अत्यंत प्रतिकुल प्ररिस्थितीवर मात करीत मारेगावचे प्रतीक खैरे डॉक्टरेट
आईवडिलांचे छत्र हरपले होते, प्रसंगी पाणी आणि बिस्किटांवर दिवस काढले पण शिक्षण पूर्ण केले
नागेश रायपुरे, मारेगाव: कॉलेजमध्ये शिक्षण सुरू असतानाच त्याच्या डोक्यावरील वडिलांचे छत्र हरवले. काही काळानंतर त्याच्या आईचेही निधन झाले. पोरका झाला असले तरी तो डगमगला नाही. मिळेल ते काम केले. कधी पार्ट टाईम जॉब केला पण शिक्षण पूर्ण केले. या परिस्थिती अनेकदा खाण्याची भ्रांत असल्याने प्रसंगी पाण्यासोबत बिस्किटं खाऊनही अनेक दिवसं काढले. मात्र म्हणतात ना की जिद्द, चिकाटी असली की तुम्हाला ध्येयापासून कुणीही रोखु शकत नाही. अत्यंत खडतड प्रवास पार त्याने इंग्रजी विषयात अमरावती विद्यापिठाची डॉक्टरेट प्राप्त केली आहे. ही कहाणी काही खूप दुरची नाही तर आपल्याच मारेगाव शहरातील आहे. कालपर्यंत प्रतीक ओंकार खैरे असलेला तो आज डॉ. प्रतीक ओंकार खैरे झाला आहे.
29 मे रोजी झालेल्या ऑनलाईन दीक्षांत समारंभात प्रतीक खैरे यांना डॉक्टरेट प्रदान करण्यात आली. यावेळी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी, केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी, उच्च व तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत यांची प्रमुख उपस्थिती होती. त्यांच्या संशोधनाचा विषय ‘ऑब्जेक्शन ऑफ ह्युमनिसम: क्रिटिकल ऍनालिसीस ऑफ दी नॉवेल्स ऑफ डॉ. रॉबिन कुक’ हा होता. डॉ. माधुरी किशोर फुले यांच्या मार्गदर्शनात त्यांनी संसोधन पूर्ण केले.
शहरातील आंबेडकर चौक परिसरात प्रतीक राहायचा. प्रतीकचे वडील ओंकार वासुदेव खैरे हे जिल्हा परिषद शाळेत शिक्षक होते. कॉलेजला असतानाच 2009 साली प्रतीकच्या वडिलांचा मृत्यू झाला. वडिलांपाठोपाठ दोन तीन वर्षातच आईचा देखील मृत्यू झाला. डोक्यावर आईवडिलांचे छत्र हरवले होते. मात्र जिद्द, चिकाटी, हिम्मत अद्यापही कायम होती. प्रतीकने मारेगाव येथील कला महाविद्यालयातून बी.ए. पूर्ण केले. पुढील शिक्षण घ्यायचे होते मात्र डोक्यावर आईवडिलांचे छत्र नाही. आर्थिक तडजोड नाही. मात्र जे संकटं येतील त्याला तेव्हाच सामोरं जायचं हा विचार करून प्रतीकने पुढील शिक्षण घेण्यासाठी अमरावती गाठली.
अमरावतीमध्ये श्री शिवाजी महाविद्यालय येथे इंग्रजी विषयात एम.ए. साठी प्रवेश घेतला. ऍडमिशन तर झाली मात्र तिथे कुणाचाही आसरा नव्हता. खिशात पैसे ही नव्हते. या परिस्थितीत प्रतीकने पार्ट टाईम जॉब कऱण्याचे ठरवले. मिळेल तिथे पार्ट टाईम काम करायचे व उरलेल्या वेळात कॉलेज आणि अभ्यास करायचा अशी दिनचर्चा प्रतीकची सुरू झाली. आर्थिक अडचण, वेळेचे व्यवस्थापन याची समस्या होती. आर्थिक अडचणीमुळे अनेक रात्र केवळ पाणी आणि बिस्किटावर काढावे लागले. यात दोन वर्ष गेले व प्रतीकने एमए पूर्ण केले.
एमए झाल्यानंतर प्रतीक यांनी अमरावतीतील श्रीमती केसरबाई लाहोटी महाविद्यालय येथे तासिका तत्वावर अध्यापन सुरू केले. तिथे त्यांना प्रा. संतोष राठोड यांचा सहवास लाभला. प्रा. राठोड यांनी प्रतीक खैरे यांना पीएचडीसाठी प्रोत्साहित केले व वेळोवेळी सोबतच मार्गदर्शनही केले. डॉ. माधुरी किशोर फुले यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी आचार्य संशोधनासाठी संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठात नोंदणी केली. ‘ऑब्जेक्शन ऑफ ह्युमनिसम: क्रिटिकल ऍनालिसीस ऑफ दी नॉवेल्स ऑफ डॉ. रॉबिन कुक’ हा विषय संशोधनसाठी निवडण्यात आला. संशोधन यशस्वीरीत्या पूर्ण सुद्धा केले. त्यांचा शोधनिबंध शून्य टक्के प्लेजीयरिजम मूल्यांकन चाचणी प्राप्त करणारा ठरला.
घरमालकाची वेळोवेळी मदत
घरमालक म्हणजे त्रास देणारे, उठसुट नियम घालून देणारे, पैसासाठी तगादा लावणारे अशीच विद्यार्थ्यांमध्ये प्रतिमा आहे. अमरावतीत असताना प्रतीक राधानगर परिसरात चौबे यांच्याकडे भाड्याने राहायचा. प्रतीक अनेकदा रात्री घरी उपाशी राहतो तसेच तो अत्यंत बिकट परिस्थितीत शिकायला आला हे घरमालक विष्णू चौबे व शीतल चौबे यांना लवकरच कळाले. घरमालकाने प्रतीकला कधीही घरभा़डे मागितले नाही. प्रतीककडे जेव्हा कधी पैसे आले की तेव्हाच तो घरभाडे द्यायचा व ते देखील जमेल तेवढेच. मात्र या परिस्थितीही घरमाल चौबे कुटुंब प्रतीकच्या पाठिशी ठामपणे उभे राहिले, त्याला वेळोवेळी सहकार्य करत त्याच्या शिक्षणासाठी कायम प्रोत्साहन दिले.
शालेय जीवनात असतांना सुद्धा त्यांचा शैक्षणिक प्रवास अतिशय बिकट होता. असे असूनही ते अभ्यासकेंद्रित रहाले. त्यांना प्रा.सतीश पांडे, डॉ.अशोक यावले , डॉ. गणेश गुंडावार यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. शालेय जीवनात असतांना प्रा.गारघाटे यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. प्रतीकला पीएचडी मिळाल्याचे कळल्यावर मारेगाव येथील प्रतीकचे मित्र, शिक्षक यांच्या आनंदाला पारावार उरला नाही.
प्रतीक आपल्या यशाचे श्रेय पीएचडीचे गाईड डॉ. माधुरी किशोर फुले, डॉ. संतोष राठोड, प्रा. सतीश पांडे, डॉ. अशोक यावले, डॉ. संजय रेड्डी, डॉ. व्यास, डॉ. छंगाणी, डॉ. वाडेकर, डॉ. गुंडावार, डॉ. शालिनी कटोच, डॉ. राखी शर्मा, गीतांजली ठाकूर, डॉ. संदीप मसराम, विष्णु चौबे, शीतल चौबे, मोहम्मद अय्याज, आनंद आठवले, भागवत गरकळ यांच्यासह मित्रपरिवाराला देतो. खरतड परिसरात मिळवलेल्या या यशाबाबत मारेगावातून प्रतीकवर कौतुकाचा वर्षाव होत आहे.
हे देखील वाचा: