विदर्भा नदीला पूर… नदीकाठच्या काही गावांचा संपर्क तुटला

सिंधीवाढोना, पिल्कीवाढोना, पठारपूर, दरा, डोंगरगाव, बोपापूर इ गावे प्रभावीत

0

जितेंद्र कोठारी, वणी: गेल्या 3-4 दिवसांपासून संततधार पावसामुळे तालुक्यातील नदी-नाले तुडुंब भरले आहे. तर विदर्भा नदीला पूर आला आहे. नदीचे पाणी पुलावरून गेल्याने नदीकाठच्या काही गावांचा संपर्क तुटला आहे. यात सिंधीवाढोना, पिल्कीवाढोना, पठारपूर, दरा, डोंगरगाव, बोपापूर इत्यादी गावांचा समावेश आहे. अचानक आलेल्या पुरामुळे गावातील जनजीवन विस्कळीत झाले आहे. दरम्यान संध्याकाळी पुलावरील पाण्याची पातळी कमी होण्यास सुरुवात झाली आहे. मुसळधार पावसामुळे शेतात पाणी साचल्याने काही प्रमाणात शेतीचे नुकसान झाल्याची माहिती मिळत आहे. 

गेल्या चार दिवसांपासून तालुक्यात मुसळधार पाऊस पडतोय. त्यामुळे तालुक्यातील नदी-नाले ओव्हरफ्लो झाले आहेत. संततधार पावसामुळे आज सकाळपासून विदर्भा नदीवरील पुलावरून पाणी वाहण्यास सुरूवात झाली. त्यामुळे सिंधीवाढोना, पिल्कीवाढोना, पठारपूर, दरा, डोंगरगाव, बोपापूर इत्यादी गावातून वणीकडे जाणारा मार्ग बंद झाला. परिणामी गावक-यांची कामे रखडली. सध्या पुलावरील पाण्याची पातळी कमी व्हायला सुरुवात झाली आहे.

तालुक्यात सर्वात आधी विदर्भा नदीलाच पूर का येतो?
2018 मध्येही विदर्भा नदीने रौद्ररूप धारण केले होते. नदीला आलेल्या पुरामुळे अनेक गावांमध्ये पुराचे पाणी शिरले होते. त्यामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. तसेच अनेक गावांचा संपर्क तुटला होता. विदर्भा नदी ही सखल भागातून वाहते. शिवाय या नदीवर असलेला पूल हा कमी उंचीचा व आकाराने खूप लहान आहे. त्यामुळे मुसळधार पाऊस झाल्यास सर्वात आधी या नदीच्या पात्रातील गाव प्रभावीत होता. काही वर्षांआधी पुराच्या प्रवाहात एक शाळकरी मुलगा वाहून गेला होता. त्यामुळे या पुलाची उंची वाढवावी अशी मागणी सातत्याने होत असते.

2018 साली विदर्भा नदीला आलेला पूर

सिंधीवाढोना, पिल्कीवाढोना, पठारपूर, दरा, डोंगरगाव, बोपापूर इत्यादी गावातील रहिवाशांना कामानिमित्य कायर व वणीला जावे लागते. पूर आल्यास त्यांना साखरा ते परसोडा या मार्गाने जावे लागते. काही दिवसांआधी परिसरातील नागरिकांनी पुलाची उंची वाढविण्याची निवेदनातून मागणी केली होती. दरम्यान नैसर्गिक आपत्ती आल्यास प्रशासन सज्ज आहे. 

हे देखील वाचा:

झरी तालुक्यात मुसळधार पाऊस, जनजीवन विस्कळीत

वणीतही पावसाचा कहर, ठिकठिकाणी साचले पाणी…

Leave A Reply

Your email address will not be published.