विलास ताजने, मेंढीली- वणी उपविभागात पावसाने दीर्घकाळ दडी मारली आहे. सोयाबीन पीक दाणे भरण्याच्या अवस्थेत आहे. तर कपाशी फुले, पात्यावर आहे. ऐन पिकांना फळधारणेच्या वेळी पावसाची नितांत गरज असताना पावसाचा दीर्घकाळ खंड पडला. परिणामी खरीप पिकांच्या उत्पन्नात प्रचंड प्रमाणात घट येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. यंदा मृग नक्षत्रात सात ते दहा जून पर्यंत पाऊस पडला. या काळात घाई गडबडीत ज्या शेतकऱ्यांनी कपाशीची लागवड केली त्यांच्या शेतातील पिके समाधानकारक होती. परंतु संततधार पावसाने पिकांची अवस्था बिकट झाली. सोयाबीन पेरणी नंतरही पावसाने दडी मारली होती. त्यामुळे सखल भागातील पिक उगवले. परंतु उशिरा आलेल्या पावसाने कसेबसे पिके उगवली. पावसाचा सततचा लपंडाव सोसत पिके शिवारात डोलू लागली. सततच्या पावसाने पिकांत तणे वाढली. शेतातील तणे काढण्यासाठी तणनाशकांवर प्रचंड खर्च झाला. मजुराद्वारे निंदणी करून शेत तणमुक्त झाली. मात्र पावसाने दडी मारल्यामुळे पिकांची वाढ थांबली. पाऊस येणार या घाईने रासायनिक खतांच्या पेरण्या केल्या. एकूणच पिकांवर सर्व प्रकारे खर्च केला. मात्र सोयाबीन दाणे भरण्याच्या अवस्थेत असताना पाऊस बेपत्ता झाला. त्यामुळे सोयाबीन पिक सुकायला लागले. जलसिंचनाची सोय असलेले शेतकरी पिके वाचवण्यासाठी धडपड करीत आहे. दाणे परिपूर्ण न भरल्याने ५० ते ७० टक्के उत्पन्न घटण्याची शक्यता असल्याची चर्चा शेतकरी करीत आहे. उशिरा लागवड केलेल्या कपाशीचे झाडे उन्हात जळाल्यागत झाली आहे. ५ ते १० टक्के बोन्डअळी आढळून येत आहे.कपाशीच्या रोग नियंत्रणासाठी विविध प्रकारच्या कीटकनाशकांच्या फवारण्या शेतकरी करीत आहे. मात्र सर्व प्रयत्न व्यर्थ जाण्याची शक्यता नाकारता येत नाही.एकूणच यंदाचा शेती हंगाम शेतकरी बांधवांसाठी धोक्याची सूचना देणारा दिसून येत आहे.
ठेक्याने शेती करणारे शेतकरी चिंतेत
अनेक शेतकऱ्यांकडे जमीन कमी असल्यामुळे ते दुसऱ्याचे शेत एक, दोन वर्षांसाठी ढेक्याने करून उत्पन्न घेतात. यावर्षी कोरडवाहू शेती दहा ते बारा हजार रुपये तर ओलिताची सोय असलेली शेती चौदा ते पंधरा हजार रुपये प्रति एकरी प्रमाणे भाव आहे. उत्पन्नात घट झाल्यास सर्व खर्च डोईजड होणार आहे. शिवाय नुकसानभरपाई देखील शेत मालकाला मिळत असल्याने ठेक्याने शेती करणारे शेतकरी नुकसान भरपाई पासून वंचित राहतात. ना उत्पन्न ना नुकसान भरपाई अशी अवस्था ठेक्याने शेत करणाऱ्याची झालेली असते.