स्पर्श लोखंडाला…..
बहुगुणी कट्ट्यात कवी, गीतकार, लेखक, निवेदक सुनील इंदुवामन ठाकरे यांचं आर्टिकल
सुनील इंदुवामन ठाकरे: गर्भचांदण्यात तुला सांजभुलीची आठवण झाली असेल. बाहेरील प्रकाशनादात तुझं गुंजन विरघळण्यासाठी आसुसलेलंच होतं. पहाटपैजणात प्राणलय आत्मगीतात मग्न होती. स्वरपक्षांच्या एकतानतेत तू अनेक तू अनेक रहस्य पेरत आला. तू लिहायला लागला गर्भरेशमी डोहाळे. तुझ्या काजळाने लिंपले काही चांदण्यांचे आंगण. प्रकाशाचे शिंतोडे कोरड्या काळोखात पडले. छिन्नविछिन्न प्राणसख्याला मिठीत घेत तू आत्मधून छेडली.
काळोखाचा प्रवास काळोखाच्या पलीकडे जातो. तो उजेडाच्या समेवर संगमतीर्थ होतो. लाजाळूच्या पानांतून फुलपाखरू उडून थरथरायला लागतं. त्या फुलपाखराच्या पायाला आठवणींचे परागकण चिकटतात. सगळेच परागकण हे नवगर्भित होत नाहीत. परत मातीतच जातात. मुळातून परत खोडात प्रवेश करतात. खोडातून फांदीत. फांदीतून कळीत. त्याच कळीचं फूल होतं. आणि त्या फुलाच्या सर्वोच्च शिखरावर पुन्हा नव्या जोमानं सिद्ध असतो हाच कण.
परागकणाची व भक्कम खोडाची जातकुळीच एकच असते. खोडदेखील तितकंच मृदू असतं. कारुण्यमयी डोळ्यांतील प्रार्थनेसारखं. पाऊस ताडताड करीत जमिनीच्या आत शिरतो. नि:शब्द भावनांचे हेलकावे रसातळातील रहस्य धुंडाळत असतात. आत, आत, खोल, खोल टाळ मृदंगाच्या नादात पालखी निघालेली असते.
अंकुरण्याच्या सोहळ्याची पहिली साक्षिदार मातीच असते. स्वतःला फाडते ती. कणाकणांतून तुटत ती तिच्या संपूर्ण अस्तित्त्वाची उलथापालथ करते. जगण्याचा तोल सांभाळत ती गर्दओल काळजात कुरवाळत असते. धमण्यांतून सळसळत वाहणाऱ्या रक्तगंधातून तू सुगंधित होत गेला. आर्त याचनेचा साक्षात्कार झाला. ग्रहणाच्या चिमटून सुटलेला थोडासा उजेड ‘‘आमेन’’ म्हणत लुप्त झाला.
आता आकाशाला केशरी किनार लागली. विखुरलेले सांजपक्षी रात्रीच्या फांदीवर स्थिरावले. आकाश गोलाकार फुगलेलं होतं. गर्भवतीच्या नाभीवर चंद्र ताणलेलाच होता. चांदण्याच्या भगदाडांतून अंधाराचे अंधाधुंद तीर सुटायला लागलेत. आतल्या आत घरटं चिवचिवाट ऐकण्याचा प्रयत्न करीत राहिलं. पहाटेला होणाऱ्या क्षितिजध्वंसापर्यंत. तुझ्यासोबत गुणगुणायचे आहेत काही सूर. आज तुझी आठवण आली. पानाच्या टोकावरील थेंब कोसळण्याआधी पुन्हा एकदा स्मित दे. या लोखंडाला स्पर्श कर. तू ‘‘परीस’’ आहेस, म्हणूनच. लव्ह यू डार्लिंग….
सुनील इंदुवामन ठाकरे
8623053787 – 9049337606