संपामुळे वणीतील शासकीय कार्यालयात शुकशुकाट, व्यवहार ठप्प
दोन दिवस शासकीय व निम शासकीय कर्मचा-यांचा संप... कामासाठी आलेले लोक आल्यापावली परत
जब्बार चीनी, वणी: राज्यातील सरकारी कर्मचाऱ्यांनी दोन दिवस संपाची हाक दिली आहे. त्यामुळे आज वणीतील विविध शासकीय कार्यालयात शुकशुकात दिसून आला. हा संप आजपासून दोन दिवस चालणार आहे. जुनी पेन्शन योजना लागू करणे यासह विविध मागण्यांसाठी हा संप पुकारण्यात आला आहे. या संपात सरकारी आणि निमसरकारी कर्मचारी, शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी, आरोग्य विभागाचे कर्मचारी, वाहन चालक, चतुर्थ श्रेणी कर्मचारी व सर्व विभागातील खाते संघटनांचे वणीतील सुमारे 150 पेक्षा अधिक कर्मचारी सहभागी झाले आहेत.
बुधवारी दिनांक 23 फेब्रुवारी रोजी सकाळी 10.30 वाजता वणीतील सर्व शासकीय व निमशासकीय विभागातील कर्मचारी वणीतील तहसिल कार्यालयाजवळ गोळा झाले. कर्मचा-यांचे प्रश्न तात्काळ सोडवा, हमारी मांगे पुरे करो असे नारे देत त्यांनी आपल्या मागण्या मांडत निषेध व्यक्त केला. संपामुळे एरव्ही लोकांनी गजबजलेले तहसिल आणि रजिस्ट्री (दुय्यम निबंधक) कार्यालयात शुकशुकाट दिसून आला. हिच परिस्थिती इतर शासकीय कार्यालयातही होती.
संपाची कल्पना नसल्याने अनेक लोक शासकीय कामासाठी सकाळी कार्यालयात पोहोचले. मात्र संपामुळे त्यांना आल्या पावली परत फिरावे लागले. नगरपालिका व पंचायत समिती कर्मचा-यांनी या संपाला पाठिंबा दिला आहे. मात्र ते संपात सहभागी नसल्याने हे कार्यालय सुरू होते. संप मिटण्याची शक्यता कमी असल्याने उद्याही कार्यालय बंद राहून व्यवहार ठप्प राहणार आहे.
संपात सर्व कर्मचारी सहभागी – जितू पाटील
जुनी पेन्शन योजना लागू करा ही आमची प्रमुख मागणी आहे. मंत्रालयात आमच्या संघटनेच्या पदाधिका-यांची बैठक सुरु आहे. आज जर यावर तोडगा निघाला तर उद्या संप होणार नाही. संपात महसूल, आरोग्य विभाग, वनविभाग इ. सरकारी विभाग तसेच शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी इत्यादी सहभागी होते. जर तोडगा निघाला नाही तर संघटनेचा जो निर्णय़ असेल त्यानुसार पुढली दिशा ठरवली जाईल.
– जितू पाटील, कार्याध्यक्ष, महसूल कर्मचारी संघटना, जिल्हा यवतमाळ
राज्यातील सरकारी कर्मचाऱ्यांची नोकरभरती, जुनी पेन्शन योजना, अंगणवाडी, आशा वर्कर्स इत्यादींना सेवेत नियमित करावे, आरोग्य विभागातील रिक्त पदे भरावीत, अनुकंपा तत्त्वावरील नियुक्त्या कराव्यात, निवृत्तीचे वय वाढवावे इत्यादी मागण्यांसाठी हा संप पुकारला आहे.
आंदोलनात विलास टोंगे, नितीन खडतकर, उमेश खापने, राहुल तागडे, रोहिणी मोहितकर, योगिता विरुटकर, राजू डवरे, राजू बोकडे, पवन धांदे, सुनिल क्षीरसागर, मंगेश खामनकर, पुरुषोत्तम मेश्राम, माधुरी कावडे, अश्विनी गोहोकर, प्रज्ञा मेश्राम, मीनल बेझलवर इत्यांदीसह सहा सरकारी व निमसरकारी संघटनेचे सदस्य उपस्थित होते.
हे देखील वाचा:
…आणि खुद्द नगराध्यक्षच राहायचे गैरहजर: सत्ता येऊनही तोटा झालेली टर्म
Comments are closed.