नागेश रायपुरे, मारेगाव: मुलगी अल्पवयीन होती. सजाण नसलेल्या या मुलीला त्याने प्रेमाच्या जाळ्यात ओढले. प्रेमात दोघेही सैराट झाले. त्यांनी दुस-या जिल्ह्यात आसरा घेतला. लग्न न करताच ते एकत्र राहू लागले. मात्र अवघ्या काही दिवसांमध्येच त्यांच्यात खटके उडाले. अखेर प्रेयसीला फसवणूक झाल्याचे लक्षात आले. ती परत आली मात्र प्रियकरापासून ती 5 महिन्यांची गर्भवती असल्याचे आढळून आले. ही घटना मारेगाव येथील आहे. सध्या पसार झालेल्या आरोपीचा पोलीस शोध घेत आहे.
आरोपी संतोष दत्तू चौघुले (27) हा मारेगाव येथील रहिवाशी आहे. त्याची शहरातीलच एक अल्पवयीन मुलीशी ओळख होती. त्याने तिला प्रेमाच्या जाळ्यात ओढले. संतोषने तिला लग्नाचे वचन देत सुखी संसाराचे स्वप्न दाखवले. डिसेंबर महिन्यात संतोषने त्या अल्पवयीन मुलीला पळवून नेले. त्याबाबत पीडितेच्या आईने याबाबत मारेगाव पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती. मात्र त्यांचा शोध लागू शकला नाही.
संतोष हा पीडितेला पळवून चंद्रपूर जिल्ह्यातील कोरपना तालुक्यातील नारंडा गावी गेले. तिथे ते लग्न न करताच एकत्र राहू लागले. संतोष हा मोलमजुरी करायचा. अशातच दोघातील प्रेमाचा रंग फिका पडला. त्या दोघांमध्ये छोट्या छोट्या गोष्टींवरून भांडण होण्यास सुरूवात झाली. अखेर सातत्याने होणा-या वादामुळे पीडिता घरी मारेगावला परत आली व तिने मारेगाव पोलीस स्टेशन गाठत आरोपीविरोधात फसवणूक केल्याची तक्रार दाखल केली.
दरम्यान पीडितेची वैद्यकीय तपासणी केली असता पीडिता गर्भवती असल्याचे आढळून आले. त्यावरून पोलिसांनी आरोपी संतोष दत्तू चौघुले याच्याविरोधात भादंविच्या कलम 376 व पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल केला. सध्या आरोपी फरार झाला असून आरोपीच्या शोधात पोलिस पथक रवाना केले आहे. अधिक तपास पोलिस उपनिरीक्षक अमोल चौधरी करीत आहे.
हे देखील वाचा: