पोलीस ठाण्यात हाणामारी करणारे दोन्ही पोलीस कर्मचारी निलंबित

वणी पोलीस ठाण्याला गटबाजीची लागण.... ! गटबाजीतून झालेल्या कुरघोडी ठरले निमित्त ? आज रात्री उशिरा जिल्हा पोलीस अधिक्षक वणीत....

जितेंद्र कोठारी, वणी: किरकोळ वादातून पोलीस ठाण्यात चक्क दोन पोलीस कर्मचारीच आपसात भिडले. या दोघांमध्ये झालेल्या फ्री स्टाईलची आज दिवसभर शहरात चर्चा रंगत असताना आता या कर्मचा-यांना निलंबित करण्यात आल्याची माहिती समोर येत आहे. आज या घटनेचा अहवाल उपविभागीय पोलीस अधिकारी यांनी यवतमाळ येथे पोलीस अधिक्षक यांना पाठवला होता. त्यावर पोलीस अधिक्षक डॉ. दिलीप भूजबळ पाटील यांनी तात्काळ दखल घेत दोन्ही कर्मचा-यांना तडकाफडकी निलंबित केले आहे. दरम्यान वणी पोलीस ठाण्यात सुरू असलेल्या ‘राम’ भरोसे कारभाराबाबत आज रात्री उशीरा पोलीस अधिक्षक भेट देणार असून वणी पोलीस ठाण्याचा ते आढावा घेणार आहे. दरम्यान ठाण्यात झालेल्या हाणामारीची घटना आयजी पर्यंत गेल्याचीही माहिती मिळत आहे.

सविस्तर वृत्त असे की निलंबित कर्मचारी धीरज चव्हाण हे वणी पोलीस ठाण्यात डायरी अंमलदार या पदावर कार्यरत आहे. तर शिवाजी टिपूर्णे हे पीएसआय म्हणून कार्यरत आहे. यांची गुरुवारी रात्री नाईट शिफ्ट होती. गुरुवारी दिनांक 29 सप्टेंबर रोजी रात्री 11.30 वाजताच्या सुमारास टिपूर्णे व चव्हाण यांच्यामध्ये होमगार्डच्या ड्युटी लावण्यावरून वाद झाला. मात्र हा वाद वाढत गेला व दोन्ही कर्मचारी हाणामारीवर उतरले. चक्क पोलीस स्टेशनमध्ये रंगलेल्या या फ्री स्टाईलमध्ये दोघेही किरकोर जखमी झाले. 

दरम्यान या घटनेची वरिष्ठांना रात्रीच माहिती देण्यात आली.  तर सकाळी या फ्री स्टाईलची वार्ता शहरात वा-यासारखी पसरली. सकाळी धीरज चव्हाण व शिवाजी टिपूर्णे यांना उपविभागीय अधिकारी यांनी कार्यालयात बोलवून त्यांनी दोन्ही कर्मचा-यांचे बयान नोंदवले. त्याचा अहवाल त्यांनी तात्काळ पोलीस अधिक्षक यांना पाठवला. पोलीस अधिक्षकांनी या अशोभनीय कृत्याबाबत तात्काळ कार्यवाही करत दोन्ही कर्मचा-यांना तडकाफडकी निलंबित केले आहे.

वणी पोलीस ठाण्याला गटबाजीची लागण?
गेल्या काही काळापासून वणी पोलीस ठाण्याला गटबाजीची लागण लागल्याची माहिती समोर येत आहे. सध्या पोलीस ठाण्यात दोन गट निर्माण झाले असून या दोन गटात कर्मचारी विभागले गेले आहे. आपल्या गटातील लोकांना सोयीस्कर ड्युटी लावणे, बिट देणे इत्यादींमुळे दोन गटात कुरघोड्या सुरू होत्या. यावरून या दोन गटात कुरबुरी व्हायच्या. मात्र ही गटबाजी थांबवण्यात ठाणेदारांना अपयश आले. परिणामी अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या कुरघोड्यांचे पर्यावसन हाणामारीत झाल्याची सूत्रांची माहिती आहे.

ठाणेदारांचा वचक संपला ?
गेल्या वर्षी ठाणेदार वैभव जाधव यांची बदली झाली. त्यानंतर पोलीस ठाण्याच्या कारभाराची घडी जी विस्कटली ती अद्यापही तशीच आहे. शहरात राजरोसपणे सुरू झालेल्या मटक्यामुळे शाम सोनटक्के यांच्यावर कर्तव्यात कसूर ठेवल्याच्या कारणावरून बदली करण्यात आली. त्यानंतर रामकृष्ण महल्ले यांनी पदभार स्वीकारला. काही दिवस सर्व सुरळीत होते मात्र त्यानंतर शहरात पुन्हा अवैध धंद्यांनी डोके वर काढले. त्यातच ठाणेदारांचा कर्मचा-यावरचा वचक उरला नाही. परिणामी वणी पोलिसांच्या अनेक कारवाईवर संशय उपस्थित केला गेला.

घरफोडी व दुचाकी चोरीने वणीकर त्रस्त
वणी शहरात सातत्याने घरफोडी सुरू आहे. आधी रात्री होणारी चोरी ही दिवसाढवळ्या सुरू झाली. मात्र त्याचे आरोपी अद्यापही पोलिसांना गवसले नाही. त्यातच दुचाकी चोरीच्या घटना सातत्याने शहरात घडत आहे. याशिवाय अनेक तक्रारीबाबत गुन्हा दाखल केला जात नसल्याची तक्रार अनेक लोक करत आहे. अशा अनेक घटनांमुळे सर्वसामान्य त्रस्त असतानाच आता ही घटना समोर आल्याने वणी पोलीस ठाण्याच्या अब्रचे धिंडवडे निघत आहे.

 हे देखील वाचा: 

पोलीस ठाण्यात दोन कर्मचा-यात रंगली ‘फ्री स्टाईल’ !

 

9

चोर-पोलिसाच्या पाठशिवणीचा खेळ असलेली विक्रम वेधा शुक्रवारी सुजाता थिएटरमध्ये

चोरलेली दुचाकी दुस-याच दिवशी चोरटे फिरवत होते ऐटीत, मात्र डाव फसला…

मारेगाव येथील बजाजचे शोरूममध्ये दसरा व दिवाळी निमित्त विविध ऑफर्स लॉन्च

नवरात्रीनिमित्त सर्वात कमी दरात कर्ज उपलब्ध

 

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

Comments are closed.