ब्राह्मणी रोडवर वंचितचे रास्ता रोको आंदोलन

पुरुषोत्तम नवघरे, वणी: ब्राह्मणी येथील कोल वॉशरीजमध्ये स्थानिक बेरोजगारांना रोजगार देण्यात यावा या मागणीसाठी वंचित बहुजन आघाडीतर्फे रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. सोमवारी दिनांक 18 सप्टेंबर रोजी सकाळी 11 ते 1 वाजेपर्यंत हे आंदोलन चालले. आंदोलनामुळे काही काळ वाहतूक विस्कळीत होऊन या मार्गावर ट्रकच्या रांगा लागल्या होत्या. याबाबत कोल वॉशरीतर्फे बुधवार पर्यंत तोडगा काढण्याचे आश्वासन दिले.

निळापूर, ब्राह्मणी परिसरात कोळशाच्या खाणी आहेत. त्यामुळे या परिसरात कोलवॉशरी आहेत. मात्र या कोलवॉशरीत स्थानिक बेरोजगारां ऐवजी परप्रांतीयांना आणि इतर ठिकाणावरच्या लोकांना रोजगार दिला जात आहे. कोल वॉशरीमध्ये स्थानिकांना रोजगार द्यावा या मागणीसाठी 4 महिन्याआधी वंचित बहुजन आघाडीतर्फे आंदोलन करण्यात आले होते.

आंदोलनानंतर ब्राह्मणी येथील बेरोजगार तरुणांना कोल वॉशरीत रोजगार देण्यात आला. मात्र निळापूर येथील युवकांना अद्यापही रोजगार मिळालेला नाही. त्यामुळे अखेर निळापूर येथील तरुण व नागरिक यांना सोबत घेऊन वंचित तर्फे रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. यावेळी नागरिकांनी कोलवॉशरीविरोधात जोरदार घोषणाबाजी करत रोजगार देण्याची मागणी केली.

आंदोलनामुळे काही काळ रस्त्यावर ट्रकच्या रांगा लागल्या होत्या

अखेर कोल वॉशरी प्रशासनाकडून आंदोलनाची दाखल घेण्यात आली व या प्रकरणी तोडगा काढण्यासाठी प्रशासनाने तीन दिवसांचा अवधी मागून घेतला. सदर आंदोलन वंचितचे जिल्हाध्यक्ष लक्ष्मीकांत लोळगे, महासचिव मिलिंद पाटील व उपाध्यक्ष मंगल तेलंग यांच्या मार्गदर्शनात व विधानसभा अध्यक्ष दिलीप भोयर यांच्या नेतृत्वात करण्यात आले.

यावेळी वंचित युवा आघाडीचे शहराध्यक्ष विशाल कांबळे निलेश मंगाम, आशिष चटप, अजय चटप, बंडू हनुमंते, गणेश चटप, अरविंद येसेकर, अक्षय आवारी, नामदेव कडुकर, विजय पारखी, ओम चटप, निखिल पारखी, यांचेसह मोठ्या प्रमाणात निळापूर येथील तरुण व महिला सहभागी झाल्या होत्या.

आता 10 दिवस करा ऑनलाईनपेक्षा कमी दरात खरेदी, मयूर मार्केटिंगमध्ये बाप्पा मोरया ऑफर सुरू

Comments are closed.