वणीच्या इतिहासातील सर्वात मोठी अतिक्रमण मोहीम व सर्वात मोठी पाणीटंचाई

हा काळ इतका वादळी होता की नगराध्यक्षांच्या घरावर चक्क पेट्रोल बॉम्बने हल्ला करण्यात आला... लोक मध्यरात्री उठून पाणी भरायचे... वारे नगरपालिकेचे भाग 7

जब्बार चीनी, वणी: 2001 च्या नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत अपक्ष उमेदवार शालिनी रासेकर यांनी दमदार विजय मिळवून स्थानिक राजकारणात एकच खळबळ उडवून दिली होती. नगरपालिकेची ही टर्म दोन कारणासाठी अत्यंत वादळी ठरली. त्यात पहिला मुद्दा होता शहरातील अतिक्रमणाचा. शहराच्या इतिहासातील सर्वात मोठी अतिक्रमण मोहिम या काळात राबवली गेली व दुसरी म्हणजे वणीच्या इतिहासातील सर्वात मोठी पाणी टंचाई याच काळात निर्माण झाली होती.  त्याच काळात नगराध्यक्षांच्या घरावर चक्क पेट्रोल बॉम्बने हल्ला करण्यात आला होता. आजच्या वारे नगरपालिकेच्या आजच्या भागात आपण 2001 ते 2006 काळातील आढावा घेणार आहोत.

वारे नगरपालिकेचे भाग 7 (2001 ते 2007)

सन 2001 च्या नगरपालिका निवडणुकीचे दोन प्रमुख वैशिष्ट्ये होती. एक म्हणजे या निवडणुकीत पहिल्यांदाच प्रभाग रचना पद्धती आली व दुसरी म्हणजे नगराध्यक्षपदासाठी पहिल्यांदाच थेट नागरिकांच्या मतदानातून निवड झाली. 2001 मध्ये शहरात 25 वार्ड होते. या 25 वार्डाचे 8 प्रभाग करण्यात आले. 2 डिसेंबर 2001 रोजी निवडणूक झाली व दुस-या दिवशी मतमोजणी झाली. या निवडणुकीत नगराध्यक्ष पदासाठी उभ्या असलेल्या अपक्ष उमेदवार शालिनी रासेकर यांनी 6587 मते घेत काँग्रेसच्या नीलिमा काळे यांचा 1 हजारांपेक्षा अधिक मतांनी पराभव केला. राष्ट्रवादी काँग्रेसच्या नलिनी गोलर या तिस-या क्रमांकावर तर भाजपच्या डॉ. हेमलता लामगे या चौथ्या क्रमांकावर होत्या.

शहरात घोंगावले शालिनी रासेकर नावाचे वादळ
शालिनी रासेकर या मुळच्या काँग्रेसच्या. त्या ज्या वार्डाच्या नगरसेविका होत्या. यात जैन ले आउट, गुरुनगर इद्यादी भागाचा समावेश होता. त्या डिसेंबर 1998 पासून मे 2000 पर्यंत शहराच्या नगराध्यक्ष होत्या. मात्र त्यांच्यावर अविश्वास प्रस्ताव आल्याने त्यांना पायउतार व्हावे लागले होते. 2001 मध्ये नगराध्यक्ष पद हे ओबीसी महिला निघाले. त्यामुळे शालिनी रासेकर यांनी आपली दावेदारी सादर करत काँग्रेसकडे नगराध्यक्ष पदासाठी तिकिट मागितले. मात्र त्यांना डावलत निलीमा काळे यांना उमेदवारी देण्यात आली. त्यामुळे त्यांनी बंडखोरी करण्याचा निश्चय केला.

जैन ले आऊट, गुरुनगर, प्रगतीनगर आले धावून
शालिनी रासेकर या वणीच्या इशान्य भागात, गुरूनगर परिसरात राहत होत्या. 1996 ते 2001 या काळात त्या जैन ले आउट, गुरूनगर परिसरातीलच नगरसेविका होत्या. जैन ले आऊटमध्ये त्या काळात नुकतेच डेव्हलप होण्याची प्रक्रिया सुरू झाली होती. तिथे सोयीसुविधांचा प्रचंड अभाव होता. 1996 मध्ये शालिनी रासेकर या वार्डाच्या नगरसेविका होताच त्यांनी या भागाच्या विकासाचा पाया रचला. त्यामुळे या भागातून त्यांना चांगला जनाधार होता. तसेच त्या राहत असलेला गुरुनगर व लगतचा परिसर असलेल्या प्रगतीनगर या भागातील लोकांनी आपल्या परिसरातील व्यक्ती नगराध्यक्ष व्हावी यासाठी पक्षभेद, जातपात विसरून शालिनी रासेकर यांच्या पाठिशी उभे राहण्याचा निश्चय केला. सोबतच एका सर्वसामान्य व विकासभिमुख स्त्रीला तिकीट नाकारल्याने सर्वसामान्य नागरिकांची सहानुभूती शालिनी रासेकर यांना मिळाली होती. त्याचा एकत्रीत परिणाम असा झाला की अपक्ष राहूनही त्यांनी दणदणीत विजय मिळवला.

2001 च्या निवडणुकीचे विजयी उमेदवार
प्रभाग 1 – सुषमा पाटील, पुरुषोत्तम ठेंगणे, सुरेखा पायघन
प्रभाग 2 – पुरुषोत्तम पाटील, शालिनी रासेकर, शेख चांद शेख जुम्मन
प्रभाग 3 – पौर्णिमा शिरभाते, जितेंद्र खिवंसरा, विद्या गंधेवार
प्रभाग 4 – निर्मला प्रेमलवार, परशुराम आवारी, अहमद अली शौकत अली
प्रभाग 5 – कुसुम आडे, दिलीप पचारे, गणेश सुंकुरवार
प्रभाग 6 – कीर्ती देशकर, अरुण पटेल, विजया नालमवार
प्रभाग 7 – गीत घोष, शंकर दानव, राजू डवरे
प्रभाग 8 – सुरेश रायपुरे, घनश्याम पडोळे, किरण पडोळे, भरत ठाकूर

काँग्रेसचा दमदार विजय मात्र नगराध्यक्षपदी अपक्ष उमेदवार
या निवडणुकीत काँग्रेस आणि रिपाइं (कवाडे) या गटाने युती केली होती. या निवडणुकीत काँग्रेसने 10 जागा जिंकून शहरातील आपली ताकत सिद्ध केली. तर त्यांचा सहकारी पक्ष असलेल्या रिपाई-कवाडे गट (पिपल्स रिपब्लिकन पार्टी) ने 4 पैकी 3 जागांवर विजय मिळवला. या आघाडीने अर्ध्यापेक्षा जास्त जागा जिंकत आपले वर्चस्व सिद्ध केले.

शिवसेनेला 4 जागा मिळाल्या तर राष्ट्रवादी काँग्रेसला 2 जागा मिळाल्या. भाकप माकपला प्रत्येकी 1 जागा मिळाली. या निवडणुकीत काँग्रेसने जरी दणदणीत यश मिळवले असले तरी नगराध्यक्ष पदाची माळ मात्र अपक्ष उमेदवार म्हणून थेट जनतेमधून निवडून आलेल्या शालिनी रासेकर यांच्या गळ्यात पडली. त्यामुळे काँग्रेसचा पुरता भ्रमनिरास झाला.

वणीच्या इतिहासातील सर्वात मोठी पण वादग्रस्त अतिक्रमण मोहीम
तत्कालीन मुख्याधिकारी मोहसीन खान हे आपल्या शायराना अंदाजमधून बोलण्यासाठी प्रसिद्ध होते. अतिक्रमण हटाओ मोहिमेमुळे ते शहरात चर्चेत आले. तेव्हा शहरात अतिक्रमण चांगलंच फोफावलं होतं. त्यावर कोणतीही कारवाई होत नसल्याने दिवसेंदिवस त्यात वाढ सुरू होती. संत गाडगेबाबा स्वच्छता अभियान अंतर्गत डिसेंबर 2002 मध्ये खान यांनी अतिक्रमण हटाओ मोहिम राबवण्याचा निर्णय घेतला. शहरात याबाबत भोंगे फिरवण्यात आले. सर्वात मोठा फटका हा रस्त्याच्या कडेला अतिक्रमण करून दुकान टाकलेल्या छोट्या व्यापा-यांना, पानटपरी, चहाटपरी, गॅरेज चालक इत्यादींना बसणार होता. तर काही बडे व्यक्ती मात्र आपल्याला काहीही होणार नाही म्हणून निश्चिंत होते. पण त्यांचा हा गैरसमज होता.

शहरात अतिक्रमण हटले पाहिजे असं मानणारा एक गट होता तर दुसरा गट अतिक्रमण धारकांना पर्यायी व्यवस्था करून दिल्यानंतरच अतिक्रमण हटवावे असे मानणारा होता. या गटात प्रा. घनश्याम धाबर्डे, सोमाजी गेडाम, झिया अहेमद यांच्यासह आणखी 10 ते 15 व्यक्ती होत्या. ते अतिक्रमण धारक छोट्या दुकानदारांची बाजू मांडत होते. अखेर दिनांक 19 डिसेंबर रोजी सकाळी शहरातील यवतमाळ रोडवरील जैताई मंदीर समोरील भागातून या अतिक्रमण मोहिमेला सुरूवात झाली. त्याला विरोध करण्यासाठी अतिक्रमण विरोधी गटही घटनास्थळी दाखल झाला. अतिक्रमण हटवणा-या पथकाच्या बुलडोजरने अवघ्या पाच मिनिटातच रस्त्यारील अनेक दुकाने भुईसपाट केले.

अतिक्रमण विरोधी गटातील व्यक्ती बुलडोजरसमोर झोपले. त्यांना पोलिसांनी अटक केली. संतप्त झालेल्या काही नागरिकांनी यावेळी सौम्य दगडफेकही केली. यात मुख्याधिका-यांची गाडीची काच फुटली होती. याला प्रतिकार म्हणून पोलिसांनी लाठीचार्ज केला. अखेर संध्याकाळी प्रा. घनश्याम धाबर्डे, सोमाजी गेडाम, झिया अहेमद यांच्यासह 14 लोकांना अटक करण्यात आली व त्यांची रवानगी यवतमाळ येथील कारागृहात करण्यात आली. या अतिक्रमण मोहिमेत पहिल्याच दिवशी सुमारे 200 दुकाने हटवण्यात आली. संपूर्ण यवतमाळ रस्ता हा मोकळा झाला होता.

छोटे, मोठे सर्वाचेच अतिक्रमण हटले.
ही कारवाई इतकी मोठी होती की एका आठवड्यातच संपूर्ण शहरातील अर्ध्यापेक्षा अधिक अतिक्रमण काढण्यात आले. हे अतिक्रमण कोणताही भेदभाव न होता सुरू होते. शहरातील दुकाने, पानटपरी, दुकानासमोरील अतिक्रमण करून केलेले बांधकाम यासह कोणाच्या घराचे रेलिंग, कुणाच्या घराचे वॉल कम्पाउंड तर कुणाचे अख्खे घरच अतिक्रमणात गेले. विशेष म्हणजे अतिक्रमणाच्या पहिल्याच दिवशी विविध पक्षाचे कार्यालयही नेस्तनाभूत करण्यात आले. त्या काळात एका पक्षाच्या दोन गटात कार्यालयावरून वाद सुरू होता. अतिक्रमण मोहिमेने त्यांचे कार्यालय जमिनदोस्त करून तो वाद कायमस्वरूपीच मिटवून टाकला होता.

मुख्याधिका-यांना लाच घेताना अटक
अतिक्रमण विरोधी नेत्यांना अटक करण्यात आली. दुस-या दिवशी त्यांना बेल मिळाली. कारागृहात गेल्याने ते देखील संतप्त होते. तर दुसरीकडे अतिक्रमण हटाओ मोहीम सुसाट सुरू होती. त्याला पहिला ब्रेक एका घटनेने बसला. विराणी टॉकीजजवळील एका भंगार व्यावसायिकाने मुख्याधिकारी यांनी गोडावूनचे अतिक्रमण न काढण्यासाठी 25 हजारांची लाच मागितल्याची तक्रार केली. त्यावरून लाचलुचपत विभागाने सापळा रचला. मोहीमेच्या 10 व्या दिवशी दिनांक 28 डिसेंबर रोजी सकाळी 7 वाजताच्या सुमारास 10 हजार रुपयांची लाच स्वीकारताना मोहसीन खान यांना लाच घेताना अटक करण्यात आली. या घटनेने शहरात एकच खळबळ उडाली व अतिक्रमण मोहीम प्रकरणी वेगळाच ट्विस्ट आला.

मोहसीन खान यांच्या अटकेने शहरात त्यांच्या समर्थनात व विरोधात असे दोन गट पडले. तेव्हा अशी चर्चा रंगली होती की अतिक्रमण विरोधी गटानेच त्यांचा विचारपूर्वक ‘गेम’ केला. मात्र मुख्याधिकारी यांच्यावर कारवाई झाली नाही. त्यांनी अतिक्रमण मोहीम आणखी काही दिवस सुरू ठेवली. मात्र त्याची तीव्रता दिवसेंदिवस कमी होत गेली. पुढे मोहसीन खान सेवानिवृत्त झाले. त्यांच्या या मोहीमेत शहरातील सुमारे 70 ते 80 टक्के अतिक्रमण हटल्याचे बोलले जाते. मात्र पुढे यातील अनेक ठिकाणी अतिक्रमण जैसे थे झाले. विशेष म्हणजे याच काळात नगराध्यक्ष यांच्या घरावर पेट्रोल बॉम्ब फेकण्यात आला. असे म्हणतात की अतिक्रमणाच्या रागातून हे कृत्य करण्यात आले होते.

वणीच्या इतिहासात पहिल्यांदाच भीषण पाणीसमस्या
अतिक्रमण, लाच इत्यादींनी 2002 चा सुरुवातीचा काळ गाजला. त्याच्या पुढच्याच वर्षी 2003 चा काळ हा शहरातील पाणी टंचाईने गाजला. असे म्हणतात की वणीच्या इतिहासातील ही सर्वात मोठी पाणी टंचाई होती. त्या वर्षी आलेला अपुरा पाऊस यामुळे वणीची जीवनदायिणी म्हणून ओळख असलेली निर्गुडा नदी ही पावसाळा संपण्याच्या आधीच आटली, त्यामुळे नळ येणे बंद झाले. गणपती उत्सवातच या पाणी समस्येची चाहूल लागली होती. भाविकांना गणपती विसर्जनासाठीही पुरेसे पाणी उपलब्ध नव्हते. मात्र पालिका प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केले. ऐन दिवाळीच्या काळातच पाणी प्रश्न पेटू लागला. त्याबाबत पालिकेचे कोणतेही नियोजन नसल्याने शहरात हाहाकार माजला.

पाणी समस्या ही केवळ शहरातील एका भागापूरती मर्यादीत नव्हती तर संपूर्ण शहरलाच या समस्येने विळखा घातला होता. संपूर्ण शहर तणावात आले. पाण्याची समस्या सोडवण्यासाठी पालिकेने टँकरची सोय केली. 24 तास पाणी टँकर शहरात फिरायचे. टँकर येताच संपूर्ण वस्तीत पाण्यासाठी एकच झुंबड उडायची. प्रत्येक व्यक्ती टँकरसमोर बादली, गुंड, ड्रम घेऊन राहायचे. पाण्याचे टँकर येणार म्हणून लोक अख्खी रात्र जागायचे. टँकर येताच लोक मध्यरात्री देखील झोप मोड करून उठायचे. याच काळात लोकांनी मध्यरात्री 2-3 वाजताही पाणी भरले आहे. कार्यालय, दुकान इत्यादीत काम करणारे अनेक कर्मचारी मध्येच काम सोडून पाणी भरण्यासाठी घरी जायचे.

अनेकांनी पाण्यासाठी सोडले नोकरीवर ‘पाणी’
पाण्यासाठी मारामारी, शिविगाळ, भांडण व्हायची. लोकांचा उद्रेक दिवसेंदिवस वाढत होता. प्रशासन ही समस्या सोडवण्यास सपशेल अपयशी ठरली. याच काळात शहरात पाणी विक्रीचा व्यवसाय सुरू झाला. तेव्हा 20 ते 30 रुपये ड्रमने पाणी विकत मिळायचे. पाण्याची ही समस्या इतकी भीषण होती की केवळ घरी पाणी भरण्यासाठी अनेक लोकांनी आपली खासगी नोकरी सोडल्याचेही बोलले जाते.

पाणी टंचाई बघून अनेकांनी याच काळात घरी बोअरवेल केल्या. तेव्हा फक्त बोअरवेल खोदण्यासाठी आंध्रप्रदेश, मध्यप्रदेश, तामिळनाडू, केरळ इत्यादी राज्यातून शेकडो बोअरवेल मशिन शहरात दाखल झाल्या होत्या. अख्खे शहर तेव्हा बोअरवेल खोदण्याच्या कर्णकर्कश्य आवाजात बुडाले होते. 2003 ते 2004 चा पावसाळा लागत पर्यंत ही समस्या सुरू होती. पालिकेने ठिकठिकाणी ट्युबवेल मारून पाणी प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न केला. राजूर येथील कोळसा खाणीतून पाणी आणण्याचा प्रयोग याच काळात झाला. या काळात अधिकाधिक घरी बोअरवेल झाल्यात. त्यामुळे काही प्रमाणात पाण्याची समस्या सुटली.

विशेष म्हणजे नगरसेवक व नगराध्यक्ष यांच्या घरी सर्वाधिक मोर्चे हे याच काळात गेले व तेही याच पाणी टंचाईबाबत होते. एरव्ही ऐटित फिरणारे नगरसेवक सर्वसामान्य नागरिकांच्या रोषामुळे लपून छपून फिरायचे. लोकाचा उद्रेक बघून, सतत बोलणे खाऊन काही महिला नगरसेविका तर रडकुंडीला देखील यायच्या. पाणी प्रश्नावरून अधिकारी व लोकप्रतिनिधींना या काळात नागरिकांचा चोपही मिळाल्याचे बोलले जाते. पुढे पावसाळ्यात चांगला पाऊस झाला. प्रशासनाने पाणी टंचाईपासून धडा घेत काही उपाययोजना केल्या व पाणी प्रश्न मिटला.

शालिनी रासेकर यांच्यावर अविश्वास प्रस्ताव
या काळात शहरात एक विचित्र सत्ता नांदत होती. सर्वाधिक जागा जिंकून येणारे तेव्हा सत्तेबाहेर होते. तर फक्त एकही नगरसेवक पाठिशी नसलेली उमेदवार ही थेट निवडून नगराध्यक्ष झाली होती. काँग्रेस व पीरिपा हे 25 पैकी 13 जागा जिंकून सदनामध्ये स्पष्ट बहुमतात होते. पण नगराध्यक्ष अपक्ष आल्याने याची खंत त्यांच्या मनात होती. 2.5 वर्ष अविश्वास प्रस्ताव आणता न आल्याने नगरसेवक व नगराध्यक्ष यांच्यातील दरी वाढत गेली. शिवाय नगराध्यक्षांवर कुणाचाही दबाव नसल्याने त्या निर्णय़ घेण्यात नगरसेवकांना विश्वासात घेत नाही, सभागृहात वेगळी चर्चा व्हायची व नगराध्यक्ष वेगळाच ठराव पारित करायच्या असा देखील आरोप तेव्हा नगरसेवक करायचे. शिवाय अपक्ष नगराध्यक्ष असल्याने त्या कोणत्याही पक्षाला जुमानत नाही असाही त्यांच्यावर आरोप झाला.

या सर्व घडामोडीमध्ये नगरसेवकांना नगराध्यक्षांवर अविश्वास प्रस्ताव आणायचा होता. मात्र तेव्हा सरकारने 2.5 वर्षांपर्यंत अविश्वास प्रस्ताव आणता येणार नाही अशी तरतूद केली. त्यामुळे 2.5 वर्ष त्यांना थांबावे लागले. पुढे काँग्रेसशी जुळवून त्यांनी आणखी एक वर्षांचा काळ पूर्ण केला. नगरसेवकांमध्ये विरोध वाढत चालला होता. पुढे काँग्रेस व रिपाईचे नगरसेवक यांनी काही अपक्ष नगरसेवकांना सोबत घेऊन अविश्वास प्रस्तावाचा प्लान केला. एप्रिल 2005 मध्ये शालिनी रासेकर यांच्याविरोधात अविश्वास ठराव पारीत करण्यात आला. 20 विरुद्ध 5 मतांनी हा ठराव पारीत झाला व त्यांना पायउतार व्हावे लागले. दोन वेळा शालिनी रासेकर यांच्यावर अविश्वास ठराव आणल्याने पायउतार होण्याची वेळ आली होती. 

पोटनिवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसची भरारी
नगराध्यक्षावर अविश्वास ठराव आल्यामुळे पोटनिवडणूक झाली. दीड वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करण्यासाठी जून 2005 साली पोट निवडणूक घेण्यात आली. या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या साधना गोहोकर यांनी काँग्रेसच्या निर्मला प्रेमलवार यांचा पराभव केला. या निवडणुकीत पहिल्यांदाच राष्ट्रवादीची नगरपालिकेत सत्ता आली. हा कार्यकाळ जरी एक दीड वर्षांचा असला तरी या काळात राष्ट्रवादी काँग्रेसने स्थानिक राजकारणात आपले पाय रोवले. याच काळात शहरात राष्ट्रवादी काँग्रेस बळकट झाली. त्याच्या परिणाम राष्ट्रवादी काँग्रेसला पुढल्या वर्षीच्या निवडणुकीत पाहायला मिळाला.

(2006 ते 2011 चा काळातील घडामोडी वारे नगरपालिकेच्या पुढच्या भागात)

वारे नगरपालिकेचे या सर्वाधिक लोकप्रिय सिरिजचे जुने भाग खालील लिंकवर

वारे नगरपालिकेचे भाग 1: वणी नगर पालिकेला 96 वर्षांचा इतिहास

…आणि ईश्वरचिठ्ठीने झाला लढतीचा फैसला… वारे नगरपालिकेचे भाग 2

…आणि हत्याकांडात आले तत्कालीन नगराध्यक्षांचे नाव…. वारे नगरपालिकेचे भाग 3

ऍक्सिडेंटल नगराध्यक्ष… संजय देरकर… वारे नगरपालिकेचे भाग 4

मतदानाला 12 गेले… 12 च परत आले… पण मत मिळाले 11: वारे नगरपालिकेचे भाग 5

वारे नगरपालिकेचे भाग 6: 5 वर्षात झाले तब्बल 5 नगराध्यक्ष

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

Comments are closed.