वणीकरांचा मनसेला कौल… पण सर्व विरोधकांची एकी: वारे नगरपालिकेचे भाग 9
मनसेची राज्यात नगरपालिकेची एकमेव सत्ता वणीत.... या कार्यकाळात नगरपालिकेवर राहिला महिला राज, तिन्ही नगराध्यक्ष महिला.
जब्बार चीनी, वणी: 2011 नगरपालिका निवडणुकीचा निकाल केवळ वणी शहर किंवा यवतमाळ जिल्हा नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रात खळबळ उडवून देणारा होता. या निवडणुकीत मनसेने मुसंडी मारत सर्वाधिक जागा जिंकत एकच धक्का दिला. सर्वांना वाटत होते की आता मनसेची सत्ता येणार. मात्र अशा काही रंजक घडामोडी घडल्या की मनसेचे स्वप्न क्षणात भंगले. या पंचवार्षीकची आणखी एक विशेषत: म्हणजे या 5 वर्षांच्या काळात तिन्ही नगराध्यक्ष या महिला होत्या. तर आजच्या वारे नगरपालिका या सिरिजच्या 9 व्या भागात आपण 2011 ते 2016 च्या नगरपालिका कार्यकाळाबाबत जाणून घेऊया…
वारे नगरपालिकेचे भाग 9 (2011 ते 2016)
2011 च्या निवडणुकीत 25 जागांसाठी निवडणूक झाली. यात सर्वाधिक 8 जागा मनसेला मिळाल्या. राष्ट्रवादीला 4 जागा, शिवसेना 3, काँग्रेस 2 व भाजपला अवघ्या 1 जागेवर समाधान मानावे लागले. तर अपक्षांनी 7 जागांवर विजय मिळवला. या निवडणुकीत सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसचा दारुण पराभव झाला. त्यांच्या 8 जागावरून 4 जागा झाल्या.
मनसेची अचानक मुसंडी…
मनसेने नगरपालिकेच्या दोन वर्षांआधीपासूनच नगरपालिकेची तयारी सुरू केली होती. इच्छुक नगरसेवकांचा जनसंपर्क, पाणी समस्येत नागरिकांना टँकरद्वारा पाणी पुरवठा, मीडियाचा पुरेपुर वापर इत्यादींमुळे मनसेने विजयासाठी आधीच पिच तयार करून ठेवली. तर दुसरीकडे सत्ताधा-यांचा भोंगळ कारभार, सतत गैरहजर राहणारे नगराध्यक्ष, पाणी समस्या, लोकांची नाराजी, ऍन्टी इन्कम्बसी याचा फटका राष्ट्रवादी काँग्रेसला बसला व लोकांनी पहिल्यांदाच मनसेला कौल दिला.
सर्वात मोठा पक्ष असूनही संधी हुकली
वणी नगपालिका निवडणुकीचा निकालाच्या काळातच नागपूर येथे हिवाळी अधिवेशन सुरू होते. तेव्हा नगरसेवकांचा आणि राजू उंबरकर यांचा सत्कार करण्यासाठी मनसेचे सर्व आमदार थेट वणी य़ेथे पोहोचले. त्याची शहरात एकच चर्चा झाली. वणीची दखल आता राज्यापातळीवर झाल्याने नगरपालिकेत मनसेची सत्ता येणार हे जवळपास निश्चित होते. कारण इतर पक्षाचे संख्याबळ सत्तेत येण्याच्या आसपासही नव्हते. या यशाने मनसे काहीशी हुरळून गेली होती.
दुसरीकडे मनसे सत्तेत येणार त्यामुळे इतर पक्षांमध्ये चांगलीच खळबळ उडाली होती. तेव्हा सर्वाधिक चर्चेत असलेला पक्ष मनसे होता. जर नवखी मनसे सत्तेत आली तर इतर पक्षांना ते तोट्याचे ठरू शकते शिवाय विधानसभेवरही याचा प्रभाव पडेल अशी शंका इतर पक्षांना होती. याचवेळी सेनेचे नेते सुधीर थेरे यांच्या पत्नी अर्चना थेरे या देखील निवडून आल्या होत्या. त्यांचे देखील नगराध्यक्षपदाचे ध्येय होते. त्यातून मनसेला बाहेर ठेवून सत्ता स्थापनेसाठी ज्या काही राजकीय घडामोडी घडल्या त्या अत्यंत रंजक होत्या.
सुधीर थेरे यांची शिवसेनेचे ज्येष्ठ नेते दिपक कोकास यांचा राईट हँड म्हणून ओळख होती. त्यामुळे राजकीय घडामोडीत दिपक कोकास उडी घेणार हे निश्चित होते. तेव्हा राष्ट्रवादीच्या स्ट्रॅटेजीचे बरेचसे काम अशोक चिंडालिया बघायचे. मनसे पुढे डोईजड होऊ शकते यातून सेना आणि राष्ट्रवादी यांच्या नेत्यांची गुप्त बैठक झाली. यात मनसे वगळून व अपक्षांना सोबत घेऊन सत्ता स्थापन करता येऊ शकते अशी शक्यता दिसली. त्यामुळे त्यांनी यासाठी प्रयत्न करण्याचे निश्चित केले. अर्चना थेरे यांचे नाव नगराध्यक्षपदासाठी ठरले. 7 अपक्ष नगरसेवकांपैकी 2 ते 3 नगरसेवक हे मनसेच्या संपर्कात होते. मात्र इतरांना आपल्या गटात ओढायचे ठरले. यावेळी काँग्रेसचे 2 नगरसेवक असले तरी सत्ता कोणाची येणार हे काँग्रेसच्या निर्णयावर अवलंबून होते.
नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीला अवघे 2-3 दिवस शिल्लक होते. मनसे निश्चिंत होती. तर इतर पक्ष सत्ता स्थापनेसाठी नगरसेवकांना गोळा करण्याचा प्रयत्न करीत होते. यात त्यांनी भाजपचा 1 नगरसेवक व 3-4 अपक्ष नगरसेवकांना आपल्याकडे वळवण्यात यश मिळवले. मनसे वगळून सत्ता स्थापनेचा प्लान काहींनी काँग्रेसचे तत्कालीन आमदार वामनराव कासावार यांच्या पर्यंत पोहोचवला. मात्र मनसेला खऱच दूर ठेवता येईल याबाबत ते साशंक नव्हते. जर तसे जूळून आले तर समर्थन राहिल अशी भूमिका त्यांनी घेतली. कारण त्यांना देखील शहरात मनसेची सत्ता नको होती. काँग्रेसचे समर्थन मिळतात मनसे विरोधकांचे पारडे जड झाले. त्यांच्याकडे आता 14 ते 15 नगरसेवक झाले.
शेवटी शेवटी सत्तेसाठी सर्व विरोधक एकत्र येत असल्याची चाहूल मनसेला लागली होती. त्यांनी हे टाळण्यासाठी वरिष्ठ पातळीवरून अनेक प्रयत्न केले. वरून फोनाफानी सुरू झाली. मात्र त्याचा फायदा झाला नाही. शेवटच्या काळात मनसेच्या संपर्कात असलेल्या 2-3 नगरसेवकांनीही पारडे बदलवले. निवडणुकीच्या दिवशी तर वातावरण इतके तंग होते की अधिकाधिक नगरसेवकांचे मोबाईल त्यांच्याजवळून काढण्यात आले. तर ज्यांनी मोबाईल जवळ ठेवले त्यांच्याजवळ वॉचिंगसाठी एक व्यक्ती ठेवण्यात आली. निवडणुकीत सेनेच्या अर्चना थेरे विजयी झाल्या व त्या नगरपालिकेच्या 27 व्या नगराध्यक्ष झाल्या. तर मनसेचा हातातोंडाशी आलेला सत्तेचा घास हिरावला गेला. वणीकर जनतेने कौल दिला असतानाही केवळ राजकीय डावपेचात कमी पडल्याने मनसेचे सत्तेचे स्वप्न भंगले. याचे अनेकांना वाईटही वाटले
मनसे गाफील राहिली का?
याबाबत अनेक मतेमतांतरे आहेत. काही लोक याला मनसेचा ओव्हर कॉन्फिडन्स मानतात. नगराध्यक्ष पदासाठी चालणारे राजकारण, घोडेबाजी याचा कोणताही अनुभव मनसेजवळ नव्हता. शिवाय मनसेने सत्तेसाठी नगरपालिकेच्या राजकारणाचा अनुभव असलेल्या एखाद्या अनुभवी व्यक्तीची मदतही घेतली नाही. दुसरी गोष्ट म्हणजे या काळात स्थानिक राजकारणात ऍक्टिव्ह राहण्यात इतर पक्षापेक्षा मनसे बराच पुढे होता. पाणीटंचाईत टँकरने केलेले पाणीवाटप शिवाय स्थानिक प्रश्न उचलण्याच्या बाबतीतही मनसे सर्वात आघाडीवर होती. गावखेड्यातून कोणतीही व्यक्ती कामसाठी थेट मनसेचे कार्यालय गाठू लागली होती. मनसेची ही घोडदौड अनेकांना भविष्यासाठी डोईजड होणार होती. त्यामुळे सर्वांनी मनसेला दूर ठेवण्यासाठी एकत्र येण्यातच धन्यता मानली. विशेष म्हणजे एकमेकांचे विरोधक असलेले सेना-राष्ट्रवादी-काँग्रेस-भाजप असे सर्व पक्ष यावेळी एकत्र आले होते.
अडीच वर्षांनंतर मिळाली मनसेला संधी
अर्चना थेरे यांच्या काळात विरोधी पक्ष म्हणून मनसेने आपली चमक सभागृहात दाखवली. मनसेचे सर्व नगरसेवक प्रचंड आक्रमक राहायचे. अनेक आरोप प्रत्यारोपात अर्चना थेरे यांचा 2.5 वर्षांचा कार्यकाळ संपला. अर्चना थेरे यांचा कार्यकाळ संपल्यानंतर यावेळी नगराध्यक्ष पद हे एससी महिला राखीव आले. नगराध्यक्ष पदासाठी मनसेतर्फे प्रिया लभाने आणि विरोधकांतर्फे अपक्ष नगरसेविका करुणा कांबळे यांनी नामांकन दाखल केले.
लभाने यांनी नामांकनावर केलेल्या हस्ताक्षरामुळे त्यावेळी वाद झाला होता. त्यावर लभाने यांनी अमरावती आयुक्ताकडे धाव घेतली. यात त्यांचे नामांकन कायम ठेवण्यात आले. 31 जुलै 2014 रोजी नगराध्यक्ष पदासाठी निवडणूक झाली. निवडणुकीच्या दिवशी करुणा कांबळे अनुपस्थित राहिल्या व लभाने या 20 विरुद्ध 4 मतांनी निवडून आल्या. तर उपाध्यक्ष पदी मनसेचे अशोक बुरडकर हे अविरोध निवडून आले. लभाने यांच्या रुपात पहिल्यांदाच राज्यात मनसेला नगराध्यक्ष होण्याचा मान मिळाला. तर उपाध्यक्षपदही मनसेच्याच पदरी पडले.
नगरपालिकेत झाली हाणामारी
प्रिया लभाने या नगराध्यक्ष तर झाल्या मात्र मनसेसाठी हा कार्यकाळ खडतर ठरला. कार्यकाळ सुरू होताच मनसेमध्ये दुफळी निर्माण झाली. अंतर्गत वादामुळे काही नगरसेवक हे राजू उंबरकर यांच्या विरोधात गेले. त्याचा परिणाम नगराध्यक्षावर पडला. फेब्रुवारी 2015 मध्ये एका सभेच्या वेळी काही महिला आपले प्रश्न घेऊन नगरपालिकेत आल्या. यावेळी मनसेचे नाराज नगरसेवक अखिल सातोकर व सिद्धीक रंगरेज यांनी महिलांची बाजू घेतली. नगराध्यक्ष प्रिया लभाने, धनंजय त्रंबके यांच्यावर महिलांनी हल्लाबोल केला. धनंजय त्रंबके यांना संतप्त महिलांनी एका खोलीत बंद केले. नगराध्यक्षांनाही धक्काबुक्की करण्यात आली. यावरून सत्ताधारी व विरोधात आपसात भिडले. या प्रकरणी परस्पर विरोधी तक्रार करण्यात आली होती.
मनसेच्या 8 पैकी 5 नगरसेवकांचे बंड
पुढे मनसेच्या नगरसेवकांमधले वाद विकोपाला गेले. त्यातून 5 नगरसेवकांनी बंड पुकारले. याचा विरोधक फायदा घेणारच होते. मनसेला सत्तेबाहेर करण्यासाठी खलबते सुरू झाले, प्रिया लभाने यांच्यावर अविश्वास प्रस्ताव आणण्याचे ठरले. यात 5 नगरसेवकांनी पक्षाविरोधात बंड पुकारत नगराध्यक्षांच्या विरोधात मतदान केले. अखेर प्रिया लभाने यांचा 1.5 वर्षांचा कार्यकाळ संपुष्टात आला व राज्यात मनसेची एकमेव सत्ता असेलेली वणी नगरपालिकेची सत्ता मनसेच्या हातून गेली.
हाती आलेली संधी मनसेने गमावली?
राज्यात मनसेची एकमेव सत्ता असलेली नगरपालिका म्हणजे वणी नगरपालिका होती. मनसे सत्तेत आल्याने त्याचा फायदा पक्षाला होणार हे निश्चित होते. मात्र त्यावेळी मनसेच्या अर्ध्याअधिक नगरसेवकांनी राजू उंबरकर यांच्या विरोधात बंड पुकारले होते. नगरपालिकेत सातत्याने होणारा गोंधळ, आरोप प्रत्यारोपांच्या फैरी, नगराध्यक्षांवर अचानक आलेला अविश्वास प्रस्ताव इत्यादी कारणांमुळे मिळालेल्या संधीचे सोने करणे मनसेला जमले नाही. जर जाणकार असेही मानतात की जर पंचवार्षीक मधल्या पहिल्या अडीच वर्षांच्या काळात जर नगरपालिकेत मनसेची सत्ता आली असती तर भविष्यात राजकीय चित्र हे खूप वेगळे राहिले असते. शिवाय दुस-यांना मनसेला संधी मिळाली. त्यावेळी जरी मनसेने संधीचे सोने केले असते तर त्याचा राजकीय पटलावर परिणाम नक्कीच जाणवला असता.
करुणा कांबळे झाल्या नगराध्यक्ष
लभाने यांच्यावर अविश्वास प्रस्ताव आणल्याने एससी महिला असलेल्या एकमेव नगरसेवक या करुणा कांबळे होत्या. ऑक्टोबर 2015 रोजी त्या अविरोध निवडून आल्या व वणी नगरपालिकेच्या त्या 28 व्या नगराध्यक्ष झाल्या. मात्र त्यांचा कार्यकाळ हा अवघा 1.2 वर्षांचा होता. त्यातही काही काळातच त्यांनी आपला कार्यभार उपाध्यक्ष अशोक बुरडकर यांच्याकडे दिला होता. त्यामुळे त्यांना ही विशेष काही करण्याची संधी मिळाली नाही. डिसेंबर 16 पर्यंत म्हणजे निवडणूक होई पर्यंत त्या नगराध्यक्ष पदी होत्या.
पुढे निवडणूक जाहीर झाल्या. मात्र तोपर्यंत वणीच्या राजकीय पटलावर अनेक घडामोडी घडल्या होत्या. तर दुसरीकडे त्याचवेळी राज्यात आणि केंद्रातही प्रचंड उलथापालथ झाली होती. त्याचा वणीच्या नगरपालिकेच्या निवडणुकीवर कसा प्रभाव पडला याबाबत सविस्तर आपण वारे नगरपालिकेच्या पुढल्या भागात पाहणार आहोत.
(2016 ते 2021 चा काळातील घडामोडी वारे नगरपालिकेच्या पुढच्या भागात)
वारे नगरपालिकेचे या सर्वाधिक लोकप्रिय सिरिजचे जुने भाग खालील लिंकवर:
…आणि खुद्द नगराध्यक्षच राहायचे गैरहजर: सत्ता येऊनही तोटा झालेली टर्म
मतदानाला 12 गेले… 12 च परत आले… पण मत मिळाले 11: वारे नगरपालिकेचे भाग 5
…आणि हत्याकांडात आले तत्कालीन नगराध्यक्षांचे नाव…. वारे नगरपालिकेचे भाग 3
Comments are closed.