आनंदातच जगा! 

यश-अपयश येतच राहतील....

0

सुनील इंदुवामन ठाकरे: आत्महत्या सुरूच आहेत. गरीब करत आहेत. श्रीमंत करत आहेत. उच्चशिक्षित करत आहेत. निरक्षर करत आहेत. पण, का करत आहेत हा प्रश्न अद्याप कायम आहे. सहन करण्याची ताकद कमी झाली आहे. आपण सहन करण्याची क्षमता स्वतःहून गमावून बसलो कदाचित. ती परत मिळवता येईल. आपले मनोसामर्थ वाढवता येईल.

आई जेव्हा बाळाला जन्म देते तेव्हा तिला प्रसुती वेदना होतात. असं म्हणतात की ती सगळ्यात मोठी शारीरिक वेदना असते. त्यापलीकडे कोणतंच ‘‘पेन’’ नसतं. त्या असह्य वेदनेतून गेलं की तिला संपूर्ण जन्म मातृत्त्वाचं सुख मिळत असतं. या वेदनेचा सामना प्रत्येक आई करत असते. ही शारीरिक वेदना झाली. मनाची वेदना याहून खूप निराळी असते. पत्त्यांचा बंगला साध्या फुंकरेने कोसळतो. मनाचंही तसंच असेल. शारीरिक रचना ही प्रत्येकाची वेगवेगळी असते. तशीच मानसिक रचनादेखील निराळी असते.

एकाच वयाच्या, एकाच सामाजिक, भौगोलिक, राजकीय, आर्थिक साम्य असलेल्या दोन व्यक्ती सारख्या असणं शक्य नाही. त्यांची शरीर रचना थोडीफार असूही शकते सारखी. मात्र मनोरचना ही भिन्नच असते. मनोधैर्य अलीकडच्या काही काळात कमी झालं असावं कदाचित. आपलं मन लहान लेकरासारखं संस्कारी असतं. आपण त्याला जसे संस्कार घातले किंवा त्याच्यावर जसे परिस्थितीने घडलेत तसं ते घडत जातं. तृष्णा व अपेक्षा हे अनेक दुःखांचं कारण असतं. त्यांची पूर्तता झाली तर सुख. नाहीतर दुःख.

आपण कल्पना करतो म्हणून सुखावतो. हेच दुःखांच्याही बाबतीत होत असावं. जर कर्ज असेल, हातून काही अपराध घडला असेल तर त्याची भविष्यातील चित्रे आपण रंगवत जातो. असं झालं तर असं होईल किंवा तसं झालं तर तसं होईल. पण याची सीमा, याची मर्यादा कुठपर्यंत असू शकते याचा विचार करायला हवा. जशी आनंदाला सीमा असते, तशी दुःखालाही असतेच. होऊन होऊन काय होईल ते ‘‘पाहून घेऊ’’ ही तयारी मी तरी ठेवतो.

आज आमच्या गावाजवळ एका शेतकऱ्याने, मुंबईत एका परिवाराने, महाराष्ट्रात आणखी एका ठिकाणी अशा आत्महत्यांच्या बातम्या आल्यात. जीवन संपलं की पुढे काहीच स्कोप नसतो हे नव्याने सांगायलाच नको. पैसा किंवा कर्जबाजारीपणामुळे आत्महत्यांचं प्रमाण आमच्या यवतमाळ जिल्ह्यात जास्त आहे. पांढऱ्या सोन्याचा, ब्लॅक डायमंडचा आमचा परिसर पैशांअभावी आत्महत्या करतोय हाच विरोधाभास आहे. कर्ज जवळपास सर्वांवरच आहे. अगदी शे-दोनशे रूपायांपासून तर अब्जो रूपयांपर्यंतचं कर्ज मोस्टली सगळ्यांवरच असतं. पेशन्स व सकारात्मकता ठेवली तर यातून बाहेर निघता येतं.

बरं एक उदाहरण घेऊ. समजा एखाद्याची मासिक आवक 7-8 हजार रूपये आहे. त्याने 40-50 हजार रूपयांचं कर्ज घेतलं. व्याज वगैरे चढून ते 70-80 हजारांच्याही घरात गेलं. तर गणिताच्या अंगाने विचार केला तर खूपच कठीण आहे. हे थोडं थोडं करून बरंच कमी करता येईल. वेळ लागेल. पण कर्जातून मुक्ती मिळेलच. बरं हा आकडा पाहूनच जीव दिला तर मग काहीच राज नाही. आयुष्य आहे तर आपल्याला काहीही करता येतं. जगदेखील जिंकता येतं. पैसा ही आयुष्यापुढे खूप छोटी गोष्ट आहे. कर्ज आहे म्हणून कुणी आपल्याला चौकात आपल्याला फाशी देणार नाही. हात-पाय छाटणार नाहीत. थोडं सहन व प्रयत्न केलेत तर सगळं चांगलंच होतं.

पारिवारिक समस्या व इमोशनल विषय हेदेखील आत्महत्यांचे कारण होत आहेत. नवरा-बायको यांचं पटत नाही म्हणून आत्महत्या. एकमेकांवर संशय म्हणून आत्महत्या. एकमेकांचा छळ करतात म्हणून आत्महत्या. अशा अनेक बाजू आहेत. एकतर्फी प्रेमभंग हेेदेखील आत्महत्यांचं कारण होत आहे. नवरा-बायकोचं नसेल पटत तर दोघांनी बसलं पाहिजे. चर्चा करावी. सामोपचारानं सगळं स्पष्ट बोलावं. जमलं तर एकत्र यावं नाही तर खुशाल मोकळं व्हावं. कुढत बसण्यापेक्षा स्पष्ट बोललं की मनावरचा बराच ताण हलका होतो. नात्यांमध्ये स्पष्टता येते. स्पष्ट न बोलल्यामुळे अनेकदा गैरसमजाचे धुके दाटतात. यातूनच आत्महत्यांसारखे अपघात होत असतात. एकमेकांशी मोकळं बोललं पाहिजे. वाटल्यास दोघांच्याही जवळच्या कुणाची मध्यस्थी करून चर्चा करता येते. आत्महत्या हा पर्याय होऊच शकत नाही.

एकतर्फी प्रेमातून आत्महत्यांच्या घटना नेहमीच घडतात. तो किंवा ती नकार देते म्हणून आपलं आयुष्य संपविण्यात काय अर्थ आहे? किशोरवयात व तारूण्यात हे जास्त होत असतं. त्याने किंवा तिने नकार दिला तर निग्लेक्ट केलं पाहिजे. कुणामुळेच कुणाचं आयुष्य थांबत नसतं. ‘‘टाईम ईज द बेस्ट सोल्युशन.’’ वेळ गेला की हे प्रेमभंग वगैरे सगळं विसरतं माणूस. वाट पाहा. थांबा. मनासारखा पार्टनर मिळेल आयुष्यात. अशी अनेक उदाहरणे आहेत. अनेकांचा प्रेमभंग झाल्यावर त्यांनी नव्याने संसार सुरू केले. आपापल्या आयुष्यात ते मजेने जगतच आहेत.

विद्यार्थीवर्गात निकालानंतर आत्महत्यांचं प्रमाण दिसतं. दहावी, बारावी किंवा कोणतीही परीक्षा ह्या काही आपल्या आयुष्यापेक्षा मोठ्या कधीच नव्हत्या आणि नाहीतदेखील. झालोच नापास तर सगळंच कुठं संपतं. सप्लिमेंटरी एग्जामस हा पर्याय आहेच. आयुष्य संपल्यावर त्याला सप्लिमेंटरी परीक्षा नसते. पालकांनीदेखील आपल्या पाल्यांवर तसा दबाव आणू नये. या जनरेशनची मुलं अत्यंत सिन्सिअरली अभ्यास करतातच. त्यांच्याशी खुला संवाद नियमित होणं आवश्यक आहे. त्यांना समजून घ्या.

आयुष्य अत्यंत सुंदर आहे. आपण जिवंत असतानाच सगळं काही करू शकतो. कर्ज झालं असेल तर ते फेडू शकतो. अपराध किंवा चूक झाली असेल तर माफी मागू शकतो. ती चूक दुरूस्त करू शकतो. पारिवारिक नातेसंबंध सुधारू शकतो. उत्तम वाचून, ऐकून आपण आपले मनोबल वाढवू शकतो. सगळ्याांत महत्त्वाचं म्हणजे मन मोकळं करता आलं पाहिजे. पैसा, नातं, भावना यांपासून तर सेक्सपर्यंत सगळ्याच विषयांवर मोकळं बोलता आलं पाहिजे कुणासोबत तरी. मोकळं बोलल्यावर प्रॉब्लेम्स लगेच सुटतील असंही नाही. आर्थिक अडचण वगैरे लगेच सॉल्व्ह होऊ शकते. पण त्याहीपेक्षा मनात दाबून ठेवलेले विचार एखाद्या जखमेतील पूसारखे असतात. ते मोकळे झाले की ठणक कमी होते. मी स्वतः या अनेक अनुभवांतून गेलो आहे. आज आत्महत्या करण्यासाठी माझ्याकडे जर दोन प्रमुख बहाणे असतील तर अत्यंत आनंदाने व वैभवात जगण्यासाठी माझ्याकडे 2000 अत्यावश्यक कारणं आहेत. जगण्यातलं सौंदर्य बघा. प्रत्येकाची वेदना ही त्याची त्यालाच माहीत असते. त्याचं त्यालाच सहन करावं लागतं. पण यातून बाहेर निघण्याचा प्रयत्न करावा. तो केलाच पाहिजे. मंगेश पाडगावकरांची मला आवडणारी एक सुंदर कविता देतो, सगळ्यांनी सर्व दुःख विसरून आनंदानं जगण्यासाठी……

सांगा कसं जगायचं
सांगा कसं जगायचं
कण्हत कण्हत
कि गाणं म्हणत
तुम्हीच ठरवा!

डोळे भरून
तुमची आठवण
कोणीतरी काढतच ना
उन उन
दोन घास
तुमच्यासाठी वाढतच ना

शाप देत बसायचं
कि दुवा देत हसायचं
तुम्हीच ठरवा

काळ्याकुट्ट काळोखात
जेंव्हा काही दिसत नसतं
तुमच्यासाठी कोणीतरी
दिवा घेवून उभ असतं

काळोखात कुढायचं
कि प्रकाशात उडायचं
तुम्हीच ठरवा!

पायात काटे रुतून बसतात
हे अगदी खरं असतं
आणि फुलं फुलून येतात
हे काय खरं नसतं

काट्यासारखं सलायचं
कि फुलासारखं फुलायचं
तुम्हीच ठरवा!

पेला अर्धा सरला आहे
असं सुद्धा म्हणता येत
पेला अर्धा भरला आहे
असं सुद्धा म्हणता येत!

सरला आहे म्हणायचं
कि भरला आहे म्हणायचं
तुम्हीच ठरवा!

थोडी मनाची ताकद वाढवली की जगणं अधिक आनंदी करता येतं. नव्याने लढता येतं. आपण आपल्या आयुष्याचे सम्राट, सम्राज्ञी आहोत. हार-जीत, जय-पराजय हा तर जगण्याचा भाग आहे. संपूर्ण जगणं नव्हे. आपल्या विश्वासावर दुःख व संकटांना कधीच हावी होऊ देऊ नका. कारण सुख व दुःखाचे निर्माचे आपणच आहोत. धन्यवाद!

सुनील इंदुवामन ठाकरे

8623053787
9049337606
23 जून २०१८

Leave A Reply

Your email address will not be published.