नागेश रायपुरे, मारेगाव: कोरोनाचा वाढता संसर्ग लक्षात घेऊन प्रशासनाने राज्यात लॉकडाऊनचे नियम कठोर केले आहे. त्यानुसार गुरुवारी मारेगाव येथे प्रशासनाची बैठक झाली. त्यात प्रशासनाने कठोर कारवाईचा निर्णय घेत आजपासून कारवाईस सुरूवात केली. आज दुकाने सुरू ठेवणा-या 5 ते 6 दुकानदारांवर कारवाई करण्यात आली. मात्र त्यांच्यावर सौम्य कारवाई करत केवळ 500 रुपयांचा दंड आकारत इशारा देऊन सोडले. उद्यापासून ही कारवाई कठोर करण्यात येणार आहे. याशिवाय विनाकारण फिरणा-याची रॅपिट ऍन्टिजन टेस्ट घेण्यात येणार असून यात जी व्यक्ती पॉजिटिव्ह येणार त्यांची रवानगी थेट आयसोलेशन सेंटरमध्ये केली जाणार आहे.
कोरोना वायरसच्या दुसऱ्या लाटेने वाढत असलेल्या कोरोना बाधीताची संख्या लक्षणीय असल्याने त्यावर ब्रेक लागावा यासाठी राज्यभरात ब्रेक दे चेन या अभियानाला सुरूवात करण्यात आली आहे. शासनाने जिवनावश्यक वस्तुचे आस्थापणे सकाळी 7 ते 11 यावेळेत चालू ठेवण्याची मुभा दिली आहे. मात्र यानंतरही अनेक दुकानदार आपली दुकाने सुरू ठेवत असल्याचे आढळून आले. त्यामुळे प्रशासनाने त्यांच्यावर सौम्य कारवाई केली. प्रशासनाच्या या कारवाईमुळे शहरातील रस्ते सुनसान झाले होते.
या प्रशासनाच्या कारवाईत तहसिलदार दीपक पुंडे, नायब तहसिलदार दिगांबर गोहोकर नगरपंचायत प्रशासनचे अधिकारी चव्हाण तसेच पोलीस स्टेशनचे सहाय्यक पो. उपनिरिक्षक अमोल चौधरी यांच्यासह महसूल, नगरपंचायत व पोलीस विभागाचे कर्मचारी उपस्थित होते.
हे देखील वाचा:
पक्षांना मिळाले कृत्रिम घरटे… वॉटर सप्लायजवळ उभारले ‘पक्षीतीर्थ’