क्रांतिकारी महात्मा बसवण्णा

जयंतीनिमित्त विशेष लेख

0

सुनील इंदुवामन ठाकरे, वणी: एक लाख 90 हजार वहाडी लग्नाला आले होते. अशा प्रकारचं लग्न जणूकाही पहिल्यांदाच होत होतं. जवळपास 800 वर्षांपूर्वी ब्राम्हण आणि चांभार परिवारात आंतरजातीय विवाह त्यांनी घडवून आणला. धार्मिक, सामाजिक आणि राजकीय क्षेत्रांत तर गजहबच झाला. धर्म, जात, पोटजातीत गुंतलेल्या सर्वांना एका झेंड्याख्याली आणणाचा त्यांचा प्रयत्न यशस्वी होत होता. कर्मकांड, शोषण, अंधश्रद्धा अशा अनेक गाळात खोल रुतलेल्या समाजाला त्यांनी वर आणलं. ते महामानव होते महात्मा बसववण्णा. अक्षयतृतीयेला त्यांची जयंती सर्वत्र साजरी होत आहे.

मादलांबिका आणि मादिराज या दाम्पत्याच्या पोटी अक्षय्यतृतियेला महात्मा बसवण्णांचा जन्म झाला. त्यांना एक भाऊ आणि बहीण अक्कनागम्मा होती. मौजीबंधनाचं, उपनयनाचं वय झालं. पण यावेळी आगळिकच झाली. लहानग्या बसवानं त्याच्या बहिणीचीदेखील मुंज करावी असा आग्रह धरला. स्त्रीयांना मौजीबंधनाचा अधिकार नसल्याने ते त्यांच्या पालकांना शक्य नव्हतं. त्यामुळे बसवांनीदेखील स्वतःची मुंज नाकारली. अगदी लहान वयातच घेतलेलं हे मोठं क्रांतिकारक पाऊल होतं.

मादिराजचे जावई आणि नागम्माचे पती शिवदेवांनी बसवांना ज्ञानार्जनासाठी कुडलसंगमला पाठवावं असं सुचवलं. जातवेदमुनींकडे त्यांचं शिक्षण सुरू झालं. बसव अत्यंत जिज्ञासू आणि चिकित्सक होते. अनेक तत्त्वज्ञानांसह त्यांनी पाशुपत, काश्मिरी शैवागम, महाशैव, वीरशैव आदि उपासना पद्धतींचा अभ्यास केला. शिक्षण पूर्ण झाल्यावर त्यांच्या बलदेव मामांनी त्यांना मंगळवेढ्याला आणलं. कारकून म्हणून राजसेवेत ते रुजू झालेत. मामाची मुलगी गंगाबिका सोबत त्याचा संसार सुरू झाला.

सिद्धदंडाधिप (सिद्धरस) यांना त्यांनी पाच कोटी होनांची अफरातफर लक्षात आणून दिली. दोषी असलेल्या कोषागार प्रमुख कोंडी मंचण्णाला बडतर्फ करण्यात आलं. त्याच्या जागेवर बसवण्णांची नियुक्ती झाली. पुढे त्यांना अनेक प्रमोशन्स मिळालीत. ते राजा बिज्जलचे महांमंत्री झालेत.

त्यांनी प्रशासनात नियंत्रणासह अनेक बदल केलेत. भ्रष्टाचारी, कामचोरांची हकालपट्टी केली. राज्याची आर्थिक भरभराटही त्यांच्या नियोजनाने झाली. सिद्धरसपद्मगंधी यांची एकुलती मुलगी नीलांबिका हिच्याशी त्यांचा आंतरजातीय विवाह झाला. अल्पायुषी बाल संगय्याचा जन्म झाला. राज्याचा एक जबाबदार अधिकारी म्हणून त्यांची कारकीर्द विशेष गाजली. त्यांची लोकप्रियता दिवसेंदिवस वाढतच राहिली.

बसव सात वर्षांचे होते. त्यांना तहान लागली होती. वडील पूजेत बसले होते. आईदेखील कामातच गुंतली होती. ते अंगणात आले. लहान लहान खड्डे त्यांनी खोदायला सुरुवात केली. काही वेळानंतर वडीलांनी ते पाहिलं आणि चिमुकल्या बसवला त्याचं कारण विचारलं.

यावेळी त्यांनी एकेश्वरवादाचा मोठा सिद्धांत एवढ्या लहान वयातच मांडला. आपण विविध देवतांची उपासना करतो. आपली एनर्जी विखुरते. पाण्यासाठी एकाच जागेवर खड्डा करून विहीर खोदतो. तशीच आपण आपली श्रद्धा एकाच ठिकाणी गुंतवावी, असा त्यांनी आग्रह धरला. इथूनच त्यांनी एकेश्वराची संकल्पना रुजवण्यास सुरूवात केली.

सामाजिक समतेसाठी जवळपास 800 वर्षांपूर्वी त्यांनी केलेली क्रांती विलक्षणच होती. त्यांनी अनेक देवतांऐवजी इष्टलिंग दिलं. कर्मकांडात अडकलेल्यांना आणि पिचलेल्यांना त्यांनी भक्तीचा सोपा आणि सुलभ मार्ग लिंगायत धर्माच्या माध्यमातून मुक्त करून दिला. सामाजिक समता त्यांनी जोपासली. लहान असतानादेखील त्यांनी एका अस्पृश्य मुलाला विहिरीतून बाहेर काढलं होतं.

चातुर्वर्ण्य व्यवस्थेनुसार अन्य वर्णीयांना मंदिर प्रवेश नव्हता. विविध उपासनांचा, भक्तीचा अधिकार नव्हता. महात्मा बसवण्णांनी देह हेच मंदिर आहे असं सांगितलं. इष्टलिंगाची कधीही आणि कुठेही आराधना करण्याची व्यवस्था लिंगायत धर्मात आहे. यात विशेष कर्मकांड नाहीत. ‘कायकवे कैलास’ कर्म हेच कैलास आहे. त्यामुळे त्यांनी कर्माला, परिश्रमाला विशेष प्रतिष्ठा मिळवून दिली.

जन्माला आलेला प्रत्येक जण समान आहे. त्याला समान सन्मान, न्याय व वागणूक मिळावी, असा प्रयत्न लिंगायत धर्मातून सुरू झाला. अनेक जाती-धर्मातील स्त्री आणि पुरुष या समतेच्या चळवळीत सहभागी झालेत. महात्मा बसवण्णांच्या पत्नींचंही या लढ्यात सक्रीय योगदान राहिलं. लिंगायत धर्मात रोटीबेटीचे व्यवहार त्या काळात होऊ लागले. सर्वात महत्त्वाचं म्हणजे अनुभवमंटप ही संकल्पना.

अनुभवमंटप म्हणजे एकप्रकारची संसदच होती. जवळपास 800 वर्षांपूर्वी महात्मा बसवण्णांनी ती सुरू केली. यात अनुभवाचं नवीनीकरण, शुद्धिकरण, वर्गीकरण होतं. 27 वर्षांच्या कालखंडात यात 770 सदस्य होते. त्यात 70 महिला होत्या, हे विशेष. यात ‘वचन’साहित्याची निर्मिती होऊ लागली. लोकभाषा कन्नडमधून आलेल्या गेय रचना रोजच्या जगण्यातल्या अनेक बाबींवर सहज आणि उत्स्फूर्त भाष्य करतात. सामाजिक समता, न्याय आणि आध्यात्म यांचा उत्तम मिलाफ म्हणजे अनुभवमंटप होय.

महात्मा बसवण्णांनी केलेली क्रांती सर्वत्र पसरली. अगदी आजच्या अफगाणीस्तानापर्यंतदेखील. लोक लिंगायतधर्माकडे आकर्षित होऊ लागले. कश्मीरचा राजा मोळीगे मारय्यापासून लहानातल्या लहान घटकांपर्यंत सगळे लिंगायत धर्माचं पालन करू लागले. महात्मा बसवण्णांनी श्रमाला आणि उत्तम व्यवहाराला प्राधान्य दिलं. असं म्हणतात की काश्मीरचा राजा हा लाकडाची मोळी विकून आपला चरितार्थ चालवायचा.

क्रांतीसोबत प्रतिक्रांतीदेखील येतेच. महात्मा बसवण्णांच्या विरोधातदेखील अनेक कटकारस्थान झालेत. त्यांच्या साहित्याची जाळपोळ करण्याचे प्रयत्न झालेत. अक्कानागम्मा, चेन्नबसण्णा? कंक्करय्या, गंगाबिका यांनी वचनसाहित्य उळवीकडे नेलं. ते जपलं. लोकांच्याही अंतकरणात ते पक्क वसलेलंच होतं. विचार असे संपत नसतात, हे पुन्हा सिद्ध झालेत.

साहित्यनिर्मिती, अंधश्रद्धा, जातीभेद तथा अस्पृश्यंता निर्मूलन, श्रमाचा गौरव, स्त्री आणि सर्वांनाच समान न्याय, वेश्यांचं पुनर्वसन, ग्रंथालयांची निर्मिती या क्षेत्रांत महात्मा बसवण्णांचं कार्य खूप खूप मोठं आहे. जगाच्या इतिहासात एवढं मोठं कार्य करणाऱ्या महात्मा बसवण्णांची अक्षय्यतृतिया ही जयंती. त्यांच्या कार्यास विनम्र अभिवादन…

हेदेखील वाचा

अनुसयाबाई गाणार यांचे दीर्घ आजाराने निधन

हेदेखील वाचा

उधारीचे पैसे मागितल्याने युवकाची महिलेस मारहाण

हेदेखील वाचा

लॉकडाऊनमध्ये मयूर मार्केटिंगतर्फे ऑनलाईन सेवा सुरू

Leave A Reply

Your email address will not be published.