राजुरा: गावात घरोघरी नागपंचमी सणामुळे गोडधोड करण्याचा बेत आखला गेला. बाहेरगावी शिकणारे मुलंही सणानिमित्त घरी आले होते. सकाळी कुटुंबप्रमुख शिधा आणायला रेशनच्या दुकानात गेले. मात्र लिंक नसल्यामुळे त्यांना खाली हाती परतावं लागलं. आता सण उपाशीपोटी काढावा लागेल या चिंतेत असताना, अचानक आशेचा एक किरण त्यांना दिसला. एक कॉल आणि प्रॉब्लेम सॉल्व याचा प्रत्यय गावक-यांना आला व सर्वांनी सण धुमधडाक्यात साजरा केला. ही कहाणी आहे जामणी या गावातली.
सध्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर माजी आमदार सुदर्शन निमकर यांची जनसंपर्क यात्रा सुरू आहे. सोमवारी 5 ऑगस्टला ते जामणी या गावी गेले होते. जामणी हे गाव आदिवासी बहुल आहे. नागपंचमी हा आदिवासी बांधवांमध्ये महत्त्वाचा सण मानला जातो. मोठ्या उत्साहात ते हा सण साजरा करतात. त्या दिवशी नागपंचमी असल्याने आदिवासी बांधवांमध्ये आनंदाचे वातावरण होते.
नागपंचमीमुळे घरी गोडधोड बनवण्यासाठी रेशनच्या दुकानावर गेले. रेशन मिळण्याची तारीख ही 5 हीच आहे. त्यामुुळे गावकरी रेशन घेण्यासाठी दुकानात गेले. पॉस मशिनवर अंगठा स्टॅम्प करून त्याची नोंद दुकानदाराकडे ठेवली जाते. योग्य लाभार्थ्यांना लाभ व्हावा यासाठी ही पद्धत आहे. पॉस मशिन अंगठ्यावरील ठसे प्रमाणीत करते. मात्र त्या दिवशी लिंकची समस्या निर्माण झाली. प्रशासकीय नियमानुसार ही प्रक्रिया पूर्ण न करता रेशन देता येत नाही. त्यामुळे त्यांना रेशन मिळणार नसल्याचे दुकान चालकांकडून सांगण्यात आले.
सर्व आदिवासी बांधव सणावाराचा दिवस म्हणून घरी गोडधोड बनवण्याच्या तयारीत होते. मात्र रेशन मिळत नसल्याने त्यांचा हिरमोड झाला. त्यांच्याजवळ कोणताही पर्याय नव्हता. दरम्यान माजी आमदार व राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस सुदर्शन निमकर यांची जनसंपर्क यात्रा जामणी येथे पोहोचली. त्यांनी तिथल्या लोकांची भेट घेतली. तिथल्या लोकांनी ही समस्या त्यांच्या कानावर टाकली.
सुदर्शन निमकर यांनी लगेच तिथून तहसिलदार यांना कॉल लावून यासंदर्भात माहिती दिली. तसेच केवळ प्रशासकीय अडचणीमुळे आदिवासी बांधवांना त्यांच्या सण साजरा करता येत नसल्याची खंत बोलून दाखवली. त्यांनी ही समस्या सोडवण्याचे आश्वासन दिले. पुढे त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालय व जिल्हा पुरवठा कार्यालयाला कॉल करून याबाबत माहिती दिली तसेच आता यांनी सण कसा साजरा करावा असा सवाल विचारला. तसेच तांत्रिक अडचण असल्यास आज रेशन देऊन दुस-या दिवशी पॉस मशिनवर अंगठा घेता येत असल्याचेही सुदर्शन निमकर यांनी सूचवले. अखेर प्रशासकीय यंत्रणा कामाला लागली व तहसिलदारांनी रेशन दुकान चालकांना आदिवासी बांधवांना रेशन देण्याचा आदेश दिला.
सुदर्शन निमकर यांच्या प्रयत्नामुळे आदिवासी बांधवांना रेशन मिळाले. केवळ एका कॉलमुळे त्यांची समस्या दूर झाली. त्यामुळे जामणी वासियांनी त्यांचे आभार मानले. याचा आनंद म्हणून जामणी वासियांनी उपस्थित पाहुण्याचे तोंड गोड केले.