पोलीस ठाण्यात दोन कर्मचा-यात रंगली ‘फ्री स्टाईल’ !

बाचाबाची वाढून पोहोचली हाणामारीवर? पोलीस ठाण्याचा कारभार 'राम' भरोसे...!

जितेंद्र कोठारी, वणी: सध्या या ना त्या कारणाने चर्चेत असलेले वणी पोलीस ठाणे आता एका नवीन घटनेमुळे चांगलेच चर्चेत आले आहे. नाईटशिफ्टवर असलेले एक पोलीस अधिकारी व एका पोलीस कर्मचा-याची पोलीस ठाण्यातच चांगली जुंपल्याची खमंग चर्चा सध्या शहरात रंगत आहे. आधीच दुचाकी चोरी, शहरात सुरू असलेले घरफोडीचे सत्र इ गुन्ह्याचे धागेदोरे सापडले नसताना आता ठाण्यातील अंतर्गत वाद समोर आल्याने ठाण्याची अब्र वेशीवर टांगली गेली आहे.

गुरुवारी दिनांक 29 च्या रात्री ‘नाईट’ शिफ्टचे कर्मचारी पोलीस ठाण्यात आले होते. दरम्यान रात्री 11 वाजताच्या सुमारास एक अधिकारी आणि ठाण्यातील एक कर्मचा-यांची यांच्यात काही कारणास्तव बाचाबाची झाली. अधिकारी म्हणजे ‘राजे’च, त्यांचा पारा भडकला. ते कर्मचा-याच्या अंगावर ‘टिपायला’ गेले. मात्र त्यांचा भडकलेला पारा पाहून कर्मचा-याच्या देखील मनावरचा ‘धीरज’ सुटला, हा वाद वाढत फ्री स्टाईलपर्यंत पोहोचला, अशी खमंग चर्चा सध्या शहरात रंगत आहे.

दोघांतील एक कर्मचारी हे कायमच वादात असतात. याआधीही एका वादात ते चांगलेच अडकले होते. या वादाच्या काही दिवसानंतर आता ते पुन्हा एका नवीन वादात अडकले आहे. नेमका वाद कशामुळे झाला हे अद्याप कळू शकले नाही. मात्र सकाळी पोलीस दलातूनच हा प्रकार बाहेर आला व शहरात या घटनेच्या चर्चेला उधाण आले. या प्रकाराबाबत उपविभागीय अधिकारी चांगलेच संतप्त झाले असून त्यांनी या दोघांनाही कार्यालयात बोलावल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

वणी पोलीस ठाणे ‘राम’ भरोसे…
गेल्या एक वर्षांपासून वणी पोलीस ठाणे चांगल्या कमी तर इतर गोष्टींसाठीच जास्त चर्चेत आले आहे. ‘शाम’ सोनटक्के यांच्यानंतर ‘राम’कृष्ण महल्ले यांनी ठाणेदार म्हणून पदभार स्वीकारला. त्यांच्या कार्यकाळात कर्मचा-यांवरचा वचक दिसून येत नाही. परिणामी  छोट्या मोठ्या घटनांची तक्रार दाखल न करणे, सातत्याने घडणा-या दुचाकी चोरी, शहरात सुरू असलेले घरफोडीचे सत्र, जुगार अड्यावर पडलेल्या धाडीतील नावे मीडियाला देण्यास असमर्थता दाखवणे, अशा अनेक घटनांमुळे अलिकडे वणी ठाणे चर्चेत आले आहे. अशातच फ्री स्टाईलची घटना समोर आल्याने वणी पोलीस ठाण्यातील कारभार ‘राम’ भरोसे सुरू असल्याचे बोलले जात आहे.

दरम्यान याबाबत उपविभागीय पोलीस अधिकारी संजय पुज्जलवार यांची प्रतिक्रिया आली असून त्यांनी या प्रकार निंदणीय असल्याचा म्हटले आहे. या प्रकरणाचा अहवाल तयार करून तो वरिष्ठांकडे पाठवण्यात येणार आहे. यात जे दोषी आढळणार त्यांच्यावर योग्य कार्यवाही केली जाईल असे देखील त्यांनी म्हटले आहे.

हे देखील वाचा:

चोर-पोलिसाच्या पाठशिवणीचा खेळ असलेली विक्रम वेधा शुक्रवारी सुजाता थिएटरमध्ये

चोरलेली दुचाकी दुस-याच दिवशी चोरटे फिरवत होते ऐटीत, मात्र डाव फसला…

मारेगाव येथील बजाजचे शोरूममध्ये दसरा व दिवाळी निमित्त विविध ऑफर्स लॉन्च

नवरात्रीनिमित्त सर्वात कमी दरात कर्ज उपलब्ध

 

Comments are closed.