रंगनाथ स्वामी पतसंस्थेला राज्य स्तरीय दीपस्तंभ पुरस्कार
नागपूर विभागातून प्रथम क्रमांकाची सहकारी संस्था असल्याचा मान... उद्योगमंत्री उदय सावंत यांच्या हस्ते ऍड. देविदास काळे यांचा सन्मान
जितेंद्र कोठारी, वणी: महाराष्ट्र राज्यातील पतसंस्था चळवळीत दीपस्तंभा प्रमाणे दिशादर्शक कार्य केल्याबद्दल वणी येथील श्री रंगनाथ स्वामी नागरी सहकारी पतसंस्थेला राज्य स्तरीय दीपस्तंभ पुरस्काराने गौरविण्यात आले. महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशन लिमीटेड तर्फे सोमवारी दिनांक 19 सप्टें रोजी रत्नागिरी जिल्ह्यातील गणपतीपुळे येथे हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. राज्याचे उद्योगमंत्री उदय सावंत यांच्या हस्ते संस्थेचे अध्यक्ष ऍड. देविदास काळे यांना दीपस्तंभ स्मृतीचिन्ह प्रदान करण्यात आले. विशेष म्हणजे संस्थेला नागपूर विभागातून प्रथम क्रमांकाची संस्था असल्याचा मान देखील मिळाला आहे.
वणी येथील श्री रंगनाथ स्वामी नागरी पतसंस्थेचे जाळे यवतमाळ, चंद्रपूर, नागपूर, वर्धा, गडचिरोली जिल्ह्यात पसरलेले आहे. संस्थेच्या 22 शाखा या जिल्ह्यात कार्यरत आहे. तब्बल 57 हजार सभासद असलेल्या रंगनाथ स्वामी पतसंस्थेकडे 750 कोटींची ठेवी आहेत. संस्थेने 420 कोटी रुपयांचे कर्ज वाटप केलेले आहे. 35 कोटी भागभांडवल असलेल्या या संस्थेने आर्थिक वर्ष 2021-22 मध्ये 2.25 कोटीचा निव्वळ नफा मिळविला आहे. नुकतेच झालेल्या निवडणुकीत संस्थेच्या अध्यक्ष ऍड. देविदास काळे यांच्या नेतृत्वाखाली सर्व 17 संचालक निवडून आले होते.
सहकारी पतसंस्था आपल्या स्वबळावर आपले कामकाज चालवितात त्यांना शासनाचे कोणत्याही प्रकारचे सहकार्य लाभत नाही. याचबरोबर बदलते आधुनिक तंत्रज्ञान, वाढती स्पर्धा, सामाजिक, राजकीय, आर्थिक आणि सहकार क्षेत्रातील घडामोडींचा पतसंस्थांच्या कार्यभारावरही प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष परिणाम होत असतो. या सर्वांचा समतोल साधून रंगनाथ स्वामी पतसंस्था आपल्या सभासदांच्या विश्वासार्हतेवर खरी उतरली.
राज्यातील इतर पतसंस्थांसाठी रोल मॉडेल ठरलेल्या वणी येथील श्री रंगनाथ स्वामी नागरी पतसंस्थेला राज्यस्तरीय दीपस्तंभ पतसंस्था पुरस्कार मिळाल्यामुळे सर्वत्र कौतुक करण्यात येत आहे. यावेळी संस्थेचे उपाध्यक्ष विवेक मांडवकर, संचालक घनश्याम निखाडे व परीक्षित एकरे हजर होते.
हे देखील वाचा:
स्पर्श क्लिनिक येथे त्वचारोगांविषयी अत्याधुनिक उपचार सुविधा उपलब्ध
Comments are closed.