मेंढोली येथे धाडसी चोरी, किराणा माल व गल्ल्यातील रक्कम लंपास

33 हजारांच्या मुद्देमालावर चोरट्यांचा डल्ला

जितेंद्र कोठारी, वणी: तालुक्यातील शिरपूर पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या मेंढोली येथे किराणा मालाचे दुकान शनिवारी रात्री चोरट्यांनी फोडले. आज सकाळी 9 वाजता ही घटना उघडकीस आली. या प्रकरणी चोरट्यांनी दुकानातील गल्यातील 7.500 हजार रुपये नगदी व सुमारे 26 हजारांच्या मालावर डल्ला मारला आहे. या प्रकरणी दुकान मालकाच्या फिर्यादीवरून पोलिसांनी गु्न्हा दाखल केला आहे.

फिर्यादी जितेंद्र राजेंद्र मेहता (34) हे वणी येथील रहिवाशी असून त्यांचे तालुक्यातील मेंढोली येथे किराणा माल व स्टेशनरी दुकान आहे. रोज सकाळी ते दुकान उघडतात व रात्री बंद करून वणी येथे ते परत येतात. शनिवारी दिनांक 15 जानेवारी रोजी रात्री 8.30 वाजता ते नेहमी प्रमाणे दुकान बंद करून वणी परत आले. आज रविवारी दिनांक 16 जानेवारी रोजी सकाळी त्यांनी दुकान उघडले. ग्राहक करत असता त्यांना गल्यातील 7.5 हजार रुपये आढळून आले नाही.

त्यांना दुकानात चोरी झाल्याचा संशय आला. त्यांनी गोडाऊनची पाहणी केली असता त्यांना गोडाऊनच्या दरवाजाचा कोंडा तुटलेला आढळला. त्यांनी संपूर्ण दुकानाची पाहणी केली असता दुकानातील विविध माल त्यांना चोरी गेल्याचा आढळला. यात 10 किलो सुपारी ज्याची किंमत 12 हजार रुपये, सोयाबिन तेलाच्या 1 किलो पाऊचच्या तीन पेट्या किंमत 4500 हजार, सोयाबिन तेलाच्या अर्धा किलोचे तिन पेट्या ज्याची किंमत 4320 रुपये, वॉशिंग पावडर पॉकेट किंमत 4275 रुपये, चप्पलचे पाच जोड किंमत 500 रुपये, व 7500 हजार रुपये नगदी असा एकूण 33,095 रुपयांचा मुद्देमाल चोरट्यांनी चोरून नेला.

त्यांनी तातडीने शिरपूर पोलीस स्टेशनला याबाबत माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला. जितेंद्र मेहता यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरोधात भादंविच्या कलम 461 व 380 अन्वये गुन्हा दाखल केला असून प्रकारणाचा शिरपूर पोलीस तपास करीत आहे.

हे देखील वाचा:

कोरोनामुळे होस्टेल झाले बंद, अल्पवयीन मुलगी झाली बेपत्ता

बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त ‘घर तिथे शिवसैनिक’ अभियान

Comments are closed.