वाघिणीच्या मृत्यू प्रकरणी 2 आरोपींना अटक

शेकडोंच्या फौजफाट्यासह पांढरवाणी गावात धाड

0

सुशील ओझा, झरी: मांगुर्ला जंगल परिसरातील एका गुहेत रविवारी दिनांक 25 एप्रिल रोजी एका वाघिणीची निघृण हत्या झाल्याचे उघडकीस आले होते. ही हत्या इतकी निर्घृण होती हत्या करणा-यांनी गुहेसमोर आग लावली व वाघिणीचे दोन्ही पंजे तोडून नेले होते. या प्रकरणी आज पांढरवाणी (दुभाटी) या गावातून 2 आरोपींना अटक करण्यात आली आहे. तर आणखी दोन आरोपी फरार असल्याची प्राथमिक माहिती आहे. आरोपींकडून पंजे तसेच हत्या करण्यासाठी वापरण्यात आलेली बल्लम जप्त करण्यात आली आहे. वाघिणीच्या हत्येमुळे केवळ जिल्ह्यातच नव्हे तर संपूर्ण राज्यभरात खळबळ उडाली होती. नखांसाठी ही शिकार केल्याची शक्यता वर्तवण्यात येत होती.

पांढरकवडा वनविभागाच्या मुकुटबन परिक्षेत्रातील मांगुर्ला जवळ वन क्रमांक 30 मध्ये एका नाल्याच्या जवळील एका गुहेत एक वाघ मृत अवस्थेत असल्याची माहिती रविवारी सकाळी वनविभागाला मिळाली. त्यावरून वनविभागाची टीम तसेच डॉक्टर व व्याघ्र संवर्धनाचे प्रतिनिधी सदर ठिकाणी पोहोचले. त्यावेळी त्यांना गुहेच्या तोंडाशी आग लावल्याचे जळालेल्या लाकडांवरून आढळून आले. तसेच वाघिणीच्या गळ्यात फास आढळला व तिच्या शरीरावर हत्याराने वार केल्याचे आढळून आले.

वाघिणीच्या पुढच्या पायाचे दोन्ही पंजे गायब होते. त्यामुळे शिकारीच्या उद्देशाने ही हत्या झाल्याची शक्यता वर्तवली जात होती. तसेच ही वाघिण गर्भवती असल्याची देखील परिसरात चर्चा होता. वाघिणीच्या हत्येमुळे संपूर्ण जिल्ह्यात एकच खळबळ उडाली होती. एसपी आणि जिल्हाधिकारी यांनी तातडीने या प्रकरणाचा छडा लावण्याचे आदेश दिले होते. घटना उघडकीस येताच मुकुटबन पोलीस विभाग आणि वनविभाग प्रकरणाचा छडा लावण्याचा प्रयत्न करत होते. मुकुटबनच्या ठाणेदारांनी गावोगावातील खबरींना तसेच पोलीस कर्मचा-यांना कामाला लावले.

शेकडोंच्या फौजफाट्यासह गावात धाड
दरम्यान मुकुटबन पोलिसांना या प्रकऱणाचे कनेक्शन तालुक्यातील पांढरवाणी (दुभाटी) या गावात असल्याचा सुगावा लागला. त्यांनी तातडीने याबाबत वरिष्ठांना माहिती दिली. त्यानुसार गावात धाड टाकण्याचा प्लान झाला. यवतमाळ, मुकुटबन, शिरपूर, पाटण, वणी येथील पोलीस कर्मचारी, वनविभागाचे कर्मचारी, उपविभागीय पोलीस अधिकारी संजय पुजलवार, एलसीबी पथकाचे प्रमुख हे देखील यावेळी उपस्थित होते. सुमारे 20 ते 25 चारचाकी वाहणांचा व सुमारे 100 च्या वर कर्मचा-यांचा फौजफाटा दुपारी पांढरवाणी गावात दाखल झाला.

पोलिसांनी गावाला घेराव घातला व नाकांबदी करून गावात सर्च ऑपरेशन राबवले. सुमारे 5 वाजताच्या सुमारास गावातील 2 आरोपींना अटक केली. आरोपींकडून वाघाचा पंजा तसेच हत्या करण्यासाठी वापरण्यात आलेली बल्लम जप्त कऱण्यात आली. या प्रकरणात आणखी आरोपी असण्याची शक्यता आहे. आरोपींनी वाघिणीची हत्या कोणत्या कारणासाठी केली हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. याबाबत संध्याकाळी 8 वाजता जिल्हाधिकारी, जिल्हा पोलिस अधीक्षक व पालकमंत्री यांनी पांढरकवडा येथे पत्रकार परिषद आयोजित केली आहे. (पत्रकार परिषदेनंतर सदर बातमी अपडेट करण्यात येईल.)

हे देखील वाचा:

मृत वाघीण होती 2 महिन्यांची गर्भवती… असा लागला प्रकरणाचा छडा….

सलग दुस-या दिवशी तालुक्यात कोरोना रुग्णांपेक्षा कोरोनामुक्त अधिक

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments
Loading...
error: कॉपी करू नका, बातमी आवडल्यास शेअर करा !!