सुनील इंदुवामन ठाकरे, अमरावती: दिवाळीच्या पर्वावर ट्रू स्माईल बहुउद्देशीय संस्थेने मेळघाटातील ‘सलोना’ गावात आदर्श उपक्रम घेतला. येथील आदिवासी, विधवा महिला, वृद्ध, गरजू तसेच अनाथ बालकांना दिवाळीनिमित्त विविध भेटवस्तू दिल्यात. दिवाळीला या उपक्रमामुळे अनेकांच्या चेहऱ्यावर स्माईल आले. यावेळी संस्थेच्या संस्थापक आणि अध्यक्ष मरिना डॅनियल, नीता डॅनियल, एरियल डॅनियल, उपाध्यक्ष विल्सन डॅनियल, पदाधिकारी आणि सदस्य उपस्थित होते. या कार्यक्रमाला कोषाध्यक्ष सौरभ विजयकुमार दुबे आणि जॉर्ज डॅनियल यांचे विशेष सहकार्य लाभले.
या उपक्रमांतर्गत वृद्ध, विधवा महिला, अनाथ बालकांना ब्लॅंकेट, काही धान्य, मिठाई, दिवे, मास्क, सॅनिटायझर आणि काही जीवनावश्यक वस्तू दिल्यात. दिवाळीचा सण त्यांना आनंदात साजरा करावा हा त्यामागील हेतू. नुकत्याच स्थापन झालेल्या या संस्थेचा हा पहिलाच उपक्रम आहे.
असे असले तरी संस्थेच्या संस्थापिका तथा अध्यक्षा मरिना डॅनियल या विविध कार्यात सुरुवातीपासूनच अग्रेसर आहेत. त्या स्वतः चिखलदरा येथे राहून मेळघाटातील विविध क्षेत्रांत कार्य करीत आहेत. मेळघाटातील आदिवासी, निराधार विधवा, अनाथ बालकांसाठी त्या निरंतर कार्यरत आहेत.
आदिवासींचे हक्क आणि अधिकारांसाठी मार्गदर्शन करणे. ग्रामसभांचं महत्व सांगणे. महिलांचे अधिकार, आरोग्य आणि स्वच्छतेवर जनजागृती करणे, आदी उपक्रम मरिना डॅनियल व्यक्तिगत पातळीवर राबबीत आहेतच. कामाची व्याप्ती वाढावी याकरिता नुकतीच संस्थेची स्थापना झाली.
मरिना यांना त्यांच्या घरातूनच हा वारसा मिळाला. त्यांचे आजोबा जॉन डॅनियल हे जॉन डॉक्टर नावाने परिचित होते. ते मेळघाटात पायी जाऊन वैद्यकीय सेवा देत. औषधींवर विष्वास न ठेवणाऱ्या काळात आणि क्षेत्रात त्यांनी भरीव कामगिरी केली. वडील एरियल डॅनियल शिक्षक होते. सेवा आणि जनजागृतीचं कार्य ते करीतच आहेत. आई नीता डॅनियल आणि भाऊ विल्सन डॅनियल यांचंही मरिना यांना पाठबळ आहेच.
समज आल्यापासून घराचा वारसा मरिना चालवत आहेत. शासकीय प्राजेक्टमध्ये आपण बांधलेेले असतो. कार्याला सीमा येतात. मोकळं आणि व्यापक कार्य सुरू करण्यासाठी ट्रू स्माईल बहुउद्देशीय संस्था, चिखलदरा येथे स्थापन झाली.
आदिवासींच्या चेहऱ्यावर खरं स्माईल यावं
शासकीय योजना आदिवासांसाठी खूप आहेत. त्या त्यांच्यापर्यंत पोहचवणे गरजेचे आहे. त्यासाठी मी प्रयत्नरत आहे. भविष्यात भटक्यांसाठीदेखील कार्य करण्याचा मानस आहे. वेश्याव्यवसायात अडकलेल्यांना मुक्त करणे. त्याचं पुनर्वसन करणे. भटके, आदिवासी यांचं भविष्य उज्ज्वल करणे. त्यांना शिक्षण देण्याचा प्रयत्न. परिवारातून तुटलेले वृद्ध त्यांच्यासाठी आनंदी जीवन देण्याचा प्रयत्न करणे. त्यांच्यासाठी आनंदघर शेल्टर होम करण्याचा माझा मानस आहे. सर्वांनाच सण उत्सव साजरा करण्याची संधी मिळावी. सर्वांच्या चेहऱ्यावर हसू फुलावं यासाठी दिवाळीला हा उपक्रम घेतला. संस्थेचा लोगो अत्यंत बोलका आहे. आपण एकमेकांना सहकार्य करून त्यांना त्यांच्या आनंदापर्यंत पोहचवण्यास मदत करतो. स्लोगनदेखील दु:खितांना आशा देणारं आहे. ‘तुमचे दु:ख आनंदात बदलो’ असा त्याचा अर्थ आहे.
मरिना डॅनियल, अध्यक्ष – ट्रू स्माईल बहुउद्देशीय संस्था
हेदेखील वाचा
हेदेखील वाचा
धक्कादायक… ! उंदिर मरून पडलेल्या पाईपद्वारा नागरिकांना पाण्याचा पुरवठा