सणाच्या दिवशीच महिलेची गळफास घेऊन आत्महत्या
पुरुषोत्तम नवघरे, वणी: शहरातील विठ्ठलवाडी येथे एका महिलेने गळफास लावून आत्महत्या केली. आज सकाळी 9 वाजताच्या सुमारास ही घटना उघडकीस आली. रश्मी शरद हस्तक (47) असे मृत महिलेचे नाव आहे. सकाळी 8 वाजताच्या सुमारास त्यांनी गळफास घेतला असावा असा अंदाज बांधला जात आहे. घटनेची माहिती मिळताच वणी पोलीस घटनास्थळी दाखल झाले.

रश्मी यांच्या पतीचे दोन वर्षांआधी कोरोना काळात निधन झाले. तर त्यांची मुलगी ही इंजिनियर असून ती बाहेरगावी नोकरी करते. त्यामुळे रश्मी या घरी एकट्याच राहायच्या. त्या एका खासगी शाळेत नोकरी देखील करायच्या. आज बुधवारी दिनांक 22 मार्च रोजी गुडीपाडवा असल्याने त्या सकाळपासून सणाच्या तयारीत होत्या. त्यांनी सकाळी उठून घरासमोर रांगोळी टाकली होती. आंब्याची पाने व फुलांसाठी त्या शेजारच्यांकडे गेल्या होत्या. तसेच शेजा-यांशी त्यांनी संवाद देखील साधला होता.
स. 8 नंतर त्या घरात गेल्या. तिथे जाऊन त्यांनी साडी लावून गळफास घेतला. त्यांच्या मुलीने 9 वाजताच्या सुमारास आईला मोबाईलवर कॉल केला होता. मात्र त्यांनी कॉल रिसिव्ह केला नाही. त्यामुळे त्यांनी शेजा-यांना कॉल करून आईबाबत विचारणा केली. शेजा-यांनी घरी जाऊन बघितले असता ही घटना उघडकीस आली. घटनेची माहिती मिळताच वणी पोलीस घटनास्थळी दाखल झाले व घटनेचा पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी वणीच्या ग्रामीण रुग्णालयात दाखल केला.
रश्मी हस्तक या मनमिळावू स्वभावाच्या होत्या. परिसरात त्या सर्वांशी मिळून मिसळून राहायच्या. आज सणाचा दिवस असल्याने रश्मी या सणाची तयारी करण्यात व्यग्र होत्या. सणाच्या तयारीत असताना काही वेळातच असं काय घडलं की त्यांनी आत्महत्या सारखे पाऊल उचलले? असा प्रश्न परिसरात विचारला जात आहे. रश्मी यांनी उचललेल्या पावलामुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. घटनेचा तपास वणी पोलीस करीत आहे.
हे देखील वाचा:
JOB Alert – प्रयास इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये विविध पदांसाठी भरती
Comments are closed.