विवेक तोटेवार, वणी: चॅम्पियन लीग म्हणजे तळागाळातील खेळाडुंना मिळालेली एक महत्त्वाची संधी असून यातून नक्कीच देशाचे प्रतिनिधीत्व करणारे खेळाडू तयार होईल, अशी आशा भाजपचे जिल्हाध्यक्ष नितीन भुतडा यांनी व्यक्त केली. ते T-10 चॅम्पियन लीगच्या उद्घाटनप्रसंगी झालेल्या अध्यक्षीय भाषणात बोलत होते. केवळ वणी शहरातच नव्हे तर संपूर्ण विदर्भात ज्या क्रिकेट स्पर्धेची चर्चा होती त्या T-10 चॅम्पियन लीगचे आज गुरुवारी सकाळी 12 वाजता माजी केंद्रीय मंत्री हंसराज अहिर यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. तर कार्यक्रमाला नितीन भुतडा हे अध्यक्ष होते. आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार यांची या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून उपस्थिती होती. पारसमल प्रेमराज ज्वेलर्सतर्फे या चॅम्पियन लीगचे आयोजन करण्यात आले आहे.
उद्घाटन प्रसंगी व्यासपिठावर विजय पिदूरकर, माजी नगराध्यक्ष तारेंद्र बोर्डे, पंचायत समिती सभापती संजय पिंपळशेंडे, उपविभागीय अधिकारी शरद जावळे, उपविभागीय पोलीस अधिकारी संजय पुज्जलवार, विजय चोरडिया, कुणाल चोरडिया, संदीप बेसरकर यांची उपस्थिती होती. कार्यक्रमाचे प्रास्ताविक स्पर्धेचे संयोजक ऍड कुणाल चोरडिया यांनी केले. स्थानिक तसेच ग्रामीण भागातील खेळाडुंना चालना मिळावी, खेळाडु वृत्ती जागृत राहावी यासाठी या लीगचे आयोजन करण्यात आले, केवळ जिल्हाच नाही तर संपूर्ण विदर्भातील ही सर्वात मोठी क्रिकेट स्पर्धा आहे. असे मनोगत यावेळी ऍड कुणाल चोरडिया यांनी व्यक्त केले.
उद्घाटनपर भाषणात बोलताना माजी केंद्रीय मंत्री हंसराज अहिर म्हणाले की देशाचा प्रत्येक तरुण हा खेळाडू बनला पाहिजे. निरोगी जीवनासाठी खेळ खेळणे अत्यंत गरजेचे आहे. असे ते म्हणाले. यापुढेही सातत्याने अशा स्पर्धा व्हायला पाहिजे. त्यामुळे खेळाडुंना प्रोत्साहन मिळेल व खेळालाही चालना मिळेल, असेही ते म्हणाले. आमदार संजीवरेड्डी बोदकूरवार यांनी मनोगत व्यक्त करताना वणीच्या इतिहास पहिल्यांदाच अशी स्पर्धेचे आयोजन केले जात असल्याने संयोजक ऍड कुणाल चोरडिया यांचे अभिनंदन केले. तसेच माझ्या आमदारकीच्या कारकिर्दीत ही स्पर्धा होत असल्याने माझ्यासाठी ही बाब गौरवास्पद असल्याचेही ते म्हणाले.
उद्घाटन प्रसंगी भाजपचे जिल्हाध्यक्ष नितीन भुतडा यांना आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार यांनी बॉलिंग केली. याचा उपस्थितांनी मनमुराद आनंद लुटत मान्यवरांच्या खेळाला चांगलीच दाद दिली. कार्यक्रमाचे संचालन ओम सोनुने यांनी केले तर उपस्थितांचे आभार मनिष गायकवाड यांनी मानले. उद्घाटन झाल्यानंतर लगेच श्रीराम वॉरिअर्स X 11 टायगर्स रिअरिंग यांच्यात पहिला सामन्याला सुरूवात झाली. या चॅम्पियन लीगला मोठ्या संख्यने उपस्थिती दर्शवावी असे आवाहन ऍड कुणाल चोरडिया यांच्यातर्फे करण्यात आले आहे.
लेफ्टनंट कर्नल वासूदेव आवारी यांना श्रद्धांजली
दोन दिवसांआधी कर्तव्य बजावत असताना निधन झालेले ले. कर्नल वासूदेव आवारी यांचे उद्घाटनपर कार्यक्रमात सर्व मान्यवरांकडून स्मरण करण्यात आले. आयोजकांतर्फे बँड आणि फटाक्याच्या आतषबाजीला मुठमाती देत श्रद्धांजली वाहण्यात आली. तर आज होणा-या सर्व सामन्यांमध्ये खेळाडू हाताला काळी फिती लावून ले. कर्नल यांना श्रद्धांजली वाहणार आहे.
असे आहेत संघ –
तारेंद्र बोर्डे – श्रीराम वॉरिअर्स, संबा वाघमारे – टायगर रोअरिंग 11, जमीर खान – आमेर नाईट राईडर्स, सुधीर पेटकर – जय महाकाली वणी, गजेंद्र काकडे – छत्रपती वॉरिअर्स, मोईस मिनाज शेख – जन्नत 11, सादिक शेख – एम ब्लास्टर, राहुल मुंजेकर – माऊली मराठा 11, बंटी ठाकूर – राजपूत रॉयल्स, सोहेल शेख – रेनबो क्लब
आज होणारे सामने –
श्रीराम वॉरिअर्स X 11 टायगर्स रिअरिंग
छत्रपती वॉरिअर्स X रेनबो क्लब
आमीर नाईट रायडर्स X माउली मराठा
जन्नत 11 X राजपूत रॉयल्स
जय महाकाली X एम ब्लास्टर
टेनिस बॉलने खेळले जाणारे हे सामने दिवस व रात्रकालीन राहणार आहे. प्रत्येक दिवशी प्रत्येक टीमची मॅच होणार असून एका दिवशी 5 सामने खेळले जाणार आहे. प्रत्येक मॅच ही 10 ओव्हरची राहणार आहे. संपूर्ण तुर्नामेंट हे आयपीएलच्या नियमानुसार खेळले जाणार आहे. मॅचमध्ये सर्टीफाईड पंच अंपायर म्हणून राहणार आहे. प्रेक्षकांना आनंद घेता यावा यासाठी मैदानावर भव्य एलईडी स्क्रीन लावण्यात आली आहे. तर सामन्याची कमेंट्री प्रोफेशन कमेंट्री करणारे करणार आहेत. विशेष म्हणजे महिला प्रेक्षकांसाठी सामन्यांच्या आनंद घेण्यासाठी खास व्यवस्था करण्यात आली आहे.
या स्पर्धेत बक्षिसांची चांगलीच लूट राहणार आहे. विजेत्या संघाला 5 लाख रुपये, तर उपविजेत्या संघाला 2 लाख 51 हजार रुपयांचे रोख पारितोषिक दिले जाणार आहे. याशिवाय तृतीय पारितोषिक 1 लाख रुपये तर चतुर्थ पारितोषिक 51 हजार राहणार आहे. प्रत्येक सामन्यातील उत्कृष्ट खेळाडूला वैयक्तीक बक्षीस तर मॅन ऑफ द सिरिज राहणा-या खेळाडुला रॉयल एनफिल्ड हंटर 350 ही दुचाकी बक्षिस दिली जाणार आहे. तर बेस्ट बॅट्समन व बेस्ट बॉलरला प्रत्येकी 11 हजार रुपयांचे तर 21 हजार रुपये फेअरप्ले खेळाडूला दिला जाणार आहे.
या चॅम्पियन लीगचा परिसरातील क्रीडाप्रेमींनी आनंद घ्यावा असे आवाहन अध्यक्ष ऍड कुणाल चोरडिया, उपाध्यक्ष मनीष गायकवाड, सचिव संदीप बेसरकर, सहसचिव राजू रिंगोले, कोषाध्यक्ष पियुष चव्हाण, सह कोषाध्यक्ष उमेश पोद्दार, कार्यप्रमुख कार्तिक देवडे, सहकार्यप्रमुख शुभम मदान, प्रसिद्धी प्रमूख तोसीफ खान, सहप्रसिद्धी प्रमुख मयूर घाटोळे, सल्लागार संघादीप भगत, सल्लागार प्रकाश तुराणकर, तौसिफ चीनी यांनी केले आहे.
हे देखील वाचा:
ले. कर्नल वासूदेव आवारी यांच्यावर शुक्रवारी सकाळी मुर्धोनी येथे अंत्यसंस्कार
आजपर्यंतची सर्वात जम्बो ऑफर: आझाद इलेक्ट्रॉनिक्समध्ये ग्राहकांना रोज 1 लाख रुपये जिंकण्याची संधी
आजपासून मयूर मार्केटिंगमध्ये (सोनी शोरूम) दसरा-नवरात्र ऑफर सुरू
Comments are closed.