सुरेश पाचभाई, बोटोणी: आज संध्याकाळी करणवाडी स्टॉपजवळ दुचाकी दुभाजकावर (डिव्हायडर) आदळली. या अपघातात दुचाकीचा चालक व मागे बसलेला त्याचा सहकारी जखमी झाला आहे. संध्याकाळी 7 वाजताच्या सुमारास हा अपघात झाला. जखमी झालेले दोन्ही तरुण हे वणी येथील रहिवाशी असून ते कामानिमित्त शिबला येथे गेले होते. तिथून परतताना त्यांच्या दुचाकीचा अपघात झाला.
प्राप्त माहिती नुसार, जखमी गोपाल कुरवडे (30) रा. खाती चौक व सचिन बागरडे (28) रा. शाम टॉकीज हे दोघे वणीतील रहिवाशी आहेत. आज सोमवारी दिनांक 10 जानेवारी रोजी सकाळी ते दोघेही कामानिमित्त वणीहून दुचाकीने (MH34 Q 4368) शिबला येथे गेले होते. संध्याकाळी नवरगाव-करणवाडी- मारेगाव मार्गाने ते वणी परतत होते.
संध्याकाळी 7 वाजताच्या दरम्यान करणवाडी स्टॉप जवळील ट्रक चालकाच्या विश्रामस्थळाजवळ दुचाकी चालकाचे नियंत्रण सुटले व त्यांची दुचाकी रस्त्याच्या डिव्हायडरवर आदळली. या अपघातात दोघेही जखमी झाले. त्यांना घटनास्थळावरील लोकांनी याची माहिती पोलिसांना दिली. पोलीस पथक तातडीने घटनास्थळी पोहोचले व त्यांनी जखमींना मारेगाव येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी आणले.
विश्राम स्थळाजवळील हायमॅक्स लाईट बंद
करणवाडी स्टॉपजवळ असलेल्या ट्रक चालकाच्या विश्रामस्थळी हायमॅक्स लाईट आहे. मात्र अनेक दिवसांपासून हा लाईट बंद अवस्थेत आहे. आज पावसामुळे वातावरणात धुके होते. त्यामुळे डिव्हायडर न दिसल्याने अपघात झाला असावा असा अंदाज आहे. डिव्हायडर न दिसल्याने याआधीही या ठिकाणी अनेक छोटेमोठे अपघात झाले आहे.
दुचाकीस्वारांनी हेलमेट वापरण्याचे आवाहन
काम, नोकरी, बाजार इत्यादी कारणांसाठी मोठ्या प्रमाणात लोक तालुक्याच्या ठिकाणी दुचाकीने येतात. तसेच अनेक लोक नोकरी व इतर कामांसाठी दुचाकीने परगावी जातात. अवजड वाहनांची रहदारी, खराब रस्ते किंवा वन्य प्राणी आडवे आल्याने अपघाताच्या घटना नित्याच्याच आहे. तालुक्यात एका महिन्यात अनेकांना अपघातामुळे जीव गमवावा लागतो. या अपघातात सर्वाधिक मृत्यू हे डोक्याला गंभीर ईजा झाल्याने होतात. अनेक तरुण तसेच घरातील कर्त्याधर्त्या व्यक्तींना डोक्यावर केवळ हेलमेट नसल्याने जीव गमवावा लागला आहे. तर दुसरीकडे फक्त डोक्यावर हेलमेट असल्याने अनेकांचा जीव वाचला आहे. त्यामुळे दुचाकी चालकांनी हेलमेटचा वापर करावा असे आवाहन ‘वणी बहुगुणी’तर्फे करण्यात येत आहे.
हे देखील वाचा:
Comments are closed.