पीओपी मूर्ती विक्रेत्यांवर कारवाईला सुरुवात, 5 मूर्ती विक्रेत्यांवर कारवाई

नगर पालिका पथकासह आता महसूलचे पथकही सज्ज

पुरुषोत्तम नवघरे, वणी: प्लास्टर ऑफ पॅरिसच्या (पीओपी) मूर्तीच्या विक्रीविरोधात मूर्तीकार संघटना काल आक्रमक झाली होती. त्यांनी जोरदार घोषणाबाजी करत तहसील कार्यालय गाठले. संध्याकाळी मूर्तीकार संघटनेच्या सदस्यांची तहसीलदार रवींद्र कापसीकर व नगराध्यक्ष तारेंद्र बोर्डे यांच्यासोबत बैठक झाली. या बैठकीत सकारात्मक तोडगा निघाला. आजपासून पीओपी मूर्ती विक्रेत्यांवर नगर पालिका व महसूल प्रशासनाचे संयुक्त पथकाने कारवाई सुरू केली आहे. सकाळी 9 वाजता या कारवाईला सुरूवात झाली. 10.30 वाजेपर्यंत 5 मूर्ती विक्रेत्यांवर कारवाई करण्यात आली आहे. पीओपी मूर्तीची विक्री तसेच विना परवाना विक्रीसाठी त्यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे. रात्रीच पीओपी मूर्तीची विक्री करणा-या विक्रेत्यांना पोलीस प्रशासनातर्फे नोटीस देण्यात आली होती.

शहरात सध्या पाण्याच्या टाकीजवळील शासकीय मैदानावर मूर्ती विक्री सुरू आहे. गणेशोत्सवात प्लास्टर ऑफ पॅरिसच्या (पीओपी) मूर्त्यांची विक्री होऊ देऊ नये अशी मागणी वणीतील मूर्तीकार संघटनेतर्फे करण्यात आली होती. त्यांच्या मागणीवर कार्यवाही करत नगरपालिकेने कारवाई पथकाची स्थापना केली. मात्र त्यानंतरही शहरात पीओपीच्या मूर्त्यांची सर्रास विक्री होत असल्याने मूर्तीकार संघटनेचे सदस्य संतप्त झाले होते. त्यांनी गुरुवारी संध्याकाळी पाण्याच्या टाकीजवळ पालिकेच्या पथकासमोर जोरदार घोषणाबाजी करत याचा निषेध केला व आपला मोर्चा तहसील कार्यालयाकडे वळवला. दरम्यान नगराध्यक्ष तारेंद्र बोर्डे यांनी देखील तहसील कार्यालयात जाऊन संघटनेच्या सदस्यांची भेट घेतली. संध्याकाळी तहसील कार्यालयात संघटनेचे सदस्य, तहसीलदार रवींद्र कापसीकर व नगराध्यक्ष तारेंद्र बोर्डे यांच्यामध्ये बैठक झाली. रात्री 9 वाजेपर्यंत ही बैठक चालली. बैठकीत सकारात्मक तोडगा निघाला.

बैठकीत नगर पालिकेला कारवाई संदर्भात बंधने आहे. त्यामुळे कारवाईसाठी महसूल प्रशासनाचे पथक ही स्थापन करण्यात आले आहे. कारवाई दरम्यान कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न उद्भवून नये म्हणून पोलीस पथकाची मदत घेतली जाणार आहे. आज शुक्रवारी सकाळपासून कार्यवाहीला सुरूवात झाली आहे. दरम्यान पीओपी मूर्ती विक्रेत्यांनी तातडीने पीओपी मूर्ती विक्री थांबवावी, अन्यथा कारवाई करण्यात येईल अशा आषयाची नोटीस रात्री उशिरा पोलीस विभागातर्फे देण्यात आली आहे.

दुकानदारांना केवळ मातीच्या मूर्ती विक्रीचाच परवाना: नगराध्यक्ष
पालिकेने मातीच्या मूर्ती विक्रेत्यांनाच विक्रीचा परवाना दिला आहे. मात्र कायद्यातून पळवाट शोधत काही मूर्ती विक्रेते पीओपीच्या मूर्तीची विक्री करीत होते. तांत्रिक बाबींमुळे कारवाईचा अधिकार हा पालिकेला नसून तो महसूल प्रशासनाला आहे. त्यामुळे आता पालिका प्रशासन व महसूल प्रशासनाचे संयुक्त पथक आज कारवाई करणार आहे. सकाळी हे पथक कारवाईसाठी गेले आहे. विना परवाना मूर्ती विकणारे तसेच पीओपी मूर्ती विक्रेते यावर आज 100 टक्के कारवाई होणार.
– तारेंद्र बोर्डे, नगराध्यक्ष वणी

आज सकाळी 9 वाजताच्या सुमारास पीओपीच्या मूर्तीची विक्री करणा-या विक्रेत्यांवर संयुक्त पथकाने कारवाईला  सुरूवात केली. वृत्त लिहे पर्यंत 5 विक्रेत्यांवर कारवाई करण्यात आली आहे. यावेळी तहसीलदार रवींद्र कापसीकर, मंडळ अधिकार, तलाठी, नगरपालिकेचे पथक व पोलीस पथक उपस्थित होते.  

(Updated News)

हे देखील वाचा:

शासकीय मैदानावर मूर्तीकारांची जोरदार घोषणाबाजी

तहसील कार्यालयाजवळ एका दुचाकीस्वारावर कोसळला वृक्ष

आझाद इलेक्ट्रॉनिक्समध्ये रेफ्रिजरेटरवर चक्क मायक्रोव्हेव ओव्हन फ्री

मयूर मार्केटिंगमध्ये बाप्पा मोरया ऑफरला सुरूवात

Comments are closed.