वणी शहरात ठाणेदारांचा वचक संपला? गुन्हेगारी, अवैध धंद्यात वाढ !

शहरात दुचाकी चोरी नंतर आता घरफोडीचे सत्र सुरू.... युवासेने तर्फे उपविभागीय अधिकारी यांना निवेदन

विवेक तोटेवार, वणी: वणी पोलिस स्टेशन हद्दीत चोरी, घरफोडी, अवैध धंदे इत्यादींमध्ये प्रचंड वाढ झाली आहे. गुन्हेगारीला आळा बसावा किंवा गुन्हेगारी नियंत्रणात रहावी याकरिता ठाणेदार कोणतीही ठोस भूमिका घेताना दिसत नाही. परिणामी शहराची सुरक्षा व्यवस्था धोक्यात आली आहे. असा आरोप करत या गंभीर बाबीकडे तातडीने लक्ष दयावी अशी मागणी युवा सेनेतर्फे करण्यात आली आहे. याबाबत युवासेनेचे जिल्हा उपाध्यक्ष अजिक्य शेंडे यांनी उपविभागीय पोलिस अधिकारी संजय पुज्जलवार यांच्या मार्फत पोलीस महानिरीक्षक परिक्षेत्र अमरावती यांना निवेदन दिले आहे.

निवेदनात म्हटले आहे की वणी ठाणेदारांची पोलीस स्टेशन कार्यालयाला उपस्थिती फार कमी असते. त्यामुळे पोलीस कर्मचाऱ्यांमध्ये शिस्त उरलेली नाही. तसेच ठाण्यात कुणाचा वचक नसल्याने चोरटे तसेच अवैध धंदे चालकही निर्ढावले आहेत. अनेक गुन्ह्यांची उकल करण्यास पोलिसांना यश आले नाही. सर्वसामान्यांच्या अनेक तक्रारी पोलीस ठाण्यात घेतल्या जात नाही. तर गुन्हेगारांना वाचविण्याची पोलिसांकडूनच धडपड होताना दिसते असा गंभीर आरोपही निवेदनातून करण्यात आला आहे.

परिसरात अनेक अपघात होतात. यात अनेकांना जीव गमवावा लागला आहे. मात्र अपघातातील अज्ञात वाहनाचा शोध घेण्यात पोलीस प्रशासन अपयशी ठरत आहेत. अपघात करणाऱ्या वाहन चालकाला अटक न करता त्याच्या जागी दुसरा वाहन चालक उभा केला जात आहे. असा आरोप ही निवेदनातून करण्यात आला आहे.

वणी शहरात चोरट्यांचा धुमाकुळ
चोरी, घरफोडीच्या घटनांमध्ये प्रचंड वाढ झाली आहे. दुचाकी चोरी तर रोजचीच बाब झाली आहे. अल्पवयीन मुलींना फूस लावून पळविले जात आहे. अनेक बेपत्ता मुला मुलींचा अद्याप शोध लागलेला नाही. संशयास्पद स्थितीत मृतावस्थेत आढळलेल्यांच्या मृत्यूचे कारण शोधण्यात पोलिसांना अपयश येत आहे.

परिसरात अवैध धंद्यांनी पुन्हा डोके वर काढले
वैभव जाधव यांच्या कार्यकाळात अनेक अवैध धंद्यांवर टाच देत यावर कार्यवाही केली होती. यामुळे अवैध धंद्यांना मोठ्या प्रमाणात वचक बसला होता. मात्र आता शहरात तसेच ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात मटका जुगार अड्डेही सुरु झाले आहेत. शहरासह ग्रामीण भागात अवैध दारू विक्रीही जोमात सुरु आहे. सुगंधित तंबाखू विक्रीही जोरदार सुरु आहे. बेटिंग देखील मोठ्या प्रमाणात फोफावली आहे. पोलीस जुगार अड्यांवर धाड टाकतात पण बड्या जुगाऱ्यांची नावं उजागर केली जात नाही. तसेच प्रतिष्ठीत जुगाऱ्यांचे नावं आरोपींमधून वगळली जातात असा गंभीर आरोप ही निवेदनातून करण्यात आला आहे. 

गुन्हेगार व अवैध व्यावसायिकांवर ठाणेदारांचा वचक राहिला नसून शहर व हद्दीत कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे याकडे तातडीने लक्ष द्यावे अशी मागणी अजिंक्य शेंडे यांनी केली आहे. निवेदन देते वेळी युवासेनेचे कार्यकर्ते उपस्थित होते.  

हे देखील वाचा: 

स्पर्श क्लिनिक येथे त्वचारोगांविषयी अत्याधुनिक उपचार सुविधा उपलब्ध

लव्ह मॅरेज केलेल्या तरुणाची लॉजमध्ये आत्महत्या

सावधान…! वणीत घरफोडीचे सत्र सुरू…. चोरट्यांची आणखी घरफोडी

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

Comments are closed.