आले. फिर्यादी किसन परचाके यांच्या तक्रारीवरून दोघांवरही भादंविच्या कलम 170 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तोतया निघाला पोलीस विभागातील बडतर्फ कर्मचारी
आरोपी संजय शिंगारे हा यवतमाळ येथे पोलीस विभागात कार्यरत होता. मात्र काही कारणास्तव त्याला दोन तीन वर्षाआधी पोलीस विभागातून बडतर्फ करण्यात आले आहे. त्याला अशा रेडची माहिती असल्याने त्याने खंडणी मागण्याची खेळी खेळल्याची बोलले जात आहे. मात्र राजूर येथे या तोतया एलसीबी कर्मचा-यांचे बिंग फुटले. त्यांनी आणखी अशाच पद्धतीने किती अवैध व्यावासायिकांकडून खंडणी गोळा केली हे देखील एक कोडेच आहे. दोन्ही आरोपींना सूचनापत्रावर सोडून देण्यात आले आहे.
दरम्यान अशा प्रकारे कुणी खंडणी मागत असल्याची याची माहिती वणी पोलीस ठाण्यात द्यावी असे आवाहन प्रभारी ठाणेदार माया चाटसे यांनी केली आहे.
हे देखील वाचा:
Comments are closed.