विजयापेक्षा पराभवाची चर्चा ! वणीमध्ये शिंदेसेना का अपयशी ठरली?

धुवांधार प्रचार, एकनाथ शिंदे यांची जाहीर सभा.. कुठे कमी पडली शिवसेना (शिंदे) ?

 निकेश जिलठे, वणी: ”इतना भी गुमान ना कर अपनी जीत पर ऐ बेखबर, शहर में तेरी जीत से ज्यादा चर्चे तो मेरी हार के हैं।” सोशल मीडियावर प्रसिद्ध असलेली ही शायरी वणीतील शिंदेसेनेचे नेते विजय चोरडिया यांना तंतोतंत लागू होत आहे. याचे कारण म्हणजे शहरात नगरपालिका निवडणुकीच्या निकालानंतर भाजपच्या विजयापेक्षा विजय चोरडिया यांच्या परभवाचीच चर्चा अधिक रंगत आहे. कुठे शिंदेसेनेचा सहज विजय हातून गेला? कुठे शिंदेसेना कमी पडली? शिंदेसेनेला एका तरी विजयाची आशा होती का? इत्यादी कारणांचे विश्लेषण आपण नगर पालिका निवडणूक विश्लेषणाच्या तिस-या भागात करणार आहोत. तत्पुर्वी वणी शहरातील शिंदेसेनेबाबत थोडक्यात पार्श्वभूमी जाणून घेऊया.

निवडणुकीच्या काही दिवस आधीच विजय चोरडिया यांनी भाजपला सोडचिठ्ठी देत शिवसेना (शिंदे गट) ची वाट धरली. शिंदेसेना ही भाजपची केंद्र व राज्यातील सत्ताधारी मित्रपक्ष असल्याने, भाजप सोडून शिंदेसेनेत जाणे म्हणजे जणू एकाच घरात वेगळे पार्टिशन करून राहण्यासारखेच आहे. नगरपालिका निवडणुकीत भाजप स्वबळावर लढणार हे जवळपास निश्चित झाले होते. त्यामुळे शिंदेसेनेची भूमिका काय असेल याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. त्यात शिंदेसेनेला विजय चोरडिया यांच्यासारखा ज्येष्ठ, अनुभवी आणि सर्व बाजूंनी परिपूर्ण नेता मिळाल्याने निवडणुकीत रंगत येणार हे निश्चित मानले जात होते.

गाजावाजा करीत संपूर्ण ताकदीने शिंदेसेनेने निवडणूक लढली. अमुक सिट पक्की, तमुक सिट पक्की असा मोठा दावा करण्यात आला. लाडक्या बहिणींचे भाऊ उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची वणीत जाहीर सभाही झाली. मात्र निवडणुकीत शिंदेसेनेला खातेही उघडता आले नाही. याशिवाय भाजपला शिंदेसेनेचा मोठा फटका बसेल अशी भीती व्यक्त केली जात होती. मात्र याचा भाजपला विशेष फरक पडला नाही. स्वत:च्या प्रभागात देखील जिंकता आले नाही, काँग्रेस नेत्याने आपला जावई निवडून आणता, पण शिंदेसेनाला आणता आला नाही. अशी बोचरी टिकाही विरोधकांनी केली. मात्र शिंदेसेनेचे महत्त्व नाकारता येण्यासारखे नाही.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

ही शिंदेसेनेची वणी शहरातील पहिलीच निवडणूक होती. शहरात पक्षाचे संघटन नव्हते, कार्यकर्त्यांची मजबूत फळी उभी नव्हती, तर स्थानिक नेतृत्व आजारी असल्याने सक्रिय राहू शकले नाही. असे असतानाही अनेक प्रभागांमध्ये शिंदेसेनेने दुसरा, तर काही ठिकाणी तिसरा क्रमांक मिळवला. प्रभाग 8 ब, 10 अ, 10 ब, 11 अ, 11 ब आणि 14 क या सहा प्रभागांमध्ये शिंदेसेना दुसऱ्या क्रमांकावर होती. विशेष म्हणजे प्रभाग 8 ब मध्ये केवळ 39 मतांनी पराभव स्वीकारावा लागला. नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार कु. पायल यशवंत तोडसाम यांना 4351 मते मिळून तिसऱ्या क्रमांकावर समाधान मानावे लागले.

निवडणुकीची अपुरी पूर्वतयारी
वणीतील शिंदेसेनेची जबाबदारी माजी आमदार विश्वास नांदेकर आणि विनोद मोहितकर यांच्याकडे होती. मात्र तब्येतीच्या कारणामुळे विश्वास नांदेकर यांना संघटनाकडे पुरेसे लक्ष देता आले नाही. परिणामी, ऐनवेळी निवडणुकीची सर्व सूत्रे विजय चोरडिया यांच्या हाती आली. या अचानक बदलामुळे उमेदवार निवड, नियोजन आणि संघटन या तिन्ही आघाड्यांवर शिंदेसेना कमी पडली. याशिवाय, ऍन्टी-इन्कम्बन्सी असलेले, तसेच प्रभागातील नागरिकांचा अपेक्षित पाठिंबा नसलेले काही उमेदवार पक्षात आले, ज्याचा थेट परिणाम मतदानावर झाला.

इमेज बिल्डिंगचा अभाव
कु. पायल तोडसाम या क्रीडा क्षेत्रातून आलेल्या, उच्चशिक्षित, तरुण व तडफदार महिला उमेदवार होत्या. क्रिकेटच्या माध्यमातून वणीचे नाव उज्ज्वल करणारी ही खेळाडू शिंदेसेनेसाठी जमेची बाजू ठरू शकली असती. मात्र त्यांच्या व्यक्तिमत्त्वाची आणि कार्याची प्रभावी इमेज बिल्डिंग करण्यात पक्ष कमी पडला. त्या इतर उमेदवारांपेक्षा कशा वेगळ्या व सक्षम आहेत, हे मतदारांपर्यंत पोहोचवण्यात अपयश आले. क्रीडा क्षेत्रात असणारे विविध मुद्दे, समस्या उचलून क्रीडा क्षेत्रात कार्यरत तरुण, तरुणींची मदत शिंदेसेनेला घेता आली असती. क्रीडा क्षेत्रात कार्यरत असलेली तरुण-तरुणींची मोठी फौज वणीत आहे. मात्र त्यांना पायल तोडसामच्या प्रचारासाठी जोडण्यात यश आले नाही.

चुकीच्या इनपुटवर स्ट्रॅटेजी
विजय चोरडिया हे एक ज्येष्ठ नेते आहे. राजकारणाचा त्यांना दीर्घ अनुभव आहे. मात्र त्यांच्या सभोवताल असलेल्या गराड्याने त्यांना ख-या इनपुटऐवजी ‘कान गोड’ करणा-या इनपुट दिल्या. “अमुक एरिया पॅक, तमुक एरिया पॅक, ही सिट शुअर, ती सिट शुअर” असे गोड गोड इनपुट विजय चोरडिया यांच्या पर्यंत गराड्याने पोहोचवले. ग्राउंड लेव्हलवरील वास्तव परिस्थिती त्यांच्यापर्यंत पोहोचलीच नाही. परिणामी चुकीच्या गृहितकावर व इनपुटवर निवडणुकीची स्ट्रॅटेजी आखली गेली आणि त्याचा फटका निवडणुकीत बसला.

नव्या-जुन्या कार्यकर्त्यांचा ताळमेळ
विजय चोरडिया यांची ऐन निवडणुकीच्या तोंडावर शिंदेसेनेत प्रवेश झाला. त्यांच्यासह त्यांच्या सहका-यांनीही शिंदेसेनेची वाट धरली. मात्र निवडणुकीच्या वेळी नव्या आणि जुन्या कार्यकर्त्यांमध्ये व पदाधिका-यामध्ये समन्वयाचा अभाव राहिला. मनिष सुरावार सारखे पदाधिकारी व इतर काही कार्यकर्ते केवळ समन्वयाच्या अभावाने अर्धा प्रचार झाल्यावर प्रचारात जुळल्या गेले. तर काही कार्यकर्त्यांनी आधीच दुस-या उमेदवाराच्या प्रचाराची जबाबदारी उचलली होती. याचा काही प्रमाणात मतदानावर परिणाम झाला.

मीडियाकडे दुर्लक्ष, प्रचारावर परिणाम
मीडिया हा निवडणुकीच्या काळात हवा करण्यासाठी मोठी भूमिका बजावतो. मतदारांपर्यंत पोहोचण्याचे मीडिया हे एक प्रभावी माध्यम आहे. मात्र मीडियाकडे अपेक्षित तेवढे लक्ष दिले गेले नाही. प्रचार फेऱ्या, कॉर्नर सभा, नियोजनबद्ध मुद्दे यांचे प्रभावी मीडिया प्रेझेंटेशन झाले नाही. उमेदवार सरस कसा याची इमेज बिल्ड झाली नाही. परिणामी पक्षाची भूमिका, कामगिरी व व्हिजन मतदारांपर्यंत प्रभावीपणे पोहोचले नाही. रिल्सच्या माध्यमातून प्रचार करण्यात आला. मात्र त्याची व्याप्ती कमी आहे. त्यामुळे पक्षाचा मर्यादीत प्रचार हवा करण्यात अपयशी ठरला. 

शिंदेसेनेची ही वणीतील पहिलीच निवडणूक होती. त्यातच पक्षाने संपूर्ण ताकदीनिशी धुवांधार प्रचार केला. शहरभर रॅल्या, कॉर्नर सभा आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची जाहीर सभा यामुळे निवडणूक वातावरण तापले होते. मात्र या जोरदार प्रचाराला योग्य नियोजन, समन्वय आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे परिणामकारक स्ट्रॅटेजीची जोड मिळाली असती, तर किमान खाते उघडणे तरी शिंदेसेनेसाठी अशक्य नव्हते, अशी चर्चा राजकीय वर्तुळात होत आहे.

जिंकता आले नसले तरी शिंदेसेनेने निवडणुकीत चांगली रंगत आणली, हे मात्र नाकारता येणार नाही. अनेक प्रभागांत दुसऱ्या व तिसऱ्या क्रमांकाची मते मिळवत पक्षाने आपले महत्त्व ठळकपणे नोंदवले. पराभव स्वीकारताना शिंदेसेनेचे नेते विजय चोरडिया यांनीही नम्र भूमिका घेतली आहे. दरम्यान, लवकरच होऊ घातलेल्या जिल्हा परिषद निवडणुकांमध्ये शिंदेसेना या अनुभवातून काय धडा घेते आणि त्याचा परफॉर्मन्स कसा राहतो, याकडे आता राजकीय वर्तुळासह सर्वांचे लक्ष लागले आहे. (पुढील भाग लवकरच…) (भाग 1 व भाग 2, 4 खालील लिंकवर)

कधीकाळी काँग्रेसचा गड असलेल्या वणीत भाजपचे पाय मजबूत !

शिवसेना उबाठाच्या तोंडचा घास भाजपने पळवला ?

भाजपच्या विजयाचा शिल्पकार कोण? का मिळालं बम्पर यश ?

Comments are closed.