आज 53 रुग्ण कोरोनामुक्त, दोन दिवसांत 100 पेक्षा अधिकांची कोरोनावर मात

आज तालुक्यात 33 पॉझिटिव्ह, उपचारादरम्यान दोघांचा मृत्यू

0

जब्बार चीनी, वणी: एकीकडे तालुक्यात कोरोना रुग्णसंख्या वाढत असताना दुसरीकडे दिलासादायक बाब म्हणजे कोरोनामुक्त होणा-यांची संख्या वाढत आहे. आज रविवारी दिनांक 18 एप्रिल रोजी 53 कोरोनामुक्त व्यक्तींना सुटी देण्यात आली. काल 54 लोकांना सुटी देण्यात आली होती. अवघ्या दोन दिवसात 100 पेक्षा अधिक लोक कोरोनामुक्त झाल्याने या कठीण काळात काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे. दरम्यान कोरोनाचा प्रकोप पाहता जिल्हाधिकारी यांच्या सूचनेनुसार अत्यावश्यक सेवेच्या वेळेत बदल करण्यात आला आहे.

आज तालुक्यात शासकीय लॅबनुसार कोरोनाचे 33 रुग्ण आढळून आलेत. यात वणी शहरातील 16 रुग्ण तर ग्रामीण भागातील 17 रुग्ण आहेत. याशिवाय झरी तालुक्यातील 2 रुग्ण वणी येथे पॉजिटिव्ह आढळून आले आहेत. याशिवाय आज वणी येथील एका 60 वर्षीय पुरुषाचा व झरी येथील एका 60 वर्षीय पुरुषाचा यवतमाळ येथे उपचारादरम्यान मृत्यू झाला. आज आलेल्या रुग्णांमुळे तालुक्यातील ऍक्टिव्ह रुग्णांची संख्या 355 झाली आहे.

आज शहरात आलेल्या 14 पॉझिटिव्हमध्ये वसंत गंगा विहार येथे सर्वाधिक 4 रुग्ण, तर कोर्ट येथे 2 रुग्ण पॉझिटिव्ह आलेत. याशिवाय जैन ले आऊट, नृसिंह व्यायाम शाळा जवळ, भगतसिंग चौक, मनिषनगर, सेवानगर, सम्राट अशोक नगर, भोंगळे ले आउट, लक्ष्मी नगर येथे प्रत्येकी 1 रुग्ण आढळून आला. तर ग्रामीण भागात निवली येथे 3 रुग्ण, डोंगरगाव (दहेगाव), छोरिया ले आऊट (गणेशपूर), कोरंबी मारेगाव येथे प्रत्येकी 2 रुग्ण आढळले आहेत. याशिवाय मंदर, शेलू, भालर, राजूर, चिखलगाव, मोहदा, निंबाळा येथे प्रत्येकी 1 रुग्ण आढळून आला आहे.

आज यवतमाळ येथून 73 अहवाल प्राप्त झाले. यात 6 जण पॉजिटिव्ह आलेत. तर आज 132 संशयीतांची रॅपिट ऍन्टीजन टेस्ट करण्यात आली. यात 27 व्यक्ती पॉजिटिव्ह आलेत. आज आलेल्या रुग्णांवरून 431 संशयीतांचे स्वॅब यवतमाळ येथे तपासणीसाठी पाठवण्यात आले. अद्याप यवतमाळहून 869 संशयीतांचे रिपोर्ट येणे बाकी आहे.

सध्या तालुक्यात 355 ऍक्टिव्ह रुग्ण (शासकीय लॅबच्या आकड्यानुसार) आहेत. यातील 64 रुग्ण कोविड केअर सेंटरला उपचार घेत आहेत. तर 248 रुग्ण होम आयसोलेट आहेत. 43 रुग्णांवर यवतमाळ व इतर ठिकाणी उपचार सुरू आहे. तालुक्यात कोरोनाचे एकूण 2138 रुग्ण आढळून आलेत. यातील 1750 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. तर 33 रुग्णांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. (यात बाहेरगावी उपचार सुरू असताना मृत झालेल्या रुग्णांचा समावेश नाही.)

अत्यावश्यक सेवेच्या वेळेत बदल
कोरोना आटोक्यात आणण्यासाठी जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी आता कडक पाऊले उचलली आहेत. अत्यावश्यक दुकाने केवळ सकाळी सात ते दुपारी दोन वाजेपर्यंत खुली राहतील.  वैद्यकीय सेवा, सार्वजनिक वाहतूक, पाणी पुरवठा, एटीएम, विद्युत व गॅस सिलेंडर पुरवठा आदी सेवा सकाळी 7 ते रात्री 8 वाजेपर्यंत सुरु राहतील, उर्वरित अत्यावश्यक सेवा आणि सूट देण्यात आलेल्या बाबी सकाळी 7 ते दुपारी 2 वाजेपर्यंतच सुरु राहतील असे आदेश जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष अमोल येडगे यांनी आज येथे जारी केले आहे. याशिवाय विनाकारण रस्त्यावर फिरणाऱ्या लोकांवर कडक कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत.

वणी बहुगुणी हे देखील वाचा:

सेवानिवृत्त शिक्षकाला 58 लाखांचा गंडा घालणारा नटवरलाल अटकेत

लॉकडाऊनमध्ये मयूर मार्केटिंगतर्फे ऑनलाईन सेवा सुरू

Leave A Reply

Your email address will not be published.