महाज्योतीमार्फत जेईई-नीट परीक्षेसाठी मोफत प्रशिक्षण
25 डिसेंबरपर्यंत नोंदणी करण्याचे कृती समितीचे आवाहन
जब्बार चीनी, वणी: ओबीसी व्हिजेएनटीसाठी स्थापन केलेल्या महाज्योतीमार्फत ओबीसी, एनटी, एसबीसी विद्यार्थ्यांसाठी मेडिकल, आयआयटी, इंजिनिअर या महत्त्वाच्या अभ्यासक्रमासाठी JEE/MH-CET/NEET या प्रशिक्षणाचे मोफत आयोजन करण्यात आले आहे. या प्रशिक्षणाचा लाभ ओबीसी, भटक्या विमुक्तांच्या विद्यार्थ्यांनी घ्यावा, असे आवाहन महाज्योती बचाव कृती समितीचे संघटक गजानन चंदावार यांनी केले आहे.
महाज्योतीने 2022 मध्ये होणार्या JEE/MH-CET/NEET या स्पर्धा परीक्षेसाठी, ओबीसी, भटक्या विमुक्तांच्या 10 हजार विद्यार्थ्यांना मोफत प्रशिक्षण देण्याचा व त्यांची या स्पर्धा परीक्षेसाठी तयारी करून घेण्याचा महत्वाकांक्षी कार्यक्रम हाती घेतला आहे. यावर्षी इयत्ता 11 वी विज्ञान शाखेत शिकणार्या ओबीसी-भटक्या विमुक्तांच्या विद्यार्थ्यांनी महाज्योतीच्या www.mahajyoti.org.in या संकेतस्थळावर जावून यासाठी २५ डिसेंबर २०२० पर्यंत नोंदणी करावी. असे आवाहन महाज्योती बचाव कृती समिती तर्फे करण्यात आले आहे.
यात यावर्षी वर्ग 11वी सायंसला प्रवेश घेतलेले जे विद्यार्थी आहेत, ते शहरी भागातील शाळांमधून 10 वीला 70% गुण व ग्रामीण, आदिवासी व नक्षलग्रस्त भागातून 10 वी पास करणारे 60 % व त्यावरील गुण प्राप्त करणारे विद्यार्थी तसेच ज्यांची उत्पन्नमर्यादा ही नाॅन क्रिमिलेयरप्रमाणे वार्षिक 8 लाख रूपये आहे, असे विद्यार्थी महाज्योतीकडे मोफत प्रशिक्षणासाठी पात्र ठरणार आहे.
या महाज्योती प्रशिक्षण कार्यक्रमात ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी 50%, नागरी विभाग 15%, नगरपंचायती 15% व आदिवासी व नक्षलग्रस्त विभागासाठी 15% जागा राखीव राहतील. याप्रमाणे राज्यातील सर्व घटकांना त्यांच्या या प्रमाणात प्रतिनिधीत्व, न्याय व संधी देण्याचा प्रयत्न असल्याचे महाज्योतीचे संचालक प्रा. दिवाकर गमे व प्राचार्य डॉ बबनराव तायवाडे यांनी महाज्योती बचाव कृती समितीला सांगितले.
या विद्यार्थ्यांमध्ये प्रर्वगनिहाय आरक्षणाप्रमाणे इतर मागासवर्गांचे (OBC) 6800 विद्यार्थी, भटके विमुक्त प्रवर्गाचे (VJNT) 2700 विद्यार्थी आणि विशेष मागास प्रवर्गचे ( SBC) 500 विद्यार्थी अशा प्रकारे 10 हजार विद्यार्थ्यांना या मोफत प्रशिक्षणासाठी निवडले जाणार आहे. या विद्यार्थ्यांना राज्यातील तज्ञ व अनुभवी प्राध्यापकांमार्फत आनलाईन व आॅफलाईन प्रशिक्षण देण्यात येणार आहे. या विद्यार्थ्यांना महाज्योती मार्फत टॅब स्पर्धा परीक्षेची पुस्तके व शैक्षणिक साहित्य व ईतर सर्व मदत देण्याची योजना आहे.
तरी या ओबीसी, भटक्या विमुक्त व विशेष मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांनी महात्मा ज्योतीबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्थेच्या (महाज्योती) www.mahajyoti.org.in या संकेतस्थळावर जावून JEE/MH-CET/NEET साठी आपली विनामूल्य नोंदणी करावी. तसेच ग्रामीण, आदिवासी व नक्षलग्रस्त भागातील कनिष्ठ महाविद्यालयातील विज्ञान प्राध्यापकांनी या वर्षी 11वी विज्ञान वर्गात प्रवेश घेतलेल्या पात्र विद्यार्थ्यांची महाज्योतीकडे मोफत प्रशिक्षणासाठी नोंदणी करण्यासाठी सहकार्य करावे, असे आवाहन महाज्योती बचाव कृती समितीचे मुख्य संघटक गजानन चंदावार, प्रदीप बोनगीरवार, मोहन हरडे, राकेश बुग्गेवार, राम मुडे, विवेक ठाकरे, अरविंद गांगुलवार, राकेश बरशेट्टीवार, राजेश्वर गोंड्रावार, रमेश बनपेल्लीवार, प्रलय टीप्रमवार, राजू अडेवार, प्रणय बद्दमवार, ज्ञानेश्वर बोनगीरवार, अक्षय तोटावार, देविदास चंदावार, हनमंतू कायपेल्लीवार, प्रकाश बेरेवार, अभिनव आकीनवार, राकेश मदीकुंटावार, राज लक्षट्टीवार, विशाल बोरकूटवार, व महाज्योती बचाव कृती समितीच्या पदाधिकाऱ्यांनी केली आहे.
हेदेखील वाचा
हेदेखील वाचा
पोलिसांना पाहून दारू तस्करांनी पलटवली गाडी, घडला भीषण अपघात…