सावळागोंधळ: 14 दिवसांपासून संशयीतांचे रिपोर्टच नाही

अनेक संशयीत उपचाराविनाच, तर अनेकांनी धरली खासगी लॅबची वाट

0

जब्बार चीनी, वणी: सध्या तालुक्यात कोरोनाचे थैमान सुरू असताना त्यातच अनेकांचे रिपोर्ट गेल्या 10 ते 14 दिवसांपासून मिळालेच नसल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. हे संशयीत सध्या प्रशासनाकडे रिपोर्टसाठी हेलपाटे मारीत असून त्यांच्यासमोर सध्या कागदी घोडे नाचवण्याचा प्रकार सुरू आहे. यातील काही संशयीतांमध्ये कोरोनाचे लक्षणं आहेत. सध्या हे संशयीत उपचाराविनाच तर आहेच शिवाय प्रसारक (स्प्रेडर) म्हणून देखील वावरत आहे. अखेर हतबल होऊन यातील काहींनी आता खासगी लॅबची वाट धरली आहे तर काहींनी उपचारासाठी बाहेरगावची वाट धरली आहे. दोन दिवसांआधीच ग्रामीण रुग्णालयात 75 लसींचा घोळ समोर आला होता. यात 25 व्यक्ती विना लस घेताच परतले होते. हा प्रशासकीय भोंगळ कारभारातच आता तर दंडाच्या नावाखाली 500 रुपये दंड भरा किंवा 200 रुपयांमध्ये तोडपाणी करा, अशी वसुली पथकाकडून जबरदस्ती केल्याचा आरोप फळविक्रेत्यांनी करत याबाबत निवेदन सादर केले आहे.

सध्या आरोग्य विभागाने प्रतिबंधात्मक उपाय म्हणून कोरोना संशयीतांच्या टेस्ट घेण्याची संख्या वाढवली आहे. हे एक उल्लेखनीय कार्य आहे. एका संशयीताची दिनांक 12 एप्रिल रोजी आरटीपीसीआर टेस्ट घेण्यात आली. मात्र त्या व्यक्तीचा यवतमाळहून अद्यापही रिपोर्ट आलेला नाही. याशिवाय काही खेडेगावातीलही व्यक्ती आहेत. ज्याचे गेल्या 10-12 दिवसांपासून रिपोर्ट न आल्याने ते सध्या ग्रामीण रुग्णालय, कोविड केअर सेंटर, महसूल विभाग अशा विविध ठिकाणी खेटे मारीत आहे.

धक्कादायक म्हणजे यातील काहींना तर कोरोनाचे लक्षणं देखील आहेत. मात्र प्रशासनाने त्यांना वा-यावर सोडले आहे. 10 ते 14 दिवसांपासून रिपोर्टच आलेले नाही. त्यामुळे त्यांच्या जिवाचा सध्या खेळ होताना दिसत आहे. याबाबत अनेक संशयीतांनी ‘वणी बहुगुणी’शी संपर्क साधून आपबिती सांगितली आहे. यातील एकाने कॉल करून तहसिलदार यांना विचारणा केली असता त्यांनी आमच्या कुटुंबीयांचेच  रिपोर्ट अद्याप मिळालेले नाही तर तुमच्याबाबत काय सांगणार असे विचित्र उत्तर दिले.

500 रुपये दंड भरा नाही तर 200 रुपयात तोडपाणी करा !
सध्या विनाकारण फिरणारे तसेच दुपारी 11 नंतरही दुकाने सुरु ठेवणा-या व्यक्तींवर नगर पालिकेच्या वसुली पथकातर्फे कारवाई केली जात आहे. तक्रारीनुसार दिनांक 25 रोजी दुपारी 11.30 वाजताच्या सुमारास काही फळविक्रेते हे दुकान बंद करून घरी जात होते. दरम्यान त्या ठिकाणी मास्क वसुली पथकातील तुंबडे नामक एक शिक्षक व एक होमगार्ड आला. त्यांनी त्या फळविक्रेत्यांकडे 500 रुपये दंड भरा किंवा 200 रुपयांमध्ये तोडपाणी करा अशी जबरदस्ती केली. हा एका दिवसाचा प्रकार नसून नेहमीचाच असल्याचा आरोप करत जटाशंकर चौकातील 5 फळविक्रेत्यांनी याबाबत जिल्हाधिकारी यांच्याकडे तक्रार दाखल केली आहे.

एकीकडे कोरोनाचे थैमान वाढत असताना दुसरीकडे कुणाचा कुणाला ताळमेळ नसताना दिसत आहे. संशयीत वा-यावर आहेत. अधिकारी देखील हतबल असल्यासारखे वागताना दिसत आहे. ग्रामीण रुग्णालयातून लशीबाबत घोळ निर्माण होत आहे. एकीकडे आर्थिक नुकसान होताना दुसरीकडे गरीबांना तोडपाणीसाठी जबरदस्ती केली जात आहे. अशा परिस्थितीत कोरोनावर कशी मात  केली जाईल हा प्रश्न उपस्थित होत आहे.

हे देखील वाचा:

भालर कॉलनीत कोरोना विस्फोट, 37 रुग्णांची कोरोनावर मात

अवघ्या 10490 रुपयांमध्ये डेस्कटॉप कॉम्प्युटर

लालपुलिया परिसरात आढळला वृद्धाचा मृतदेह

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

Leave A Reply

Your email address will not be published.