वणीत माकप व किसान सभेचे निदर्शने आंदोलन
महागाई, शेतकरी विरोधी धोरणाच्या निषेधार्थ जोरदार निदर्शने
जब्बार चीनी, वणी: मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष व किसान सभेच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यासमोर गुरुवारी जोरदार निदर्शने आंदोलन करण्यात आलं. वाढती महागाई व शेतकरी विरोधी धोरणांच्या निषेधार्थ हे आंदोलन करण्यात आले. या आंदोलनाचे नेतृत्व कॉम्रेड शंकरराव दानव, कॉ. कुमार मोहरमपुरी व कॉ. ऍड. दिलीप परचाके यांनी केले. यावेळी मोठ्या संख्येने आंदोलक उपस्थित होते. आंदोलनानंतर विविध मागण्यांचे निवेदन उपविभागीय अधिकारी यांचे मार्फत देशाचे प्रधानमंत्री यांना देण्यात आले.
गेल्या 7 वर्षांपासून मोदींच्या भाजप सरकारचे काळात देशभरात सामान्य जनतेला प्रचंड त्रास सहन करावा लागत असून देशातील मुख्य धारेतील शेतकरी व कामगार सातत्याने आंदोलन करत आहे. ह्यांना दिलासा देण्याऐवजी ह्यांना गुलामगिरी च्या खाईत ढकलण्याचे कायदे ह्या मोदी सरकारकडून केल्या जात असून जीवनावश्यक वस्तूचे भाव वाढवून देशातील जनतेकडे असलेनसले ही काढून घेतल्या जात असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला.
गेल्या 7 महिन्यापासून दिल्लीच्या सीमेवर सुरू असलेल्या शेतकऱ्यांच्या आंदोलनातील मागण्या त्वरित पूर्ण करीत तीन काळे कृषी कायदे रद्द करावीत, अन्न धान्य, डाळी, तेल व ईतर खाद्य पदार्थांची झालेली भाववाढ कमी करावी, आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमती कमी असतानाही त्यावर प्रचंड कर लावून पेट्रोल, डिझेल व गॅस च्या किमती ची भाववाढ केल्याने आधीच लॉकडाऊन मध्ये भरडला गेलेल्या जनतेला पुन्हा आगीत ओतण्याचे कार्य केंद्र सरकार कडून केल्या जात आहे.
या आहेत आंदोलकांच्या मागण्या
ताबडतोब पेट्रोल, डिझेल वर लावलेले कर रद्द करून किमती सामान्य कराव्या, निराधार, बांधकाम कामगार, घरकामगार, टपरीवाले, छोटे धंदेवाईक यांना जाहीर केलेली आर्थिक मदत ताबडतोब द्यावी, शेतकऱ्याचे थकीत कर्ज माफ करून नव्याने कर्ज पुरवठा करावा, रासायनिक खतांच्या साठा, बोगस खते व भाववाढ यांवर नियंत्रण आणून मुबलक योग्य खत पुरवठा करावा, कोरोना काळात युद्धस्तरावर फार मोठी सेवा देणाऱ्या आशा स्वयंसेविकांच्या मानधनात वाढ करून 18 हजार ₹ मासिक करावे आदी मागण्या ह्या आंदोलनाद्वारे करीत त्या प्रकारचे निवेदन उपविभागीय अधिकारी यांचे मार्फत देशाचे प्रधानमंत्री यांना देण्यात आले.
या आंदोलनात शंकरराव दानव, कुमार मोहरमपुरी, ऍड दिलीप परचाके, मनोज काळे, खुशालराव सोयाम, किसनराव मोहूरले, नंदकुमार बोबडे, सुधाकर सोनटक्के, संजय कोडापे, शिवशंकर बांदूरकर यांच्यासह माकप व किसान सभेचे कार्यकर्ते उपस्थित होते.
हे देखील वाचा: