कोरोना निर्मुलन मोहीम हाताळण्यात सर्वच राजकीय नेते अपयशी

लसीकरण, पुरेशा आरोग्यसेवेला खीळ मात्र गाजावाज्यात नेते मशगुल

0

जितेंद्र कोठारी, वणी: तालुक्यात कोरोना रुग्णांच्या संख्येत दररोज वाढ होत आहे. कोरोनाकाळात राजकीय नेत्यांकडून श्रेयाची लढाई देखील जोमात सुरू आहे. मात्र कोरोनाकाळातील पुरेशा आरोग्य सेवा नागरिकांना पुरवण्यात परिसरातील जवळपास सर्वच राजकीय नेते अपयशी ठरताना दिसत आहे. हॉस्पिटलमध्ये पुरेशा सोयी सुविधा असलेले बेड नाही, लसीकरण मोहीम थंडावली आहे. रुग्णवाहिकेच्या अभावामुळे रुग्णाला हलवण्यासाठी अवाच्या सव्वा पैसे मोजावे लागत आहे. तालुक्यात शासकीय यंत्रणेकडे व्हेंटीलेटर नाही. गंभीर रुग्णांनी काळाबाजारातून इंजेक्शन विकत घेतले. परिसरात शेकडो आरोग्य विषयक समस्या असताना या सोडवण्यात राजकीय नेते अपयशी ठरताना दिसत आहे.

1 मे पासून राज्यात 18 वर्षावरील युवकांना कोरोना प्रतिबंधात्मक लस देण्याची घोषणा राज्य शासनाने केली होती. मात्र वणी तालुक्यात 45 वर्षावरील हजारों नागरिक अद्यापही लसीची पहिली डोजच्या तर ज्येष्ठ नागरिक दुसऱ्या डोजसाठी रांगेत असल्याची माहिती आहे. तालुक्यात वणी ग्रामीण रुग्णालय परिसरात 2 तसेच ग्रामीण भागात 8 लसीकरण केंद्र कार्यान्वित करण्यात आले आहे. तालुक्यात आतापर्यंत फक्त 18 हजार नागरिकांचे लसीकरण झाले आहे. जिल्ह्यात पुसद, दारव्हा, यवतमाळ व पांढरकवडा येथे 18 वर्षांवरील नागरिकांसाठी लसीकरणासाठी केद्र आहे. मात्र यात वणीचा नंबरच नाही ही एक शोकांतिका आहे. 

ट्रामा केअर सेंटरमधले ऑक्सिजन सिलिंडर ठरले शोपीस
ग्रामीण रुग्णालय परिसरात ट्रामा केअर सेंटरमध्ये 50 बेडचे अत्याधुनिक उपचार केंद्र सुरु करण्यात येईल असा गाजावाजा करण्यात आला. मात्र तिथे प्रत्यक्षात जेमतेम 20 बेडचे डिसीएचसी सेंटर सुरु करण्यात आले आहे. सध्याची सर्वाधिक मागणी असलेली गोष्ट म्हणजे ऑक्सिजन सिलिंडर. ट्रामा केअर सेंटरमध्ये ऑक्सिजन सिलिंडर आहेत. मात्र ऑक्सिजन बेड नसल्याने हे सिलिंडर सध्या शोपीस झाले आहे. डॉक्टर, आरोग्य कर्मचारी, बेड व ऑक्सिजनच्या अभावी तेथील रुग्णाचे हाल होत आहे. परिणामी अपुऱ्या यंत्रणेमुळे गंभीर रुग्णांना चंद्रपूर, यवतमाळ, नागपूर, आदीलाबाद येथे न्यावे लागत आहे. तिथेही नागरिकांची चांगलीच आर्थिक लूट होताना दिसत आहे. दरम्यान ट्रामा केअर सेंटरमधल्या अपु-या सोयी सुविधेबाबचे लफ्तरं वेशीवर टांगणारा व्हिडीओ देखील सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला होता.

सोयी सुविधेचा अभाव पण गाजावाजा पुरेसा…
वणीमध्ये विधानसभा व नगरपालिका भाजपच्या ताब्यात आहे. इथे महाविकास आघाडीचे पक्ष विरोधी पक्षात आहे. तर राज्यात महाविकास आघाडीची सत्ता आहे. इथे भाजप विरोधी पक्षात आहे. शिवसेना, कांग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसचे पुढारी हे सत्तेत असून सुद्धा राज्य शासनावर दबाव आणून कोणत्याही सोयी पुरवण्यात आक्रमक नाही. राज्यातील परिस्थितीबाबत विरोधी पक्ष तावाने युक्तीवाद करतात, मात्र स्थानिक पातळीवर त्यांना देखील पुरेशा आरोग्य सुविधा देण्यात यश आलेले नाही.

लोकप्रतिनिधी व इतर पक्ष संघटनेचे नेते कोरोना रुग्णांना शासनाने सुविधा उपलब्ध करून देण्याची केवळ मागणी या व्यतिरिक्त काहीही हालचाल करताना निदर्शनास येत नाही. या मागणीचे पुढे काहीही होत नाही. ही मागणी केवळ गाजावाजा करण्यापुरतीच उरते. जिल्ह्याचे पालकमंत्री संदीपान भुमरे यांच्या उपस्थितीत एक एम्बुलेन्स कोरोना रुग्णाच्या सेवेकरिता ग्रामीण रुग्णालयाला भेट दिली गेली. मात्र चालक, इंधन व ऑक्सिजनच्या अभावी सदर एम्बुलेन्स रुग्णालयात शोपीस म्हणून उभी आहे.

हे देखील वाचा:

निष्ठावंत शिवसैनिक सुभाष ताजने यांचे अल्पशा आजारांने निधन

समाजसेवक गणेश सुंकुरवार यांचे निधन

Leave A Reply

Your email address will not be published.