अन् जेव्हा चक्क लोकप्रतिनिधीलाच लागतो मटका…!

ठाणेदारांसमोर ग्रामीण भागातील अवैध धंदे रोखण्याचे आव्हान

जितेंद्र कोठारी, वणी: परिसरातील अवैध धंदे बंद करावे यासाठी लोकप्रतिनिधी आंदोलन किंवा निवेदन देताना आपण नेहमीच पाहतो. मात्र इथे एका लोकप्रतिनिधीलाच थोडा थोडका नव्हे तर चक्क 90 हजारांचा मटका लागल्याची खमंग चर्चा सध्या शहरापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या एका गावात रंगली आहे. अनेक दिवसांपासून ‘भाऊं’चे डाव खाली गेले होते. मात्र 90 हजारांनी भाऊंची आधीची बरीच कसर भरुन काढल्याचे बोलले जात आहे.

Podar School 2025

जसे शेअर मार्केटमध्ये स्टॉक मार्केट एक्सपर्ट असतात व त्यांच्या मदतीने लोक शेअर मार्केटमध्ये पैसे गुंतवतात. तसेच या गावात अनेक आकडेमोड एक्सपर्ट आहेत. अनेक लोक या आकडेमोड तज्ज्ञांचा सल्ला घेऊन आपल्या कमाईतील ‘गुंतवणूक’ करतात. जर तंतोतंत आकडा फसला तर त्याला काही ‘कन्सल्टन्सी’ फी दिली जाते.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

गेल्या अनेक दिवसांपासून भाऊंचा प्रयत्न सुरू होता. मात्र भाऊंना मोठा हात काही केल्या मारता आला नव्हता. अखेर दोन-तीन दिवसांपूर्वी ‘कन्सल्टन्ट’च्या सल्याने भाऊंच्या नशिबाचे दिप उजळले व भाऊंना तब्बल 90 हजारांचा मटका लागल्याची खबर गावभर पसरली. तसा भाऊंचा वन मॅन शो असल्याने कार्यकर्त्यांची रेलचेल भाऊंच्या मागे नसते. त्यामुळे कार्यकत्यांसोबत चांगल्या चिकन मटनाच्या पार्ट्या रंगल्याची अद्याप माहिती नाही. भाऊंना खरच मटका लागला का? याविषयी निश्चित नसली तरी गावात चौकाचौकात रंगलेल्या खमंग चर्चेने सध्या वातावरणात चांगलाच बहर आणला आहे. 

यवतमाळ रोडवर शहरापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या या गावात मटका सध्या चांगलाच फोफावला आहे. यात गावातील व्यापारी, ट्यूशन चालक, प्रतिष्ठीत, कार्यकर्ते, नेते इतकंच काय तर महिला आणि लोकप्रतिनिधीही मटका लावण्यात चांगलेच गुंतले आहे. विविध सामाजिक चळवळी, वैविध्यपूर्ण सांस्कृतिक व धार्मिक वातावरणाने नटलेल्या या गावात अलिकडे अवैध धंद्याने आपले पाय रोवले आहे. देशासाठी शहीद होणा-या हुतात्म्याचा चौकही आता मटक्यासाठी ओळखला जातो. केवळ मटकाच नाही तर अवैध दारूने देखील या गावात चांगलेच डोके वर काढले आहे. त्यामुळे गावाची सांस्कृतिक ओळख मिटत असल्याची खंत व्यक्त केली जात आहे.

नवीन ठाणेदारांसमोर अवैध धंदे रोखण्याचे आव्हान
नुकताच पोलीस निरीक्षक शाम सोनटक्के यांनी वणी पोलीस स्टेशनच्या ठाणेदार पदाचा पदभार स्वीकारला आहे. तत्कालीन ठाणेदार वैभव जाधव यांच्या काळात राजरोसपणे चालणा-या मटक्यावर ब-यापैकी अंकुश ठेवण्यात आला. नंतर मात्र छुप्या मार्गाने अवैध धंद्यांनी डोके वर काढले. सध्या अनेक गावखेड्यात कुठे छुप्यारितीने तर कुठे राजरोसपणे मटका, जुगार, भंगार चोरी, कोळसा चोरी, रेती तस्करी व इतर अवैध व्यवसाय सुरु आहे. अशा अवैध धंद्यावर अंकुश लावून एक ‘डॅशिंग’ अधिकारी म्हणून सर्वसामान्यांमध्ये प्रतिमा उंचावण्याची ठाणेदारांना चांगली संधी आहे.

हे देखील वाचा:

मयूर मार्केटिंगमध्ये बाप्पा मोरया ऑफरला सुरूवात

Comments are closed.