जितेंद्र कोठारी, वणी: लोकमान्य टिळक महाविद्यासमोर असलेला ब्लॉक चोरट्यांनी मंगळवारी मध्यरात्री फोडला. आज सकाळी ही घटना उघडकीस आली. लोकमान्य बुक डेपो असे या दुकानाचे नाव असून लोटी महाविद्यालयाच्या समोरील बाजूस काढलेल्या ब्लॉकमध्ये हे दुकान आहे. मालकाने दुकान बंद केल्यानंतर दुकानाच्या गल्ल्यातील रोख रक्कम सोबत नेल्याने चोरट्यांच्या हाती केवळ चिल्लरचा डबा लागला, अशी माहिती आहे. विशेष म्हणजे चोरटे सीसीटीव्ही कैद झाल्याचे बोलले जात आहे.
चार दिवसांआधी याच कॉलेजसमोरील बुक डेपो चोरट्यांनी फोडले होते. संस्कार बुक डेपो असे या बुक डेपोचे नाव असून यात दुकानातून चोरट्यांनी गल्ल्यातील 1500 रुपये चोरल्याची माहिती आहे. वरोरा रोड हा रहदारीचा मार्ग आहे. या मार्गावरून रात्री देखील वाहतूक सुरू असते. मात्र चोरट्यांची हिम्मत इतकी वाढली आहे की भरचौकातील आणि रहदारीच्या मार्गावरही चोरटे घरफोडी करण्यास धजावताना दिसत नाही.
चोरटे सीसीटीव्हीत कैद !
लोकमान्य बुक डेपो येथे झालेल्या चोरीच्या घटनेत चोरटे सीसीटीव्हीत कैद झाल्याचे बोलले जात आहे. याआधी मुकुटबन रोड येथील एक हार्डवेअरचे दुकान चोरट्यांनी फोडले होते. त्यातही चोरटा सीसीटीव्हीत कैद झाला होता. मात्र त्याचा शोध लागला नव्हता. आता पुन्हा चोरटा सीसीटीव्हीत कैद झाल्याने पोलिसांसमोर या चोरट्यांना गजाआड करण्याचे आव्हान आहे.
गेल्या तीन ते चार महिन्यांपासून शहरात चोरी व घरफोडीच्या घटना सातत्याने घडताना दिसत आहे. मात्र एकाही घरफोडीचा काही सुगावा पोलिसांच्या हाती आला नाही. परिणामी चोरीच्या घटनांना आळा बसलेला नाही. शहरात बंद घर म्हणजे घरफोडी असे एक समीकरण झाले आहे. चोरट्यांच्या भीतीने लोकांनी घर बंद करून बाहेर जाणे बंद केले आहे. मात्र दुकान रात्री बंद असते. त्यामुळे चोरट्यांनी दुकानांना टारगेट करणे सुरू केले आहे. दोन दिवसांआधी चोरट्यांनी शेतमालावर देखील डल्ला मारत 56 हजारांचा कापूस चोरला होता. अद्यापही चोरी व घरफोडीच्या घटनांना आळा न बसल्याने पोलिसांच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.
हे देखील वाचा:
Comments are closed.