भास्कर राऊत, मारेगाव: तालुक्यातील चिंचमंडळ येथे एका तरुण अल्पभुधारक शेतक-यांने घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. आज दि. 15 जुलै ला दुपारी 12 वाजताच्या दरम्यान ही घटना उघडकीस आली. विकास मारोती तोडासे (32) असे मृतकाचे नाव आहे. सततची नापिकी आणि कर्जबाजारीपणा या सगळ्याला कंटाळून आत्महत्येचे पाऊल उचलले असल्याचे गावात बोलले जात आहे.
विकास मारोती तोडासे (32) हा चिंचमंडळ येथील रहिवाशी होता. विकासच्या वडिलांकडे 3 एकर शेती होती. त्यातील प्रत्येकी दीड एकर शेती विकास व त्याच्या भावाच्या वाट्याला आली होती. ही दीड एकर शेती तो वाहायचा. एवढ्यात भागत नसल्याने तो मजुरी करायचा.
अवघी दीड एकर शेती. त्या शेतीतही उत्पन्न होत नव्हते. त्यामुळे विकास कर्जाच्या खाईत लोटलेला होता. अशातच शेतीसाठी बँकेसोबतच खासगी सावकाराकडूनही कर्ज घेतले असल्याची माहिती आहे. आज दुपारी दुपारी 12 वाजताच्या दरम्यान विकासने स्वतःच्या घरी फाट्याला दोर लावून गळफास घेतला.
विकासच्या मागे आई, पत्नी, 10 वर्षाची मुलगी आणि 8 वर्षाचा मुलगा आहे. या प्रकरणाचा तपास मारेगाव पोलीस करीत आहेत. मारेगाव तालुका सततच्या आत्महत्येने हादरून गेला आहे. मात्र अद्याप याकडे कोणत्याही लोकप्रतिनिधींनी लक्ष दिलेले नाही हे विशेष.
हे देखील वाचा: