45 लाखांचा दरोडा टाकणारे दरोडेखोर अद्यापही मोकाट

वणीच्या इतिहासातील सर्वात मोठा दरोडा, 5 महिन्यानंतरही पोलीस अपयशी

जितेंद्र कोठारी, वणी: पोलिसांनी जर मनावर घेतले तर पाताळात जाऊन लपलेल्या गुन्हेगाराला पकडून आणते असे म्हणतात. मात्र वणीच्या इतिहासातील सर्वात मोठ्या दरोड्याची घटनेच्या 5 महिन्यानंतरही वणी पोलीस दरोडेखोरांना पकडण्यात अपयशी ठरले आहे. 45 लाख रुपयांच्या दरोड्याचा मास्टरमाईंड बाबूलाल नावाच्या व्यक्तीला पोलिसांनी राजस्थान येथून अटक केली होती. मात्र त्याच्याकडून दरोड्यातील रक्कम व इतर दरोडेखोरांबाबत खास माहिती पोलिसांना मिळू शकली नाही.

20 मार्च 2021 रोजी येथील ब्राह्मणी मार्गावर जिनिंग कर्मचाऱ्यांकडून भरदिवसा 45 लाख रुपयांनी भरलेली बॅग लुटारूनी हिसकावून पळून गेल्याची घटना घडली होती. प्राथमिक तपासात दरोड्यात राजस्थान येथील 4 ते 5 आरोपीचा सहभाग असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. आरोपीना पकडण्यासाठी डीबी पथक प्रमुख पीएसआय गोपाल जाधव व स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळचे सपोनि गजानन कडेवार यांनी पोलीस पथकासह राजस्थान गाठले. जोधपूर जिल्ह्यात 13 दिवस मुक्काम करुनही आरोपी पोलिसांच्या हाती लागले नाही. मात्र दरोड्याची योजना तयार करणाऱ्या बाबूलाल बिश्नोई याला पोलिसांनी अटक केली.

पोलीस कोठडी दरम्यान दरोडेखोरांचे नाव, पत्ता बाबूलाल यांनी पोलिसांना सांगितले. दरोड्यात सहभागी ओमप्रकाश, जितू, हनुमानाराम, सोमराज, सहीराम व कारचालक भंवरलाल हे कुख्यात गुन्हेगार असून त्यांच्यावर राजस्थानसह इतर राज्यात अनेक गुन्हा दाखल असल्याची माहितीही पोलिसांना मिळाली.

मात्र घटनेनंतर आरोपी पैसे घेऊन कुठे गेले, याबाबत बाबूलाल यांनी अनभिज्ञता दर्शविली. सर्व आरोपीचे मोबाईल बंद असल्यामुळे पोलिसांना लोकेशन मिळत नव्हती. मात्र घटनेच्या काही दिवसानंतर पोलिसांनी आरोपी शोधकाम शिथिल केल्याचे दिसून आले.

एक आरोपी पुण्यात असल्याची माहिती
‘वणी बहुगुणी’ला सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार घटनेतील काही आरोपी राजस्थान येथील आपल्या गावात तर घटनेतील एक आरोपीचे मोबाईल लोकेशन पुणे येथे दाखवत आहे. वणी पोलिसांनी दरोड्यातील आरोपी अटक केल्यास अजून काही गुन्हे उघड होण्याची शक्यता आहे.

हे देखील वाचा:

फुलोरा जंगलात आढळला तरुणाचा गळफास घेतलेल्या अवस्थेत मृतदेह

विष प्राशन केलेल्या तरुणीचा उपचारादरम्यान मृत्यू

Comments are closed.